Next
परमवीरचक्राच्या ‘डिझायनर’ सावित्रीबाई खानोलकर
BOI
Friday, October 12, 2018 | 08:00 AM
15 0 0
Share this article:

सावित्रीबाई खानोलकर. जन्म : २० जुलै १९१३, मृत्यू : २६ नोव्हेंबर १९९० (Photo : Wikimedia Commons)सावित्रीबाई खानोलकर हे अगदी मराठमोळ्या स्त्रीचे नाव वाटले, तरी प्रत्यक्षात ते हंगेरियन वडील आणि रशियन आई असलेल्या आणि स्वतः जन्माने स्विस, पण मनाने भारतीय असलेल्या इव्हा युओन लिंडा यांचे नाव आहे. कॅप्टन विक्रम खानोलकरांशी विवाह केल्यावर त्या केवळ नावानेच नव्हे, तर अगदी अंतर्बाह्य भारतीय झाल्या. परमवीरचक्र या सैन्यातील सर्वोच्च सन्मानाच्या पदकाचे रेखांकन त्यांनी केले आहे. ‘नवरत्ने’ मालिकेत आज सावित्रीबाईंची ओळख...
..............
‘सावित्रीबाई खानोलकर’ हे नाव वाचल्यावर खरे तर महाराष्ट्रातील पुण्यासारख्या शहरातील एक मराठी गृहिणी डोळ्यांसमोर येते; पण हंगेरियन वडील आणि रशियन आई असलेल्या आणि स्वतः जन्माने स्विस, पण मनाने भारतीय असलेल्या इव्हा युओन लिंडा हिचे ते नाव असेल, अशी पुसटशी शंकासुद्धा मनात येत नाही. 

सावित्रीबाईंची ओळख एवढ्यावरच थांबत नाही. भारतीय सैन्यातील अतुलनीय कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या ‘परमवीरचक्र’ या सर्वोच्च सन्मानाच्या पदकाचे रेखांकन (डिझाइन) ही त्यांनी भारताला दिलेली जणू देणगीच आहे. परमवीरचक्राबरोबरच अशोकचक्र, महावीरचक्र, वीरचक्र, कीर्तिचक्र आणि शौर्यचक्र अशा इतर अनेक महत्त्वाच्या पदकांचे रेखांकनही त्यांनीच केले आहे. 

पतीसह सावित्रीबाईयुरोपीय लोकांना भारतीय संस्कृती आणि जीवनपद्धतीचे तसे आकर्षण असतेच; तसेच इव्हालाही होते. कॅप्टन विक्रम खानोलकरांच्या प्रेमात पडल्यावर ते अधिकच वाढले. अवघ्या १६ वर्षांच्या इव्हाला आपल्यापेक्षा ११ वर्षांनी मोठ्या असलेल्या दूरदेशीच्या तरुणाशी लग्न करण्याची परवानगी मिळणे अवघडच होते; पण स्वतःवर आणि आपल्या प्रेमावर विश्वास असलेली इव्हा एक दिवस कॅप्टन विक्रम खानोलकरांच्या मागे मागे भारतात येऊन पोहोचली. त्यांच्याशी तिने लग्न केले आणि इव्हाची ‘सौ. सावित्रीबाई खानोलकर’ झाली. 

कपाळावर ठसठशीत कुंकू आणि साडी या बाह्य रूपाबरोबरच त्या अंतर्मनानेही संपूर्ण भारतीय झाल्या. संस्कृत, हिंदी, गुजराती आणि मराठी या चारही भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवले. भारतीय नृत्यकला, चित्रकला, गायन याचे शास्त्रोक्त शिक्षण त्यांनी घेतले. तसेच भारतीय संस्कृती, वेद, पुराण, परंपरा, अध्यात्म, इतिहास या सगळ्यांचा सखोल अभ्यास त्यांनी केला. भारतात जन्मलेली एखादी स्त्री काय काय करील, इतक्या समरसून त्यांनी भारतीय जीवनपद्धती स्वीकारली आणि अंगीकारली. 

दधिची ऋषींच्या त्यागाचे प्रतीक असलेल्या इंद्राच्या वज्राची प्रतिमा परमवीरचक्रावर असते. या रेखांकनाची कल्पना सावित्रीबाईंची आहे.त्यामुळेच जेव्हा मेजर जनरल हिरालाल अटल यांनी परमवीरचक्र हे सन्माननीय पदक देण्याची कल्पना प्रत्यक्षात आणायचे ठरवले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर ‘सावित्रीबाई खानोलकर’ यांचे नाव आले. वेद-पुराणे-शास्त्रे-इतिहास या सगळ्याचा उत्तम व्यासंग असलेल्या सावित्रीबाईंनी त्यांच्यावरचा विश्वास सार्थ ठरवून आपली जबाबदारी पार पाडली. ती इतकी सर्वोत्तम होती, की आजपर्यंत कधीच त्यात कुठलाही बदल केला गेलेला नाही. 

पुढे आपल्या पतीच्या निधनानंतर त्या रामकृष्ण मिशनच्या सभासद झाल्या आणि आपले उर्वरित आयुष्य त्यांनी मिशनच्या कार्यात घालवले. महाराष्ट्रातील संतांवर त्यांनी ‘Saints in Maharashtra’ हे इंग्रजी पुस्तक लिहिले. एकूणच समाजसेवेकडे त्यांचा कल होता. हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबासाठी आणि निर्वासितांसाठीही त्यांनी भरपूर काम केले.  

जन्मभूमी निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला नसले, तरी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपण आपली कर्मभूमी निवडू शकतो आणि आपल्या नावाची मोहोर तिथे कायमची उमटवू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजेच सावित्रीबाई खानोकर.

- आरती आवटी
ई-मेल : aratiawati@gmail.com

(‘नवरत्ने’ मालिकेतील सर्व लेख https://goo.gl/T9ihBw या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search