Next
स्वागतार्ह सामंजस्य
BOI
Monday, January 08, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

सुषमा स्वराज‘हिंदी भाषेला संयुक्त राष्ट्रांची अधिकृत भाषा करण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे,’ असा प्रश्न दोन खासदारांनी गेल्या आठवड्यात लोकसभेत उपस्थित केला. त्यावर चांगली चर्चा झाली; मात्र अनेक अप्रिय घटनांच्या कानठळ्यांमध्ये हा सुसंवाद ऐकू आला नाही. त्यामुळे त्याची विशेष दखल घ्यायलाच हवी.
............. 
गेल्या आठवड्यात, वर्षाच्या सुरुवातीलाच, अनेक अप्रिय घटना घडत असतानाच मनाला सुखावून जाणारी एक घटना अवचित घडत होती. भारतीय भाषांच्या संदर्भात एक अत्यंत विधायक आणि सकारात्मक चर्चा लोकसभेत होत होती. दुर्दैवाने हिंसेच्या कानठळ्यांमध्ये हा सुसंवाद आपल्या कानावर आला नाही. म्हणून त्याची आवर्जून दखल घ्यावीच लागेल.

ही चर्चा होती ‘राष्ट्रभाषा’ हिंदीच्या भविष्याबाबत. तेही संयुक्त राष्ट्रसंघातील हिंदीबाबत. झाले असे, की गेल्या बुधवारी लक्ष्मण गिलुवा आणि रमा देवी या दोन खासदारांनी एक प्रश्न विचारला होता. ‘हिंदी भाषेला संयुक्त राष्ट्रांची अधिकृत भाषा करण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे,’ असा त्यांचा प्रश्न होता. आता जिथे भारतातच हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून सार्वत्रिक मान्यता नाही, तेथे थेट संयुक्त राष्ट्रसंघ? म्हणून या प्रश्नाची पार्श्वभूमी आपण आधी समजून घ्यायला हवी.

लोकसंख्येच्या आधारावर क्रमवारी मांडलेल्या जगातील १६ प्रमुख भाषांमध्ये भारताच्या पाच भाषा समाविष्ट आहेत. हा मान मिळालेला भारत हा एकमेव देश आहे. विविध १६० देशांतील लोक भारतीय भाषा बोलतात. त्यात अर्थातच हिंदीचा क्रमांक वरचा असून, तमिळ त्या खालोखाल येते. मराठी, गुजराती, तेलुगू यांनाही या यादीत जागा आहे. जगात १५० देशांमध्ये शाळा आणि विद्यापीठ पातळीवर हिंदी भाषा शिकविली जाते.

संयुक्त राष्ट्रसंघात १९४५ साली चार अधिकृत भाषा होत्या - इंग्रजी, रशियन, फ्रेंच आणि चिनी; मात्र या भाषांना अधिकृत मान्यता मिळण्याचे कारण त्या बोलणाऱ्यांची संख्या किंवा प्राचीनता हे नव्हते, तर त्या दुसऱ्या महायुद्धाच्या जेत्यांच्या भाषा होत्या, हे ते कारण होते. त्यानंतर यात स्पॅनिश आणि अरबी या भाषांचाही समावेश करण्यात आला. त्यामागे अर्थातच आर्थिक कारण होते. याचाच अर्थ जगाच्या पाठीवर हिंदीभाषकांची संख्या चिनीभाषकांच्या खालोखाल दुसऱ्या स्थानी असली, तरी हिंदीला संयुक्त राष्ट्रांच्या कामकाजात स्थान नाही.

भाषांची क्रमवारी मांडायची झाली, तर चिनीभाषकांची संख्या सर्वाधिक (८० कोटी) आहे; मात्र चिनी भाषेची व्याप्ती चीन, हाँगकाँग आणि तैवानपुरतीच आहे. इंग्रजी भाषेचा संचार सरकारी, औद्योगिक व तांत्रिक क्षेत्रांमध्ये जास्त आहे. परंतु इंग्रजीभाषकांची संख्या (४० कोटी) आजही हिंदीभाषकांपेक्षा (५५ कोटी) कमी आहे. स्पॅनिश ही इंग्रजीच्या बरोबर आहे, तर अरबी (२० कोटी), रशियन (१७ कोटी) आणि फ्रेंच (नऊ कोटी) यांची संख्या खूपच कमी आहे. आणखी एक गंमत म्हणजे हिंदी केवळ भारतातच नाही, तर नेपाळ, मॉरिशस, फिजी, सुरिनाम, गयाना, त्रिनिनाद, टोबॅगो, सिंगापूर, भूतान, इंडोनेशिया, बाली, सुमात्रा, बांगलादेश आणि पाकिस्तानातही मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. हिंदी चित्रपट आणि दूरदर्शनच्या कार्यक्रमांमुळे हिंदी झपाट्याने जगभर पसरत आहे. ‘युनेस्को’च्या सात भाषांमध्येही हिंदी समाविष्ट आहे. अन् म्हणूनच राष्ट्रसंघाची अधिकृत भाषा म्हणून हिंदीला स्थान देणे, हे हिंदीभाषकांचे जुने स्वप्न आहे.

गिलुवा आणि रमा देवी यांनी विचारलेल्या प्रश्नामागे ही तळमळ होती. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या प्रश्नाला उत्तर देताना एखाद्या भाषेला राष्ट्रसंघाची भाषा बनविण्यासाठीची प्रक्रियाही समजावून सांगितली. त्या म्हणाल्या, की एखाद्या भाषेला राष्ट्रसंघाच्या भाषेचा दर्जा देण्यासाठी मतदान होते. यासाठी एखाद्या देशाने प्रस्ताव आणला, तर त्या मतदानात भाग घेण्यासाठी राष्ट्रसंघाच्या सर्व १९३ सदस्य देशांना ठराविक रक्कम द्यावी लागते; मात्र अनेक गरीब देशांना ही रक्कम देणे परवडत नाही, त्यामुळे भारत सध्या तरी असा प्रस्ताव आणू शकत नाही. याचाच अर्थ हस्ते-परहस्ते या देशांना मदत करून त्यांच्याकरवी मतदान करून घेऊनच भारत हिंदीसाठी हा दर्जा मिळवू शकेल. अन् त्यासाठी भारताला खूपच समर्थ व्हावे लागेल.

हिंदी ही राष्ट्रसंघाची अधिकृत भाषा नाही, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे हिंदीतच भाषणे दिली आहेत. स्वतः स्वराज यांनी तीनदा राष्ट्रसंघाच्या सभेत हिंदीत भाषण केले आहे. त्यापूर्वीही राष्ट्रसंघात हिंदीतच संवाद झाला आहे, असेही त्यांनी सांगितले आणि राष्ट्रसंघाची भाषा म्हणून हिंदीला दर्जा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही ठासून सांगितले. अन् त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे. हिंदीला आंतरराष्ट्रीय भाषेच्या स्वरूपात पुढे आणण्यासाठी फेब्रुवारी २००८मध्ये मॉरिशसमध्ये एक विश्व हिंदी सचिवालय स्थापन करण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षात परदेशातील भारतीय दूतावास व केंद्रांच्या माध्यमातून जगभरात हिंदीचा प्रसार करण्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

परंतु हिंदी ही काही भारताची एकमेव भाषा नाही. वर म्हटल्याप्रमाणे भारताच्या अनेक भाषा आंतरराष्ट्रीय भाषा आहेत. (बंगाली भाषेला भारत व बांग्लादेश या दोन देशांचे राष्ट्रगीत असण्याचे महद्भाग्य लाभले आहे). त्यामुळे अन्य भाषकांनी या घडामोडीकडे संशयाने पाहणे स्वाभाविकच आहे. राष्ट्रसंघाची अधिकृत भाषा म्हणून हिंदीला मान्यता मिळणे, याचा अर्थ ती भारताची राष्ट्रभाषा होणे! खासकरून गेल्या काही वर्षांत हिंदी लादण्याच्या नावाखाली तीव्र आंदोलने होत आहेत. कर्नाटकातील आंदोलन हे त्याचे प्रमुख उदाहरण. त्यामुळे त्यावर आक्षेप उठणे स्वाभाविक होते व तो आक्षेप घेतला शशी थरूर यांनी.

‘हिंदी भारताची राष्ट्रभाषा नसून राजभाषा आहे. हिंदी केवळ भारतात बोलली जाते, त्यामुळे तिला राष्ट्रसंघाची अधिकृत भाषा करता येणार नाही. आज पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री हिंदी बोलत आहेत. उद्या तमिळनाडू किंवा पश्चिम बंगालचा कोणी पंतप्रधान बनला, तर त्यांना संयुक्त राष्ट्रात हिंदी बोलण्यासाठी का मजबूर करावे,’ असा सवाल थरूर यांनी केला. त्यामुळे असा प्रयत्न करण्याची गरजच काय आहे, असा त्यांचा प्रश्न होता.

...मात्र त्याला स्वराज यांनी सडेतोड उत्तर दिले. थरूर यांनी राष्ट्रसंघात काम केले आहे. राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसपदाचे ते उमेदवार होते. त्यांच्या त्या पार्श्वभूमीचा हवाला देऊन स्वराज यांनी थरूर यांचे वक्तव्य म्हणजे अज्ञानच असल्याचेही सांगितले. 

भाषेच्या प्रश्नावरून तोडफोड आणि मोडतोड हाच काही एकमेव मार्ग नाही. शांततेने व सामंजस्यानेही विचारांचे आदानप्रदान करता येऊ शकते, हे या एकूण चर्चेवरून समोर आले. नव्या वर्षाच्या या सामंजस्याचे म्हणूनच स्वागत व्हायला हवे!

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search