Next
अटल टिंकरिंग लॅब चालवणाऱ्या शाळांचा मेळावा
प्रेस रिलीज
Monday, February 12 | 03:49 PM
15 0 0
Share this story

योगेश कुलकर्णी विद्यार्थ्यांचे प्रकल्प पाहताना

पुणे : ‘शालेय मुलांची विज्ञानाबद्दलची समज लक्षात घेता, त्यांना विज्ञानाच्या माध्यमातून एकदम मोठ्या समस्यांवर उत्तरे शोधता येतील अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. स्वतःशी निगडित असलेल्या छोट्या समस्या समजून घेणे आणि विज्ञानाची कोणती तत्त्वे ती समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरतील याचा विचार करत धडपड करणे, हेच विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहे. शाळांमध्ये स्थापन केल्या जाणाऱ्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ या प्रयोगशाळांचा हाच उद्देश असून या प्रयोगशाळांमध्ये फार तांत्रिक वा महागडी उपकरणे नव्हे, तर साधी हाताने वापरण्याजोगी हत्यारे व विज्ञान प्रयोगांसाठी वापरण्याजोगा भंगार माल साठवण्यासाठी स्क्रॅप यार्ड असणे आवश्यक आहे,’ असे मत पाबळ येथील ‘विज्ञान आश्रमा’चे कार्यकारी संचालक योगेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

केंद्र सरकारच्या ‘अटल इनोव्हेशन मिशन’अंतर्गत शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब स्थापन केल्या जातात. या प्रयोगशाळा सुरू करणाऱ्या पुण्यातील शाळांना आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ मिळावे, यासाठी ‘डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल’तर्फे या शाळांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात कुलकर्णी बोलत होते. डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका पल्लवी नाईक, कन्नड संघाच्या सचिव मालती कलमाडी, अहमदाबाद येथील बेस्ट हायस्कूलमधील अटल टिंकरिंग लॅबचे प्रमुख मदीश पारीख, 'रोबोमाईंस्'चे संस्थापक क्रिस बॅस्टिअन पिल्लई, बेस्ट हायस्कूलमधील इंटेल इनोव्हेशन कोच अक्षय चावला या वेळी उपस्थित होते.

‘कोणता विज्ञान प्रकल्प हाती घ्यायचा हे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना न सांगता त्यांना स्वतःला जाणवणारे छोटे प्रश्न सोडवण्यापासून सुरूवात करू द्यावी,’ असे सांगून कुलकर्णी म्हणाले, ‘अटल टिंकरिंग लॅब्जमध्ये इलेक्टॉनिक उपकरणे, सेन्सर्स, थ्री-डी प्रिंटर्स, रोबोटिक उपकरणे दिसून येतात. परंतु या प्रयोगशाळांचा मूळ उद्देश तो नाही. आपल्या आजूबाजूच्या समस्यांमागील वैज्ञानिक कार्यकारणभाव समजून घेण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे हे उद्दिष्ट असून, त्यासाठी विद्यार्थ्यांना हाताने वापरण्याजोगी साधी हत्यारे उपलब्ध करून द्यायला हवीत. या प्रयोगशाळांसाठी फार अत्याधुनिक साहित्याची गरज नसली, तरी विद्यार्थ्यांनी प्रयोगांबद्दलच्या माहितीचे जतन मात्र ‘इन्स्ट्रक्टेबल्स’ किंवा ‘विकी हाऊ’ अशी आधुनिक ऑनलाईन साधने वापरूनच करायला हवे. विविध शाळांनी आपल्याला या प्रयोगशाळा चालवताना येणारे अनुभव एकमेकांना सांगण्यासाठी सतत संपर्कात राहणेही गरजेचे आहे.’  

‘वीसपेक्षा अधिक शाळा या पहिल्या राज्यव्यापी मेळाव्यात सहभागी झाल्या असून, विविध शाळा विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीस फुलवण्याचा कसा प्रयत्न करतात याची देवाणघेवाण करण्यासाठीचे हे व्यासपीठ आहे,’ असे पल्लवी नाईक यांनी सांगितले.

ज्या शाळांमध्ये नव्यानेच अटल टिंकरिंग लॅब सुरू करण्यात आल्या आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलतर्फे परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले होते. मदीश पारीख, क्रिस बॅस्टिअन पिल्लई अक्षय चावला, ‘ज्ञान प्रबोधिनी’चे विवेक पोंक्षे यांनी या परिसंवादात आपली मते मांडली. या प्रयोगशाळा उत्तम चालाव्यात यासाठी शिक्षकांना त्याबद्दल प्रशिक्षण देणे आवश्यक असून, विज्ञानविषयक विचारविनिमयासाठी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात विशेष तास राखून ठेवायला हवा. तसेच यशाचे दडपण न घेता पुनःपुन्हा प्रयत्न करत शिकण्याची मुभा विद्यार्थ्यांना असावी, असा सूर या परिसंवादातून समोर आला.    

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link