Next
‘शेषनाग’चं आकर्षण
BOI
Saturday, March 10, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this story

शेषनाग

शेषनाग बेस कँपला लवकरात लवकर पोहोचणं हा माझा प्रयत्न होता. त्यासाठी मी शॉर्टकटचा पर्याय निवडला होता; पण आता त्याची किंमत मला चुकवायची होती. माझे पाय, कंबर दुखत होती. शक्तिपातच जणू शरीराचा! पण चालणं निकडीचं होतं. पुन्हा सखी काठीच्या साहाय्याने मी पाऊल टाकू लागलो... स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या ‘अमरनाथ ट्रेक’ या ट्रॅव्हलॉगचा हा एकोणिसावा भाग.. 
.......................................
अमरनाथ यात्रेचे दोन मार्ग असतात. एक चंदनवाडीमार्गे गुफेपर्यंत जाणारा, तर दुसरा बालतालवरून. मी चंदनवाडी मार्गाने जात होतो. हा रस्ता लांबचा आहे. या मार्गावर सर्वसाधारणपणे दोन रात्री मुक्काम करावे लागतात. पहिला मुक्काम शेषनागला. या शेषनागबद्दल म्हणजे या जागेबद्दल खूप ऐकलं होतं. तिथे खूप सुंदर तलाव आहे. लिडर नदी, जी पहलगामचं सौंदर्य वाढवते. जी लिडर नदी यात्रेत सोबत राहते तिचं उगमस्थान शेषनागचा तलाव आहे.

त्या दिवशी शेषनाग बेस कँपला मला राहायचं होतं. आधीच उशीर झाला होता. त्यात मी एकटा होतो त्यामुळे तंबू मिळायला त्रास होण्याची शक्यता जास्त होती. म्हणून शेषनाग बेस कँपला लवकरात लवकर पोहचणं हा माझा प्रयत्न होता. त्यासाठी मी शॉर्टकटचा पर्याय निवडला होता, पण आता त्याची किंमत मला चुकवायची होती. माझे पाय, मांड्या, कंबर दुखत होती. शक्तीपातच जणू शरीराचा! पण चालणं निकडीचं होतं. पुन्हा सखी काठीच्या साहाय्याने मी पाऊल टाकू लागलो. 

त्या अपंग माणसाला जवळची बाटली दिल्याने जवळ पाणी नव्हतं. तहान लागली होती. भूक लाडू जवळ होतेच, पण तहान लाडू नव्हते. तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा आधीच विहीर खोदण्याचं ठरवलं आणि कुठे पाण्याची बाटली मिळते का शोधू लागलो. पोळ्यातील बैलासारखा मी जोरजोरात दम टाकत होतो. आणखी एक उंचावरील वळण पार केलं. कितीही मान वर करून बघितली, पण पिस्सू टॉपचा माथा काही दिसत नव्हता. याच पिस्सू टॉपवर खूप यात्रेकरूंचे मृत्यू होतात.

शेषनाग तलावएका ठिकाणी काही काश्मीरी मोठी मुलं पाणी विकताना आढळली. ते स्थानही उंचावर होतं. म्हणजे आणखी एक वळण पार करायचं होतं, पण तेवढा त्राण नव्हता राहिला. मी जागच्या जागीच एका मोठ्या शिळेवर बसलो. डोळे मिटून श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करून ते शांत नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू लागलो. हृदयगती वाढली होती. तिलाही जरा शांत करायचं होतं. दहा मिनिटं मी निपचित पडून राहिलो. उठून बसलो. आजूबाजूला थंड हवा. आल्हाददायक वातावरण होतं. लोक समूहाने एकमेकांना आधार देत, प्रोत्साहन देत चालत होते. सोबतीचा फायदा होतोच. एकट्याने ताण येतो, कधी नकारात्मक भावना वाढतात. नैराश्य, उदासपणा येतो.

तेवढ्यात एक मोठा ग्रुप घोड्यावरून जाताना दिसला. नीट बघितल्यावर दिसलं ते एका प्रवासी कंपनीतर्फे यात्रेला जात होते. मला हसू आलं. कोणाच्याही भावना मला इथे दुखवायच्या नाहीत. माझं वैयक्तिक मत फक्त मी मांडतोय. पण मला कोणत्याही प्रवासी कंपनीतर्फे जायला कधीच आवडत नाही. माझ्या डोळ्यासमोरून घोड्यावरून तो ग्रुप पुढे गेला. अनेक तरुण मुलं-मुली, वयस्करही त्यात होते. मलाही आता वरचं वळण, त्यावरील पाण्याची बाटली आणि लिंबू सरबत खुणावत होतं.
ताकदीने उठलो आणि पाऊल उचललं. कानात गाणं लावलं, ‘दे धक्का.. दे धक्का…’
(क्रमशः) 
अभिजित पानसे- अभिजित पानसे
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com

(‘अमरनाथ ट्रेक’ हा ट्रॅव्हलॉग दर शनिवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/V6rLmU  या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link