Next
आ नीले गगन तले...
BOI
Sunday, September 17, 2017 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

हसरत जयपुरीगीतकार हसरत जयपुरी यांचा आज (१७ सप्टेंबर) स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या त्यांनी लिहिलेले ‘आ नीले गगन तले’ हे गीत...
............
‘तो’ कविता लिहायचा! पण कविता लिहिणे हे काही उदरनिर्वाहाचे साधन नव्हते आणि आजही नाही. त्यासाठीच ‘तो’ रोजीरोटीच्या शोधात मुंबईत आला होता. बस कंडक्टरची नोकरी करण्याचे ‘त्याच्या’ मनात नव्हते; पण तरीही काही काळ ती केली. काही काळ फुटपाथवर बसून खेळणीही विकली; पण हे सर्व करत असताना कविता करणे चालूच होते. त्याचबरोबर काव्यसंमेलनात जाऊन काव्यवाचन करणेही सुरू होते आणि अशाच एका काव्यसंमेलनातून पृथ्वीराज कपूर यांनी ‘त्याला’ ‘पृथ्वी थिएटर्स’मध्ये आणले. तेथे ‘त्याला’ राजकपूर भेटला व त्याच्या ‘बरसात’मध्ये ‘त्याचे’ पहिले गीत चित्रपटात आले. पडद्यावर श्रेयनामावलीत ‘गीतकार हसरत जयपुरी’ हे नाव झळकले. ‘जिया बेकरार है छाई बहार है...’ असे त्या गाण्याचे बोल होते.

आणि या ‘बरसात’पासून संगीतकार शंकर-जयकिशन, गीतकार शैलेंद्र आणि हसरत जयपुरी, गायक मुकेश, गायिका लता मंगेशकर आणि निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता राज कपूर अशा कलावंतांचे एकत्र येणे आणि त्यातून सुंदर गाणी निर्माण होणे याची एक साखळीच सुरू झाली. या एकत्रीकरणातून निर्माण झालेली गीते आजही मधुर व श्रवणीय वाटतात.

१९६०नंतर शम्मी कपूर आणि राजेंद्रकुमार यांच्या चित्रपटांसाठी शंकर-जयकिशनने संगीत दिले आणि हसरतने गाणी लिहिली; पण ती गीतेही अर्थपूर्ण आहेत. संयमित प्रेमानंतर चित्रपटसृष्टीत रांगड्या प्रेमाचा जमाना सुरू झाल्यावरही हसरतची ‘तुझे देखा, तुम्हें चाहा, तुझे पूजा मैने...,’मुझे तुम मिल गए हमदम...,’ ‘बहारों फूल बरसाओ...’ यांसारखी अर्थपूर्ण गीते येत होती. हे एकत्र आलेले कलावंत गीतकार शैलेंद्र व संगीतकार जयकिशन यांच्या निधनानंतर विखुरले गेले. या कलावंतांना एकत्र आणून चित्रपट निर्माण करणारा राज कपूर नवीन संगीतकार, गीतकार, गायक शोधू लागला.

प्रेमगीते, विरहगीते लिहिणारा हसरत जयपुरी अनेकांना अज्ञात आहे. कारण शैलेंद्रचे गीत कोणते व हसरतचे कोणते हे लक्षात येत नाही. त्याबाबत हसरतनेच एका मुलाखतीत सांगितले होते, ‘कधी कधी शैलेंद्र गीताचा मुखडा तयार करत असे व पुढील अंतरा मी लिहीत असे! मी शैलेंद्रकडून हिंदी शिकत असे, तर तो माझ्याकडुन उर्दू शिकत असे. गीत लिहिण्यासाठीचे प्रसंग राजकपूर देत असे व आम्ही दोघे ठरवून त्यावर गीत लिहीत असू! यावरून आम्हा दोघांच्यात कधीच भांडण होत नसे! दुधात पाणी मिसळून जावे, तसे आमचे काव्य एकमेकांत मिसळून गेलेले असे! त्यामुळेच कोणते गीत शैलेंद्रचे व कोणते हसरतचे असा घोटाळा निर्माण होत असे.’ अर्थात तो काळ निकोप स्पर्धेचा असल्यामुळे हसरतसारखे कलावंत आपले भावुक मन सांभाळू शकले. संकटातही डगमगून जाऊ नका असा संदेश ‘तुम आज मेरे संग हस लो...’ यांसारख्या गीतातून देऊन गेले.

१९८०पासून ‘डिस्को’चा जमाना सुरू झाला. ‘म म मिया-भंकस...’सारख्या शब्दांची गीते काळाची गरज म्हणून खपवली गेली आणि अशी गीते ‘हसरत’सारखा प्रतिभावंत लिहिणे शक्यच नव्हते. संगीतकार अन्नू मलिक नातेवाईक असला म्हणून काय झाले; पण त्याने नव्या जमान्याची गाणी हसरतकडून लिहून घेतली नाहीत. ‘हसरत’चा काळ संपला होता. त्याच दु:खात त्याने ‘आत्माराम’ चित्रपटासाठी गीत लिहिले असावे - ‘खबर क्या थी की अपने भी सितारे ऐसे उजडेंगे...’ एका प्रतिभासंपन्न शायराने निवृत्ती पत्करली. ‘पटाया पटाया...’सारखे रद्दी गाणे ‘दादागिरी’ चित्रपटासाठी लिहिले; पण आपल्याच त्या गीताची लाज वाटल्याने पुढे त्याने गाणी लिहिणेच बंद केले आणि थकलेल्या शरीराने व मनाने त्याने १७ सप्टेंबर १९९९ रोजी या जगाचा निरोप घेतला.
आज हसरत जयपुरींचा स्मृतिदिन! त्यांनी लिहिलेल्या एका मधुर प्रेमगीताविषयी त्या निमित्ताने जाणून घेऊ!
प्रेयसी व प्रियकर प्रेमाचे वार्तालाप करीत आपापले एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करीत आहेत.

आ नीले गगनतले प्यार हम करे
हिलमिलके प्यार का इकरार हम करे

या निळ्या आकाशाखाली बसून आपण प्रेम करू या! (एकमेकांवर अखंड) प्रेम करण्याचा एक वायदा, एक करार दोघे मिळून करू या!

ये श्याम की बेला ये मधुर मस्त नजारे
बैठे रहे हम तुम यूँ ही बाहों के सहारे
वो दिन न आए इंतजार हम करे

ही (सुंदर, मधुर) सायंकाळची वेळ आणि ही (निसर्गसौंदर्याची) विलोभनीय दृश्ये (पाहत) आपण दोघे एकमेकांच्या हातात हात गुंफून असेच बसून राहू. (हे प्रिये, तू मला भेटायला का येत नाहीस, या विचाराने) मी तुझी वाट बघत असेन असा दिवस माझ्या आयुष्यात कधीही उजाडू नये.

दो जान है हम ऐसे मिले एक ही हो जाए
ढूंढा करे दुनिया हमें हम प्यार में खो जाए
बेचैन बहारों को गुलजार हम करे

आपण जरी दोन जीव असलो, तरी या प्रेमामध्ये एकमेकांत असे मिसळून जाऊ, की एकच होऊन जाऊ. या प्रेमामध्ये आपण इतके हरवून जाऊ, की मग हे जग आपल्याला शोधत बसेल! (दोघे एकमेकांवर इतके प्रेम करू या, की या प्रेमाने) अस्वस्थ असलेल्या वसंत ऋतूलासुद्धा आपण सुंदर (गुलजार) बनवून टाकू या!

तू माँग का सिंदूर है, तू आँखो का है काजल
ले बांध ले हाथों के किनारों से ये आचल
सामने बैठे रहो सिंगार हम करे

माझ्या भांगातील कुंकू/सिंदूर, माझ्या डोळ्यातील काजळ हे तूच आहेस. (माझी ही शृंगाराची साधने तुझ्या प्राप्तीमुळेच वापरते) माझा हा (साडीचा आणि अर्थात जीवनाचाही) पदर तू तुझ्या हातांच्या किनाऱ्याला (टोकाला) बांध (आणि मला सतत तुझ्या समवेत ठेव! (अरे माझ्या प्रियकरा) तू समोर बसावेस आणि मी शृंगार करावा (यासारखा दुसरा सौख्याचा क्षण नाही.)

१९५४ सालातील ‘बादशहा’ चित्रपटातील हे गीत हेमंतकुमार आणि लता मंगेशकर यांनी गायले होते. शंकर-जयकिशन यांनी ते संगीतबद्ध केले होते. प्रदीपकुमार आणि माला सिन्हा यांनी ते पडद्यावर साकार केले होते. अत्यंत सौम्य, शांत अशा चालीमधील हे गीत गोंगाट न करणाऱ्या वाद्यांच्या साथीमुळे इतके श्रवणीय वाटते, की त्याचे महत्त्व हे गीत ऐकल्याशिवाय कळणार नाही.

‘मुहब्बत ऐसी धडकन है...’, ‘एक हुस्नपरी दिल में है...’, ‘सुनते थे नाम हम...’, ‘जाने न नजर पहचाने मगर...’ अशी सुंदर सुंदर प्रेमगीते लिहिणाऱ्या हसरत जयपुरी यांचे ‘बादशहा’ चित्रपटातील हे गीत असेच सुंदर, मधुर आणि सुनहरे! त्यांच्या काव्यप्रतिभेस अभिवादन!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)

(‘सुनहरे गीत’ हे सदर दर रविवारी प्रसिद्ध होते.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
दीपा देशमुख About
सुंदर लेख!
0
0

Select Language
Share Link
 
Search