Next
है इसी में प्यार की आबरू...
BOI
Sunday, November 11, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

अभिनेत्री माला सिन्हा आज (११ नोव्हेंबर २०१८) ८३व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांच्यावर चित्रित झालेल्या ‘है इसी में प्यार की आबरू...’ या गीताचा...
.........
आज ११ नोव्हेंबर. अभिनेत्री माला सिन्हाचा वाढदिवस! ती आज ८२ वर्षांची होत आहे. ८२ वर्षांच्या वयोवृद्ध स्त्रीला ‘अरे-तुरे’ संबोधणे योग्य नाही; पण एके काळी आपल्या देखणेपणामुळे व शरीरसौष्ठवाने चित्रपटप्रेमींना पागल करणाऱ्या माला सिन्हाला अहो-जाहो म्हणायचे पटकन जमत नाही. काळ झपाट्याने बदलत असतो. काल-परवापर्यंत शाळेत जात असलेली मुले तारुण्याच्या जोशात वावरताना दिसतात. माला सिन्हा यांच्या जीवनात तसेच घडले. १९३६मध्ये नेपाळी ख्रिश्चन कुटुंबात जन्म झालेल्या माला सिन्हांच्या आयुष्यात असाच काळ भुर्रकन निघून गेला. 

त्यांचे बालपण व शालेय शिक्षण कोलकात्यामध्ये झाले. त्यामुळे नेपाळी, बंगाली भाषा त्यांना अवगत झाल्या. गोबऱ्या गालाची, गुटगुटीत शरीराची ‘एवडा’ लक्षवेधी होती. ‘एल्डा’? होय! माला सिन्हांचे मूळ नाव एल्डा होते. पुढे ते बदलले. ही एल्डा शालेय जीवनात केवळ शरीरसौष्ठवामुळे लक्षवेधी नव्हती, तर तिचा आवाज गाण्यासाठी अनुकूल होता. थोडे नृत्याचेही अंग होते व अंगी सभाधीटपणाही होता. त्यामुळेच शालेय जीवनात त्यांना बंगाली चित्रपटात काम मिळाले. त्या बंगाली चित्रपटात काम करू लागल्या, त्याच वेळी ‘ऑल इंडिया रेडिओ’वर मान्यताप्राप्त गायिका म्हणून गीते सादर करू लागल्या. त्या वेळी त्यांनी ‘बेबी नजमा’ हे नाव घेतले. नंतर १९५२-५३च्या सुमारास त्या मुंबईत आल्या असताना त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला व माला सिन्हा हे नाव त्यांनी धारण केले. अभिनेत्री गीता बाली यांच्याबरोबर त्यांची ओळख झाली. त्यामुळे ‘रंगीन रातें’ आणि ‘बादशहा’ हे चित्रपट त्यांना मिळाले. ‘बादशहा’मध्ये त्यांनी सहायक अभिनेत्रीची भूमिका साकारली. तो चित्रपट १९५४मध्ये प्रदर्शित झाला आणि माला सिन्हा यांचा पहिला हिंदी चित्रपट म्हणून त्याची नोंद झाली. 

अर्थात, रंगीन रातें, बादशहा या चित्रपटांनंतर हॅम्लेट, एकादशी, रियासत, नया जमाना असे त्यांचे चित्रपट येत गेले; पण त्यामुळे माला सिन्हा हे नाव फार काही गाजले नाही. ‘नौशेरवाँ ए आदिल’ या सोहराब मोदींच्या चित्रपटातही त्या नायिका होत्या. त्यामधील गीते प्रचंड लोकप्रिय ठरली. तो चित्रपट चांगला चाललाही! परंतु माला सिन्हांची खरी ओळख चित्रपटप्रेमींना पटली ती गुरुदत्त यांच्या ‘प्यासा’ या चित्रपटामुळे! अर्थात त्यातील त्यांची भूमिका नकारार्थी होती; पण तरीही माला सिन्हा यांच्या दृष्टीने ‘प्यासा’ हा मैलाचा दगड ठरला.

... आणि ‘प्यासा’मुळे त्या लोकप्रिय ठरल्या, तेव्हा त्यांना मधुबाला, मीनाकुमारी, वैजयंतीमाला, वहीदा रेहमान यांच्याशी स्पर्धा करावी लागली. या स्पर्धेत त्या टिकूनही राहिल्या. १९६१नंतर आलेल्या आशा पारेख, तनुजा, साधना, नंदा, सायराबानो, शर्मिला टागोर या नायिकांबरोबरच्या स्पर्धेतही त्या टिकून राहिल्या. 

विविध नायकांबरोबर त्यांनी कामे केली; पण अभिनेते दिलीपकुमार यांच्याबरोबर चित्रपट करण्याचा योग जुळून आला नाही. सुहागन, अनपढ, बहुरानी, मैं सुहागन हूँ यांसारख्या चित्रपटांतून आदर्श सून, आदर्श पत्नी अशी भारतीय स्त्रीची रूपे त्यांनी हुबेहूब साकारली. ‘जहाँआरा’सारख्या चित्रपटातून ऐतिहासिक व्यक्तिरेखाही त्यांनी उत्तमपणे साकारली. ‘धूल का फूल’मधील कुमारी मातेची त्यांची भूमिका चटका लावणारी होती. बी. आर. आणि यश चोप्रा यांची ही आवडती अभिनेत्री होती. त्यामुळेच त्या आपल्याला धर्मपुत्र आणि गुमराह या चित्रपटांमध्येही दिसल्या. 

अर्थात केवळ चोप्रा नव्हे, तर रामानंद सागर, रमेश सहगल, अमिया चक्रवर्ती, किशोर साहू, शक्ती सामंत इत्यादी नामवंत दिग्दर्शकांनी माला सिन्हा यांच्या अभिनयाची विविध रूपे चित्रपटप्रेमींनी दाखवली. १९७०नंतर त्या प्रमुख नायिकेच्या भूमिकेत दिसल्या नाहीत; पण १९७० ते १९९६ या कालावधीत जवळजवळ तीस हिंदी चित्रपटांत त्या सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसल्या! हिंदी, बंगाली, नेपाळी अशा १२२ चित्रपटांतून अभिनयाचे विविध आविष्कार दाखविणारी ही अभिनेत्री कोणत्याही अफवा, विवाद, भानगडी यांमध्ये दिसली नाही किंवा फिल्मी पार्ट्यांमध्ये मिरवतानाही दिसली नाही, हे माला सिन्हा यांचे मोठेपण आहे.

१९९२मध्ये त्यांची मुलगी प्रतिभा सिन्हा हिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ‘मेहबूब मेरे’ हा तिचा चित्रपट प्रदर्शित झाला; पण आईसारखे भाग्य मुलीला मिळाले नाही. तसेच माला सिन्हा यांचा सुंदर अभिनय त्यांना एकदाही फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देऊ शकला नाही. फिल्मफेअरचा जीवनगौरव पुरस्कार अलीकडेच त्यांना प्रदान करण्यात आला; पण तो खूप उशिरा दिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

आपले उर्वरित आयुष्य सध्या वांद्रे-मुंबईत सुखा-समाधानाने व्यतीत करणाऱ्या माला सिन्हा यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देऊन त्यांच्या एका आशयसंपन्न, ‘सुनहऱ्या’ गीताचा आस्वाद आपण घेऊ या!

एखाद्यावर आपण प्रेम करावे व त्याने मात्र आपल्याशी प्रतारणा करावी, हे फक्त तरुण-तरुणींच्या प्रेमातच घडते असे नव्हे, तर एखाद्या ध्येयावरचे प्रेम, एखाद्या तत्त्वावरचे, विचारावरचे प्रेम आणि त्यासाठी मिळालेले मित्र आणि थोड्या वाटचालीनंतर त्यांनी सोडून दिलेली साथ! अशा वेळची मनःस्थिती! भावुक मन हे दुःख सहन करू शकत नाही आणि तेव्हा ओठावाटे शब्द बाहेर पडतात - 

वो जफा करे मैं वफा करूँ
जो वफा भी काम ना आ सके
तो वही कहे के मैं क्या करूँ

त्यांनी माझ्याशी प्रतारणा करावी आणि मी मात्र त्यांच्यावर निष्ठाच ठेवावी, यातच प्रेमाची, प्रीतीची अब्रू (सुरक्षितता) आहे. (पण जर माझी) निष्ठाच उपयोगाची ठरली नाही, तर त्यांनीच सांगावे, की मी आता काय करावे?
प्रतारणेमुळे व्यथित झालेली ती नायिका आपले दुःख व्यक्त करताना पुढे म्हणते - 

मुझे गम भी उनका अजीज है की उन्ही की दी हुई चीज है
यही गम गम है अब मेरी जिंदगी इसे दिलसे कैसे जुदा करूँ?

त्यांचे (त्यांनी दिलेले) दुःख मला प्रिय आहे. (कारण ते दुःख म्हणजे) त्यांनीच (मला) दिलेली वस्तू आहे. (आणि) ते दुःखच आता माझं जीवन आहे. (म्हणून) ते दुःख मी माझ्या हृदयापासून कसे अलग करू? कसे दूर करू?

आपले जीवन कसे आहे हे सांगताना पुढील कडव्यात नायिका म्हणते –

जो न बन सके मैं वो बात हूँ
जो न खत्म हो मैं वो रात हूँ
यही लिखा है मेरे नसीब में
यूँ शम्मा बनके जला करूँ

(सहजपणे साध्य व्हावे) असे माझे जीवन आहे. (मला सहजपणे कोणतीही गोष्ट मिळाली नाही.) (सहजासहजी) संपून जाणार नाही, अशी (दुःखाची) रात्र म्हणजे मी आहे (माझे जीवन आहे.) (मी दुःखात अखंड) दीपज्योती बनून जळत राहावे (मी नेहमी दुःखच सहन करावे) असे माझ्या नशिबात लिहिले आहे. 

निष्ठा दाखवूनही पदरी पडलेल्या उपेक्षेबद्दल, प्रतारणेबद्दल, या अशा जीवनाबद्दल ‘ती’ अखेरच्या कडव्यात म्हणते - 

न किसी के दिल की हूँ आरजू, न किसी नजर की हूँ जुस्तजू
में वो फूल हूँ जो उदास है, न बहार आये तो क्या करूँ?

(मी) कोणाच्याही हृदयाची इच्छा नाही. (माझ्या प्रेमाची कोणाला अभिलाषा नाही.) (मी) कोणाच्याही नजरेचा शोध नाही. (कोणी मला शोधत नाही.) उदासवाणे असे मी फूल आहे. (माझे जीवन उदासवाणे आहे.) (माझ्या नशिबी) वसंत ऋतू आलाच नाही, तर मी काय करू?

१९६२मधील मोहनकुमार दिग्दर्शित ‘अनपढ’ या चित्रपटातील राजा मेहंदी अली खाँ यांचे हे काव्य संगीतकार मदनमोहन यांनी संगीतबद्ध केले होते आणि ते स्वरसम्राज्ञींनी गायले होते. पडद्यावर ते माला सिन्हा यांच्यावर चित्रित झाले होते. 

हे गीत म्हणजे माला सिन्हा यांचे मनोगत वाटते. कारण आपल्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीत या अभिनेत्रीने किती विविध प्रकारच्या भूमिका केल्या. तरुण नायिकेच्या भूमिका करत असताना ती ‘धर्मपुत्र’ चित्रपटात शशी कपूरची आई झाली होती. ‘जिंदगी’ चित्रपटात संजीवकुमारच्या बरोबरीने वृद्धा म्हणून शोभली होती. ‘इमेज’चा फारसा विचार न करता दिलेल्या भूमिकेशी प्रामाणिक राहून माला सिन्हा मन लावून अभिनय करत राहिल्या. परंतु परीक्षकांनी त्यांच्या अभिनयाला मानले नाही. चित्रपटप्रेमींनीही माला सिन्हा म्हटले, की त्यांचे सौंदर्य, शरीरसौष्ठव याच्याच गोष्टी केल्या. अशा परिस्थितीत ‘तो मैं क्या करूँ’चा सवाल योग्य ठरतो. एखादे असेही ‘सुनहरे’ गीत असते.. .नाही का?

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search