Next
‘नासा’च्या उपग्रह निर्मितीत पुणेकर विद्यार्थ्याचा सहभाग
प्रेस रिलीज
Friday, May 25, 2018 | 04:41 PM
15 0 0
Share this article:

आनंद ललवाणी आणि त्याच्या गटाने तयार केलेला ‘इक्विसॅट’पुणे : अमेरिकेतील प्रसिद्ध दी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन अर्थात नासाने नुकतेच व्हर्जिनिया येथील वॅलॉप्स आइसलॅंड येथून ‘इक्विसॅट’ या विद्यार्थी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहाची निर्मिती ही अमेरिकेतील ब्राउन युनिव्हार्सिटीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. अभिमानाची बाब म्हणजे या विद्यार्थ्यांच्या संघात एका गटाचे नेतृत्व हे पुण्याच्या आनंद ललवाणी या २२ वर्षीय विद्यार्थ्याने केले आहे. याबरोबरच अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी निर्मित केलेल्या आणि नासाने प्रक्षेपित केलेल्या अशा प्रकारच्या प्रकल्पातील गटाचे नेतृत्व केलेला तो पहिला भारतीय ठरला आहे.    

एका गिफ्ट बॉक्स इतकाच जवळजवळ चार इंच एवढा या उपग्रहाचा आकार असून, नासाच्या क्यूबसॅट लाँच इनिशिएटिव्ह अंतर्गत ब्राउन स्पेस इंजिनीअरिंग अर्थात बीएसई या गटाने त्याची निर्मिती केली आहे. २० मे २०१८ रोजी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले असून, गेल्या सात वर्षांपासून ब्राउन युनिव्हार्सिटीचे विद्यार्थी या प्रकल्पावर काम करीत होते. विशेष म्हणजे एखाद्या उपग्रहाच्या निर्मितीसाठी किमान पन्नास हजार ते एक लाख डॉलर्स इतका खर्च येत असताना या विद्यार्थ्यांनी तो केवळ चार हजार डॉलर्स किंमतीत विकसित केला आहे.   

आनंद ललवाणीया टीममध्ये पुण्याच्या आनंद ललवाणी या विद्यार्थ्याने महत्त्वपूर्ण कामगिरी बजाविली आहे. आनंदने ब्राउन युनिव्हार्सिटीमध्ये त्याने इंजिनीअरिंग फिजिक्स या विषयात नुकतीच पदवी पूर्ण केली आहे. आनंदची एरोनॉटिक्समधील आवड लक्षात घेत ब्राउन स्पेस इंजिनीअरिंगच्या संघात युनिव्हर्सिटीत दाखल झाल्यापासूनच त्याची निवड करण्यात आली होती.

‘या उपग्रहाची निर्मिती करत असताना आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला; मात्र त्या सर्वांवर मात करून आमच्या विद्यार्थ्यांच्या गटाने या उपग्रहाची यशस्वी निर्मिती केली याचा आम्हाला आनंद आहे. विशेष म्हणजे अनेक गोष्टींचा पुनर्वापर आम्ही या वेळी या उपग्रहाची निर्मिती करताना केला आहे. आम्ही तयार केलेल्या या उपग्रहाला अत्युच्च क्षमतेचे सौरउर्जेवर चालणारे एलईडी बसविण्यात आले असून, अवकाशातून हा उपग्रह पाहणे व त्याची जागा निश्चित करणे शक्य होणार आहे. याचा उपयोग इतर उपग्रहांना जागा निश्चिती करण्यासाठी होऊ शकेल,’ असे आनंदने सांगितले.

‘इक्विसॅट’ या प्रकल्पासाठी एकूण पाच गट कार्यरत होते ज्यापैकी १७ विद्यार्थ्यांच्या गटाचे नेतृत्व हे आनंद ललवाणी याच्याकडे होते. त्याच्या टीमने मुख्यत: सोलर पॉवर आणि बॅटरी निर्मितीचे काम पाहिले. सध्या आनंद इंजिनीअरिंग रिसर्च असिस्टंट म्हणून ब्राउन युनिव्हर्सिटी येथे कार्यरत असून, भविष्यात त्याला स्टॅनफर्ड विद्यापीठामधून सोलर एनर्जी या विषयात पीएचडीचे शिक्षण घ्यायचे आहे.

एरोनॉटिक्स विषयात रुची असणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्राकडे वळावे या उद्देशाने नासाने क्यूबसॅट लाँच इनिशिएटिव्ह या विद्यार्थीभिमुख उपक्रमाला सुरुवात केली असून, या अंतर्गत अमेरिकेतील विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उपग्रह बनविण्याची संधी देण्यात येते. विद्यार्थ्यांनी बनविलेले मॉडेल नासाला आवडले, तर नासा त्या प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व आर्थिक मदत देखील करते. इतकेच नाही, तर पूर्ण झालेला हा उपग्रहाचा प्रकल्प अवकाशात देखील पाठविला जातो. जेणेकरून विद्यार्थ्यांना या क्षेत्रात कामासाठी प्रोत्साहन मिळेल.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search