Next
मेरे ऐ दिल बता...
BOI
Sunday, October 28, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते व्ही. शांताराम यांचा २८ ऑक्टोबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज आस्वाद घेऊ या त्यांच्या चित्रपटातील ‘मेरे ऐ दिल बता...’ या गीताचा...
............
चारचौघांसारखेच माझे घर. एक सामान्य घर - मध्यमवर्गीयाचे. चित्रपटाचे नाव काढले, की वडील मंडळी बिथरणार असा तो काळ. आयुष्य बिघडवून टाकणारे शस्त्र म्हणजे चित्रपट असा वडिलधाऱ्यांचा एक समज; पण तो गैरसमज आहे हे सांगण्याचे धारिष्ट्य त्या वयात नव्हते.

...मात्र माझ्या या अशा घरात एका व्यक्तीच्या नावाला, त्याच्या चित्रपटाला विरोध नसायचा. उलट त्यांचे चित्रपट आम्हाला आवर्जून दाखवले जायचे. त्यांच्या चित्रपटांवर चर्चा घडायची. त्यांचा नवीन चित्रपट येऊ घातला, की तर्कवितर्क खुलेआम मांडले जायचे.

‘ती’ व्यक्ती म्हणजे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते व्ही. शांताराम होय. २८ ऑक्टोबर १९९० रोजी त्यांचे निधन झाले. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्या निमित्ताने चित्रपटसृष्टीतील अफाट कर्तृत्व असलेल्या या कलावंताबद्दल थोडेफार सांगण्याचा प्रयत्न.

व्ही. शांताराम यांचा जन्म, बालपण, उमेदवारी आणि पुढील वयातील चित्रपटसृष्टीतील त्यांचे कर्तृत्व याबद्दल लिहायचे, तर एक पुस्तक नव्हे ग्रंथच लिहावा लागेल. आणि असा ग्रंथ नव्हे, आत्मचरित्र लिहिले गेले आहे. ‘मधुरा जसराज’ यांची संकल्पना व शब्दांकन असलेला ‘शांतारामा’ हा ५८२ पृष्ठांचा संदर्भग्रंथ १९८६मध्ये प्रकाशित झाला आहे. त्यामधून व्ही. शांताराम यांच्या जीवनाबद्दल, कर्तृत्वाबद्दल सविस्तर माहिती आपणाला मिळते.

मला हे व्यक्तिमत्त्व कसे भावले, हे आज त्यांच्या २८व्या स्मृतिदिनानिमित्त मी आवर्जून सांगू इच्छितो. वर उल्लेख केल्याप्रमाणे सामान्य माणसाच्या मनातही आदर्श चित्रपट निर्माता म्हणून स्थान मिळवणारे व्ही. शांताराम हे कलावंत होते. कॅमेरा बोलतो म्हणजे काय हे अनुभवायचे असेल, तर व्ही. शांताराम यांचे चित्रपट पाहायला हवेत. मग ते ‘प्रभात’ कंपनीचे असोत, अगर ‘राजकमल’ चित्रसंस्थेचे असोत.

दिग्दर्शक व्ही. शांताराम म्हटल्यावर जाणकार रसिकांनी कोणालाही न विचारता चित्रपटगृहात जाऊन बसावे, एवढे प्रभावी दिग्दर्शन व्ही. शांताराम करत असत. राज कपूर यांच्यासारख्या उत्कृष्ट दिग्दर्शकालाही व्ही. शांताराम यांच्या हाताखाली काम करण्याची इच्छा होती. दुर्दैवाने ती पुरी झाली नाही. अन्यथा दिग्दर्शक व्ही. शांताराम व नायक राज कपूर असे एकत्र असलेला चित्रपट एखादा ‘माइलस्टोन’ बनून गेला असता.

अर्थात दिग्दर्शक व्ही. शांताराम असल्यावर नामवंत नायकाची गरजही नसायची. म्हणूनच महिपालसारखा पौराणिक चित्रपटांचा नायक असूनही ‘नवरंग’ गाजला. ‘सेहरा’चा नायक प्रशांत हाही नामांकित अभिनेता नव्हता. तरीही ‘सेहरा’ रसिकांनी पाहिला. ‘झनक झनक पायल बाजे’चा नायक म्हणून गोपीकृष्ण यांना निवडण्याचे धारिष्ट्य व्ही. शांतारामच करू शकतात. 

चित्रपटाची श्रेयनामावली हे त्यांच्या चित्रपटाचे एक वेगळे वैशिष्ट्य असायचे. ‘दो आँखें बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘सेहरा’ अशा अनेक चित्रपटांची श्रेयनामावली आवर्जून बघण्यासारखी आहे व त्यात विविधताही आहे. ‘इंटर्व्हल’ अगर ‘मध्यांतर’ ही अक्षरेही वेगवेगळ्या पद्धतीने पडद्यावर येतात, तेव्हा एक वेगळाच आनंद आपल्याला मिळतो.

सुंदर चित्रपटनिर्मिती आणि चित्रपटांतून मिळालेला पैसा चित्रपट उद्योगातच पुन्हा गुंतवणारी मोजकीच मंडळी चित्रपटसृष्टीत आहेत. त्यामध्ये व्ही. शांताराम हे नाव अग्रभागी होते. पडदे ओढण्यापासून त्यांनी आपल्या चित्रपट व्यवसायातील कर्तव्याच्या आहुतींची सुरुवात केली, नव्वदी गाठली, निर्माता या उच्च पदावर जाऊन बसले, तरी त्यांनी हा यज्ञ थांबवला नाही. एक खरीखुरी आंतरिक तळमळ असेल आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी असेल, तर माणूस तळागाळातूनही उच्च पदाला कसा पोहोचू शकतो, याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे व्ही. शांताराम होय.

व्ही. शांताराम यांच्या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या चित्रपटाचे संगीत, त्यामधील आशयसंपन्न गीते. त्यांना स्वतःला चांगल्या संगीताची जाण होती. म्हणून त्यांनी चांगल्या संगीतकारांकडून चांगले संगीत असलेली गीते तयार करून घेतली. त्याची अनेक उदाहरणे आहेत. ‘पिंजरा’ चित्रपटातील गीतांच्या चालींबाबतच्या हकीकती तर सर्वश्रुत आहेत.

आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या चित्रपटांतील अनेक ‘सुनहऱ्या’ गीतांपैकी एक गीत निवडण्याची कसरत मला जमते का बघा! विविध आशयांची गीते आपणाला व्ही. शांताराम यांच्या चित्रपटातून दिसून येतात. एक जेलर, एक कवी, एक नर्तक, एक शिक्षक, एक डॉक्टर अशांच्या जीवनावर चित्रपट बनविणारे व्ही. शांताराम त्या त्या चित्रपटांच्या अनुषंगाने त्या चित्रपटासाठी गीते लिहून घेत असत.

एखादा विशिष्ट गीतकार व संगीतकार हा चित्रपट निर्मात्याने ठरवलेला असतो. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला तोच गीत लिहितो व तोच संगीतकार संगीत देतो; पण व्ही. शांताराम यांच्या बाबतीत असे दिसत नाही. वसंत देसाई, सी. रामचंद्र, रामलाल, वनराज भाटिया अशा विविध संगीतकारांचे संगीत त्यांनी आपल्या चित्रपटासाठी वापरले. सी. रामचंद्र व वसंत देसाई हे मात्र दोन-तीन वेळा दिसतात.

तोच प्रकार गीतकारांचा. आणि असेच गीतकार व संगीतकार यांचे दुर्मीळ एकत्रीकरण आपल्याला त्यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटासाठी दिसते. येथे संगीतकार वसंत देसाई आणि गीतकार हसरत जयपुरी एकत्र आले आहेत. या चित्रपटातील बारा गीतांपैकी सात गीते हसरत जयपुरी यांनी लिहिली होती.

यापैकी एक गीत लता मंगेशकर यांनी गायलेले. एका दु:खी हृदयाच्या भावनांची घालमेल या गीतात आहे. समोरचा प्रियकर निष्ठावान भेटला नाही, त्याने प्रतिसाद दिला नाही याबद्दल त्याला दोष देण्याऐवजी स्वतःच्या मनाशी केलेला संवाद व त्यातून केलेले ‘आत्मताडन’ अशा प्रकारचे हे गीत. मुळातच ते सुरू होते लतादीदींच्या ‘आऽआऽआऽ’ अशा आलापांनी आणि पुढे त्या गातात...

पाई मैंने सजा, क्या करूँ? क्या करूँ?

हे माझ्या (विद्ध) हृदया तू (त्या निष्ठुरावर) प्रेम केलेस (आणि त्याची) शिक्षा मी भोगत आहे. (मला ती शिक्षा असह्य होत आहे) मी काय करू? काय करू?

प्रेमातील अपेक्षाभंगामुळे दु:खी झालेली नायिका असा स्वतःचाच स्वतःला प्रश्न विचारून पुढे म्हणते -

तू खुशी के समुंदरसे खेला किया 
किस मजे से मुझे तूने धोखा दिया 
तुझ को मोती मिले  
मुझ को आँसू मिले 
क्या करूँ? क्या करूँ?

स्वतःच्या मनाशी संवाद साधणारी ही दु:खी नायिका पुढे आपल्या मनाला आणि ओघानेच प्रियकरालासुद्धा विचारते (हसरत जयपुरींनी तसे दोन अर्थ ठेवूनच या ओळी लिहिल्या आहेत.) 

(प्रेमाच्या) सौख्याच्या सागरात (तू) का खेळत होतास? किती सहज (की मजेने) तू मला धोका दिलास? (मी वेडी तुझ्या प्रेमप्राप्तीच्या खोट्या स्वप्नात मश्गुल होते.) (तुझे चार दिवस मजेत गेले. मात्र) मला अश्रूच मिळाले. मी आता काय करू? काय करू?

पुढील कडव्यात ती म्हणते -

तू तो पागल राहा प्यार की राग में 
तूने डाला मुझे दर्द की आग में 
तेरी किस्मत खुली
मेरी दुनिया जली 
क्या करूँ? क्या करूँ?

प्रीतीच्या त्या सुखमय दिवसांत तू भान हरपून रत राहिलास. (प्रेमाच्या रागदारीत तू वेडा झालास) (मात्र) तू मला दु:खाच्या आगीत टाकलेस. (सहजासहजी मला सोडून गेलास, विसरून गेलास) (चार दिवस सौख्याचे मिळाल्यामुळे) तुझे नशीब उजळले (हे ठीक आहे रे; पण त्याच वेळी) माझे विश्व (माझे जीवन) जळून गेले (हे तुला ठाऊक आहे का? खरेच मी आता) काय करू? काय करू?

लता मंगेशकर यांनी गायलेले हे दोन कडव्यांचे गीत संगीतात बांधताना संगीतकार वसंत देसाई यांनी आपले कौशल्य पूर्णपणे पणाला लावले होते. लतादीदींचे आलाप अनेक, पण योग्य ठिकाणी वापरून ते गीत प्रभावी बनवले आहे. गीतांच्या शब्दातील दु:खी आशय उभा करण्यास हे संगीत व स्वर हातभार लावतात. पडद्यावर संध्या यांचा अभिनयही साजेसा आहे. 

याच गीताचा दुसरा भाग मात्र सरस्वतीकुमार दीपक या गीतकाराने लिहिलेला असून, तो मन्ना डे आणि लता मंगेशकर यांनी गायला आहे. 

दु:खी आशय असला, तरी संगीत, स्वर व सादरीकरण या दृष्टिकोनातून या गीताचे ‘सुनहरे’पण दिसून येते. चित्रपटांना प्रतिष्ठा देणाऱ्या चित्रपती व्ही. शांताराम यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search