Next
‘किल्ले व्हावेत जैवविविधता वारसा स्थळे!’
प्रेस रिलीज
Saturday, June 23, 2018 | 06:04 PM
15 0 0
Share this story

डॉ. मुंगीकर यांच्या व्याख्यानाला उपस्थित नागरिक.पुणे : ‘किल्ले म्हणजे केवळ ऐतिहासिक महत्त्वाची स्थळे नाहीत, तर पाणी-वनसंपदा, जैववैविध्य देणारी भौगोलिक, जैविकदृष्ट्या महत्त्वाची केंद्रे आहेत. त्यामुळे गडसंवर्धनाचा, सुशोभीकरणाचा विचार करताना जैववैविध्याला धोका पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी,’ असे प्रतिपादन ‘बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या धोरण विभागाचे सहसंचालक डॉ. राहुल मुंगीकर यांनी केले. ‘जीविधा’ आयोजित आठव्या हिरवाई महोत्सवात दुसऱ्या दिवशीच्या व्याख्यानात ते बोलत होते. हा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी (२२ जून) पुण्यातील इंद्रधनुष्य सभागृह येथे झाला. 

डॉ. मुंगीकर म्हणाले, ‘महाराष्ट्राला ६० टक्के पाणी हे पश्चिम घाटातून, किल्ले भागातून मिळते. तिथल्या इतिहासाबरोबर भूगोल आणि पर्यावरणालाही समजून घेतले पाहिजे. तसे समजून न घेता गडसंवर्धनाची आधुनिक कामे करणे योग्य ठरणार नाही. गडसंवर्धनासाठी एकात्मिक दृष्टिकोन बाळगावा लागेल.’

डॉ. राहुल मुंगीकर‘किल्ल्याच्या बुरुजातील, भिंतीमधील वड-पिंपळाची झाडे काढली, तर या बुरुजांना धरून ठेवणाऱ्या मुळ्या सैल होऊन बुरुज लवकर ढासळतील. उंच किल्ल्यांच्या प्रतिकूल नैसर्गिक वातावरणात दगडांना धरून ठेवणारे दुसरे कोणतेही ताकदवान, परवडणारे सिमेंट मटेरियल उपलब्ध नाही. किल्ल्याजवळच्या पठारावरील, कपारीजवळील गवताळ प्रदेश माती धरून ठेवत असल्याने तिथे वनीकरण करण्याचा आग्रह धरू नये. गवताळ प्रदेशावर अवलंबून असलेली जीवसाखळी धोक्यात येते. महाराष्ट्राची किल्ल्यांची साखळी ही वन्य श्वापदांचे कॉरिडॉर आहेत. ते नष्ट होता काम नयेत,’ असे ते म्हणाले.

‘किल्ला आणि किल्ल्याचा परिसर, तेथील वनसंपदा, उपयोग याचे ज्ञान स्थानिक व्यक्तींना असल्याने त्यांच्या सूचना विचारात घेतल्याशिवाय गडसंवर्धन करून चालणार नाही. गडांच्या परिसरात स्थानिक वृक्ष लावले जावेत. गवताळ प्रदेश नष्ट केले जाऊ नयेत. अन्यथा माती सरकण्याची माळीणसारखी दुर्घटना होण्याची शक्यता वाढते,’ असेही डॉ. मुंगीकर यांनी सांगितले.

‘निसर्ग सेवक’चे अध्यक्ष डॉ. रमेश गोडबोले, उपवनसंरक्षक सत्यजित गुजर यांच्या हस्ते रामकृष्ण आडकर, प्रीती कोरे, डॉ. विनया घाटे यांच्या ‘सातारा जिल्ह्यातील देवराया’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. राजीव पंडित यांनी प्रास्ताविक केले. या वेळी डॉ. सचिन पुणेकर, निवेदिता जोशी, आदी मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link