Next
प्रकाशभाई मोहाडीकर जन्मशताब्दी : मालवणमध्ये साने गुरुजी कथामालेचा स्नेहमेळावा
BOI
Monday, May 06, 2019 | 01:01 PM
15 0 0
Share this article:आचरा (मालवण, जि. सिंधुदुर्ग) :
अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे संस्थापक स्वातंत्र्यसैनिक प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मालवण तालुक्यातील आचरे गावात कथामाला स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन यासोबतच एक मे हा सिंधुदुर्ग जिल्हा स्थापना दिन असल्याने या दिवशी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. 

प्रकाशभाईंची जयंती नऊ जानेवारी रोजी होऊन गेली. त्यांनी २४ डिसेंबर १९५१ रोजी अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची सुरुवात केली. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे. त्या निमित्ताने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रशाळा आचरे नं. १ येथे खास उभारण्यात आलेल्या पूजनीय प्रकाशभाई मोहाडीकर प्रकाशनगरीत मालवण कथामालेचे शंभरहून जास्त कार्यकर्ते त्या वेळी उपस्थित होते. मनाली मुकुंद फाटक या गायिकेने ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या साने गुरुजींच्या प्रार्थनेने मेळाव्यास प्रारंभ केला. स्नेहमेळाव्याचे उद्घाटन सदानंद कांबळी (कार्यक्रमाचे अध्यक्ष), प्रकाश पेडणेकर (प्रमुख अतिथी), सुरेश ठाकूर (अध्यक्ष, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, शाखा मालवण) आणि मुकुंद तेलीचरी (कथा निवेदक) यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आले. साने गुरुजी आणि प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर मुकुंद तेलीचरी यांनी ‘यारे या सारे या, कथामालेचे गीत गाऊ या’ हे कथामाला गीत आणि ‘त्यागाची घंटा’ ही कथा सांगून स्नेहमेळाव्याचे उद्घाटन केले. 

लुकलुकत्या या ताऱ्यांना, ज्ञानप्रकाश द्यावा, 
प्रकाशभाई कथामालेचा प्रणाम स्वीकारावा॥

मालवण कथामालेच्या कवयित्री श्रीमती अनुराधा आचरेकर यांनी लिहिलेले, अनिरुद्ध आचरेकर यांनी संगीतबद्ध केलेले आणि स्वरा आणि आर्या आचरेकर भगिनींनी सुस्वर गायलेल्या या ‘प्रकाशगीताचे’ शब्द वातावरणात दरवळले आणि प्रकाशनगरी तेजाने उजळून निघाली.

‘प्रकाशभाई तुमचे, आमचे, सर्वांचे, कथामालेचे’ या विषयावर सुरेश ठाकूर यांचे व्याख्यान झाले. १९९३ साली अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे अधिवेशन मालवण येथे भरले होते. या अधिवेशनाच्या निमित्ताने प्रकाशभाई मोहाडीकर, मधू नाशिककर, यदुनाथ थत्ते, नानासाहेब चव्हाण आदी अनेक कथामालाप्रेमींचे आणि मालवण कथामालेचे त्या वेळी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. १९७२पासून प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या सान्निध्यात आलेल्या विविध अनुभवांचे कथन सुरेश ठाकूर यांनी आपल्या व्याख्यानात केले. त्यामुळे ज्यांनी प्रकाशभाईंना पाहिले होते, त्यांच्या त्या आठवणींना उजाळा मिळाला आणि ज्यांना प्रकाशभाईंचे दर्शन झाले नाही, अशा नवीन कथामाला कार्यकर्त्यांना प्रकाशभाई समजून घेता आले.
 


‘मुले ही देवाघरची फुले’ या कार्यक्रमात दोन लहान मुलांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात बाल पक्षीमित्र वरद कुबलची मुलाखत परशुराम गुरव (प्रमुख कार्यक्रम संयोजक, कथामाला स्नेहमेळावा) यांनी घेतली. वरदचा पक्षिनिरीक्षणाचा छंद, त्यासाठी तो घेत असलेले कष्ट आणि त्याचे इतर छंद रसिकांना उल्हसित करून गेले. केवळ परीक्षेतील मार्क आणि अभ्यास यांवर अवलंबून न राहता ‘छंद आपले जीवन कसे घडवितात’ हे वरदने आपल्या मुलाखतीतून रसिक मान्यवरांना पटवून दिले. या सदरात दुसरी मुलाखत झाली ती बालकवयित्री यशदा आंगणे हिची. तिची मुलाखत कवयित्री कल्पना मलये त्यांनी घेतली. त्यात ‘कविता स्फुरते कशी’ यापासून तिचे आवडते छंद, कवितेला प्रेरणा देणारे आई-वडील, आजी यांची सांगितलेली माहिती दाद घेऊन गेली. या वेळी यशदाने काही मराठी आणि काही इंग्रजी कविता सादर केल्या. या स्नेहमेळाव्यात प्रकाशभाई मोहाडीकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त १०० व्यक्तींचे सत्कार करण्यात आले. ८० सक्रिय कार्यकर्त्यांना प्रकाशभाईंचे आणि साने गुरुजींचे छायाचित्र असलेले स्मृतिचषक प्रदान करण्यात आले. ग्रंथ, स्मृतिचिन्ह देऊन दहा कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. दहा विशेष पुरस्कारही या वेळी प्रदान करण्यात आले. नवनाथ पांडुरंग भोळे यांना ‘कथामाला विशेष सेवा पुरस्कार रामचंद्र आंगणे (उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पांडुरंग गुरुदास कोचरेकर यांना वसंत महाले (गटशिक्षणधिकारी, पंचायत समिती, मालवण) यांच्या हस्ते ‘कथामाला विशेष कार्यकर्ता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र व रोख दोन हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. त्यानंतर रणजित सूर्यवंशी यांना सुरेश ठाकूर यांच्या हस्ते कथामाला मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. त्यानंतर महिला गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. प्रमुख अतिथी प्रकाश पेडणेकर यांच्या हस्ते महिलांना गौरविण्यात आले. यामध्ये श्रीमती सोनाली अनिल कदम, श्रीमती नेत्रप्रभा भास्कर मालवणकर, श्रीमती अरुणा बाळासाहेब खोत आणि श्रीमती दीपिका दिलीप चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर अध्यक्ष दानंद कांबळी यांच्या हस्ते कु. स्वरा आणि आर्या आचरेकर, कु. वरद कुबल, कु. यशदा आंगणे या बालकलाकारांचा सत्कार करण्यात आला. वरदविषयीचा लेख कथामाला मासिकामध्ये प्रकाशित करणारे परेश सावंत यांना स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी रामचंद्र आंगणे, वसंत महाले, प्रकाश पेडणेकर व सदानंद कांबळी यांनी आपल्या मनोगतामध्ये कथामालेबाबत गौरवोद्गार काढले. ‘कार्यकर्तृत्वाच्या तीन मुलाखती’ या सदरामध्ये कथामाला विशेष सेवा पुरस्कारप्राप्त शिक्षक नवनाथ पांडुरंग भोळे यांची मुलाखत रामचंद्र वालावलकर यांनी, तर कथामाला विशेष कार्यकर्ता पुरस्कारप्राप्त शिक्षक पांडुरंग गुरुदास कोचरेकर यांची मुलाखत आदर्श शिक्षक गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर यांनी घेतली. कथामाला मित्र पुरस्कारप्राप्त शिक्षक रणजित सूर्यवंशी यांची मुलाखत सूत्रसंचालक परशुराम गुरव यांनी घेतली. आपल्या क्षेत्रातील कार्याचे अनुभव त्यांनी या ठिकाणी कथन केले. या पुरस्काराने आपल्याला अत्यानंद झाला असून, आपल्याकडून यापेक्षाही अधिक गौरव होईल असे कार्य यापुढे आपल्या हातून घडेल अशी ग्वाही त्यांनी दिली. 

‘मालवण तालुक्यात ज्या शाळांमध्ये कथामाला सुरू आहे त्या शाळा आणि ज्या शाळांमध्ये कथामाला चालू नाही त्या शाळा, अशा दोन शाळांमधील फरक आम्हांला शाळाभेटीच्या वेळी प्रकर्षाने दिसून येतो. म्हणून मालवण तालुक्यातील सर्व शिक्षकांनी शाळा तेथे कथामाला हे प्रकाशभाईंचे स्वप्न साकार केले पाहिजे,’ असे आवाहन वसंत महाले (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती मालवण) व रामचंद्र आंगणे (उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग) या शिक्षण क्षेत्रातील दोन्ही मान्यवरांनी सर्व शिक्षकांना केले. 

सुरेश ठाकूर

प्रकाशभाई बाल कथाकथन महोत्सव 
या वर्षी मालवणात वर्ग स्तर, शाळा स्तर, केंद्र स्तर आणि तालुका स्तर या चार स्तरांवर जुलै २०१९ ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत विविध संस्थांच्या सहकार्याने बाल कथाकथन महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी दिली. या कार्यक्रमानिमित्त लालासाहेब पाटील (अध्यक्ष, अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला), दत्तात्रय मुळीक (कथामालाप्रेमी, हडपसर-पुणे) आदींचे शुभेच्छा संदेश आले होते. 

समारोपावेळी सुरेश ठाकूर यांनी असे जाहीर केले, की प्रत्येक वर्षाला पंचांगात वेगवेगळे नाव असते; मात्र अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा हे वर्ष ‘पूजनीय प्रकाशभाई मोहाडीकर नाम संवत्सर’ म्हणून पाळणार आहे. या प्रकाशवर्षात कथामालेतर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतील आणि मोहाडीकर यांना अपेक्षित असलेले कथामालेचे कार्य शाळेपासून घरापर्यंत पोहोचविण्यासाठी कथामाला कार्यकर्ते प्रयत्न करणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

स्नेहभोजनाने या स्नेहमेळाव्याची सांगता झाली. संपूर्ण स्नेहमेळाव्याचे सूत्रसंचालन परशुराम गुरव यांनी केले, तर आभार श्रीमती सुगंधा गुरव यांनी मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Suresh gaonkar About 75 Days ago
Sarvankash vrutant lekhan .chhan. Abhinandan.
0
0
R V Angane About 75 Days ago
खूप सुंदर कार्यक्रम,नियोजनबद्ध ,आखीव आणि रेखीव,सर्वाना प्रेरणा देणारा,उत्कृष्ट उपक्रम।
0
0

Select Language
Share Link
 
Search