Next
प्रौढत्वी निज शैशव जपलेला कवी...
BOI
Thursday, August 16, 2018 | 07:15 PM
15 0 0
Share this article:देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे दीर्घ आजाराने आज (१६ ऑगस्ट २०१८) निधन झाले. अमोघ वक्तृत्व ही ओळख असलेल्या या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाची सायंकाळ मूक व्हावी, हा दैवदुर्विलासच. पत्रकार, कवी, साहित्यिक, संसदपटू, वक्ता, नेता अशा सर्वच भूमिकांतून त्यांनी आपला अमीट ठसा उमटवला. ‘प्रौढत्वी निज शैशव जपलेला कवी’ असे या कविमनाच्या कणखर नेत्याचे वर्णन करता येईल. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा आणि आठवणी जागवणारा हा लेख...
...........
ही गोष्ट साधारणतः २००१-२००२ची. त्या वेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्या नात्याने ते अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेत. एकदा काही विद्यार्थ्यांसोबत ते संवाद साधत होते. त्या वेळी एका विद्यार्थ्याने त्यांना प्रश्न विचारला, ‘आपने शादी क्यों नहीं की?’ त्यावर वाजपेयी उत्तरले, ‘किसी लड़की ने मुझे पसंद ही नहीं किया।’ त्या वेळी विद्यार्थ्यांमध्ये एकच हशा उसळला. ही विनोदबुद्धी आणि हजरजबाबीपणा हे वाजपेयी यांच्या स्वभावाचे एक अभिन्न अंग होते. 

वाजपेयी हे मुळात कवी. हिंदी साहित्यात त्यांच्या कवितांचा स्वतंत्र असा वकूब आहे. ‘हार नहीं मानूंगा मैं’ किंवा ‘आओ एक दिया जलाए’ यांसारख्या त्यांच्या कवितांनी अनेकांच्या हृदयात जागा केलेली आहे; मात्र या कवीमध्ये एक मिश्किल आणि खट्याळ मूलही दडले होते. ‘माझे कविहृदय मला राजकीय समस्यांना, खासकरून माझ्या विवेकबुद्धीला आव्हान देणाऱ्या समस्यांना तोंड देण्याची शक्ती देते,’ असे स्वतः अटलजींनी एकदा सांगितले होते. कवितेमुळेच आपण राजकारणात आल्याचे त्यांनी अनेकदा स्पष्ट केले होते. ही काव्यबुद्धी आणि हजरजबाबी वृत्ती अखंड त्यांच्यासोबत होती. म्हणूनच पंतप्रधान असताना जेव्हा त्यांचे विरोधक अधिक मुखर झाले आणि वाजपेयींचे आता वय झाले, असे म्हणाले, तेव्हा त्यांनी एका वाक्यात त्यांना सडेतोड उत्तर दिले, ‘ना मैं टायर्ड हूं ना रिटायर्ड हूं!’

इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाचा गुजरात निवडणुकीतील एक किस्सा आहे. एका सभेत बोलताना इंदिरा गांधी म्हणाल्या, की त्या उत्तर प्रदेशच्या कन्या आणि गुजरातची सून आहेत. त्यामुळे लोकांनी आपल्याला मत द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर झालेल्या सभेत वाजपेयी यांनी हाच धागा पकडला आणि ते म्हणाले, ‘श्रीमती गांधी या इटलीच्या सासूबाईही आहेत, हे सांगायला मात्र विसरल्या.’ 

अर्थात अशी बोचरी टीका केली, तरी त्यात निर्विषता असे. म्हणूनच १९६९ साली वाजपेयींनी ‘गुंगी गुडिया’ असा उल्लेख केलेल्या इंदिराजींना केवळ दोन वर्षांनी बांगलादेशाच्या निर्मितीनंतर, संसदेत ‘दुर्गा’ म्हणण्यास त्यांना आडकाठी आली नाही. इतकेच नव्हे, तर १९७७ साली परराष्ट्रमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदा इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि आपण कोणाच्याही मागे ससेमिरा लावणार नाही, अशी ग्वाही त्यांना दिली. 

त्यांची ही उदारमनस्कता त्यांच्या विरोधकांनाही मान्य होती. एकदा अर्थमंत्री म्हणून डॉ. मनमोहनसिंग यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते म्हणून अटलजींनी टीका केली. तेव्हा दुखावलेल्या डॉ. मनमोहनसिंग यांनी थेट राजीनामा देण्याची तयार दर्शविली. मग पंतप्रधान असलेल्या पी. व्ही. नरसिंहराव यांनी स्वतः अटलजींना दूरध्वनीवरून ही माहिती काढली आणि मनमोहनसिंगांची समजूत काढायला लावली. 

अन् ही जवळीक, ही समजून घेण्याची आणि समजूत काढण्याची, ही ‘एकमेकां साह्य करू’ पद्धत फक्त राजकारण्यांपुरती मर्यादित नव्हती. त्याला उच्च-नीचतेचा स्पर्शही नव्हता. जनता सरकारमध्ये अटलजींनी परराष्ट्र खाते मोठ्या तडफेने सांभाळले. त्या वेळी मंत्रिपदावर त्यांची नियुक्ती झाली, तेव्हा परराष्ट्र खात्यातील एका दाक्षिणात्य अधिकाऱ्याने तक्रार केली, की त्याला आता हिंदी शिकावी लागणार बहुतेक. हे ऐकल्यानंतर वाजपेयींना त्याला सांगितले, ‘तुम्ही माझ्याशी इंग्रजीत बोला, मी तुमच्याशी हिंदीत बोलतो. अशा प्रकारे तुमची हिंदीही सुधारेल आणि माझी इंग्रजीही सुधारेल!’ अन् याच अटलजींनी संयुक्त राष्ट्रसंघात पहिल्यांदा हिंदीत भाषण करून भारतवासीयांची वाहवा मिळविली. 

ते परराष्ट्रमंत्री असतानाचाच आणखी एक किस्सा. ते चीनला भेट देणार होते आणि त्यानिमित्त त्यांनी काही पत्रकारांना माहिती देण्यासाठी बोलावले होते. त्या वेळी ते नुकतेच मोठ्या आजारपणातून बरे झाले होते. त्या वेळी एकाने त्यांना विचारले ‘कैसी तबियत है आपकी?’ त्यावर अटलजी तडक उत्तरले, ‘चायनीज फूड खाने के लिये बढ़िया!’

नुकतेच निधन झालेले कम्युनिस्ट नेते व लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात वाजपेयी यांची आठवण दिली आहे. चटर्जी यांचा पासपोर्ट आणीबाणीच्या काळात जप्त करण्यात आला होता. तो आणीबाणी उठल्यानंतरही परत करण्यात आला नव्हता. त्यांनी ही गोष्ट परराष्ट्रमंत्री वाजपेयींना सांगितली आणि त्याच दिवशी संध्याकाळी, परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने चटर्जी यांचा नवा पासपोर्ट त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे सोपवला. 

अशा किती तरी आठवणी! अटलजींनी राजकारण केले; मात्र आयुष्यभर आपल्या तत्त्वांशी प्रामाणिक राहून केले. लवचिकता अंगी बाणवूनही चारित्र्य कसे जपावे, याची शिकवणीच जणू त्यांनी जगाला दिली. तब्बल १४ पक्षांची युती करून पाच वर्षे सरकार चालविणे हे खायचे काम नाही; पण ते अटलजींनी करून दाखविले. ते पहिल्यांदा खासदार झाले १९५७मध्ये; पण त्यानंतर १० वर्षांपर्यंत त्यांचे स्वतःचे घर नव्हते. ते १९६७ सालापर्यंत पक्षाच्या कार्यालयात राहायचे. लालकृष्ण अडवाणी यांनी २००९मध्ये त्यांची एक आठवण सांगितली होती. ती बहुधा १९५१ची निवडणूक असावी. या दोघाही तरुण कार्यकर्त्यांनी जनसंघाचा प्रचार केला होता. त्यानंतर निवडणुकीचे निकाल लागले. त्यात अपेक्षेप्रमाणे नवजात जनसंघाचे पानिपत झाले. त्यानंतर अटलजींनी सायकलवर टांग मारली आणि हे दोघेही जण पक्ष कार्यालयात आले. त्यानंतर तेथे अटलजींनी केलेली खिचडी खाऊन हे दोघेही तरुण पुढच्या कार्याला लागले. 

याच अडवाणींशी वाजपेयी यांची स्पर्धा असल्याचे बोलले जात होते. ‘इंडिया टीव्ही’च्या रजत शर्मा यांनी एकदा त्यांना असेच छेडले होते. ‘भाजपा में एक अडवानी का दल है, एक वाजपेयी का दल है,’ असे शर्मा म्हणाले. त्यावर क्षणाचीही उसंत न घेता अटलजी म्हणाले, ‘मैं किसी दलदल में नहीं हूँ। मैं दूसरों के दलदल में अपना कमल खिलाता हूँ।’ अखेर अडवाणींच्या आत्मचरित्राला अटलजींनीच प्रस्तावना लिहिली. 

‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे’ असे केशवसुतांनी म्हटले आहे. विचार आणि आचारातून अटलजींनी प्रौढत्व मिळविले होते;  मात्र कविहृदयाच्या ऋजुतेतून, राजस उदारतेतून आणि निरागस खट्याळपणातून त्यांनी आपले शैशव कायम राखल्याचा वारंवार प्रत्यय आणून दिला. त्यामुळे त्यांचा द्वेष करणे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनाही जमले नाही. पंतप्रधान असल्यामुळे ‘फक्कडपणा’चे (भणंगपणाचे) जीवन जगता येत नाही, याची खंत करणारा हा मऊ मेणाहूनि विष्णुदास होता. म्हणूनच ‘मित्र बदलता येतात; परंतु शेजारी बदलता येत नाहीत,’ यांसारख्या त्यांच्या वक्तव्यांनी लोकांच्या हृदयात स्थान मिळविले. अन् हे स्थान सदैव कायम राहील. 

- देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Jyoti Bhalerao About 305 Days ago
Very informative article
0
0

Select Language
Share Link
 
Search