Next
तोरणमाळच्या गुरू गोरक्षनाथ यात्रोत्सवाला जनसागर
शशिकांत घासकडबी
Saturday, March 09, 2019 | 02:24 PM
15 0 0
Share this article:नंदुरबार :
 धडगाव तालुक्यातील तोरणमाळ या महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या भगवान श्री गुरू गोरक्षनाथांच्या यात्रोत्सवाला मोठा जनसागर लोटला होता. २० फेब्रुवारी ते सहा मार्च या कालावधीत या यात्रोत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यांतून लाखो भाविकांनी यात्रेला हजेरी लावून गोरक्षनाथांचे दर्शन घेतले. 

यात्रोत्सवासाठी विविध सामाजिक संघटनांनी भंडाऱ्याचे आयोजन केले होते. या वर्षी प्रथमच २० फेब्रुवारीपासून गुरू गोरक्षनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम व पूजा-अर्चा सुरू होती. २८ फेब्रुवारीपासून लहान-मोठे व्यापारी तोरणमाळला दाखल होण्यास सुरुवात झाली. दोन मार्चपासून मध्य प्रदेशातील भाविक नवस फेडण्यासाठी येऊ लागले. महाशिवरात्रीच्या दिवशी तर प्रचंड गर्दी उसळली होती. यात्राकाळात प्रशासनातील प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडली. विशेषतः पोलिस प्रशासन व राज्य परिवहन महामंडळाच्या यात्रेसाठी नेमणूक असलेल्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी चांगली मेहनत घेतल्याने यात्रा सुरळीत पार पडली. 

भाविकांचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी शिरपूर, शहादा, नंदुरबार व शहादा आगाराच्या सहकाऱ्याने खेतिया येथून जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. खासगी चारचाकी व दुचाकी वाहनांमुळे सातपायरी घाटात वाहतुकीची समस्या उद्भवू नये, म्हणून पोलिस प्रशासन व राज्य परिवहन खात्याचे अधिकारी स्वतः देखरेख ठेवत होते. तोरणमाळ ग्रामपंचायतीने संपूर्ण यात्रेचे नियोजन केले होते. मोठ्या संख्येने येणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहनांसाठी वाहनतळाची सोय करण्यात आली होती. तसेच ठिकठिकाणी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. सारंगखेडा ग्रामपंचायतीच्या सहकार्याने फिरते सुलभ स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात आले होते. आरोग्यसेवेसाठी तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयाचे विशेष पथक वैद्यकीय अधिकारी डॉ. ओंकार वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होते. 

गुरू गोरक्षनाथ मंदिराचे महंत योगी संजूनाथ महाराज, व्यवस्थापक कथा व्यास, साध्वी मंगलादेवी यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी प्रथमच १५ दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. २० फेब्रुवारी ते सहा मार्चपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. भगवान बद्रीविशाल मंदिराच्या धर्तीवर भगवान गोरक्षनाथ मंदिरासमोरील भागाचे बांधकाम प्रगतिपथावर असून, गेल्या वर्षी गुरू गोरक्षनाथांची साडेतीन फूट उंचीची अत्यंत मनमोहक मूर्ती जयपूर येथून आणण्यात आली आहे. ही मूर्ती उच्च प्रतीच्या मक्राणा संगमरवरी दगडापासून बनविण्यात आली आहे. 

गुरू गोरक्षनाथांचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मंदिरात स्टीलचे रेलिंग केल्यामुळे, दर्शन घेण्यास सुलभता आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. मंदिराच्या घुमटाला रंग देऊन विद्युत रोषणाई केल्याने व त्याचे प्रतिबिंब तलावात पडत असल्याने नयनरम्य दृश्य दिसत होते. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी भगवान गुरू गोरक्षनाथांच्या पालखीची वाजतगाजत बाजारपट्ट्यातून मिरवणूक काढण्यात आली. 

मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात मिरवणुकीची समाप्ती होऊन रोट-प्रसादाची तयारी सुरू झाली. सव्वा मणाचा रोडगा पांढऱ्या कपड्यात भाजण्यासाठी गोवऱ्यांच्या हारीमध्ये टाकण्यात आला. सुमारे सहा तासानंतर तो बाहेर काढून प्रसादवाटपाचे काम सुरू झाले. प्रसादासाठी भाविक चार ते पाच तास रांगेत उभे होते. धार्मिक कार्यक्रम व मंदिराच्या अंतर्गत देखरेखीसाठी तोरणमाळचे पोलिस पाटील ओलसिंग तिवड्या नाईक, नवे तोरणमाळचे पोलिस पाटील सुक्ररसिंग नाईक, दीपक गुरव (साक्री), जीवन रावताळे, उमेश गुरव (जायखेडकर), धनगर समाजाचे युवा कार्यकर्ते नाना नागो लकडे (दुसाणे), तलावडीचे पोलिस पाटील मोहन रावताळे, लक्कडकोटचे भरत पाडवी, माजी सरपंच सुनील पाडवी, पोलिस पाटील सखाराम शंकर पावरा, यश पाटील (शहादा), भगवान रावल (सारंगखेडा), आदेशबाबा (अनरद), मोहन पटेल (राखी भासकी), डॉ. विलास साळी (शहादा), ग्रामविकास अधिकारी व्ही. व्ही. वाणी, पी. डी. पाटील, पत्रकार भंवरलाल जैन आदींनी परिश्रम घेतले. 

ब्रह्मलिन रामनाथबाबा संजीवन समाधीजवळ जळगाव येथील स्व. अर्जुन नारायणराव शिरसाळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व भगवान गुरू गोरक्षनाथ यात्रोत्सवानिमित्त यात्रेकरूंना महाप्रसाद म्हणून साबुदाणा खिचडी वाटण्यात आली. या वेळी पानसेमल येथील गोरक्षनाथ आश्रमाचे योगी सावननाथ उर्फ उडीबाबा, युवा कार्यकर्ते दिनेश सोनी, पंकज नारायण शिरसाळे, चेतन नारायण शिरसाळे, गौरव शिरसाळे, विक्की सपकाळे, नीलेश चव्हाण, गजू सोनार, अरुण शिंदे, शेखर भावसार, कांती कानडे, संदीप बेडीस्कर, उज्ज्वल पालिवाल, दीपक चौधरी, रवीना चित्ते आदींनी परिश्रम घेतले. श्री दशामाता शक्तिपीठ व राणीपूर ग्रामस्थ यांच्या सहकार्याने तोरणमाळ येथे जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी साबुदाणा खिचडी व पाणी पाउच यांचे वाटप करण्यात आले. या वेळी रोशनीमाता, शिवमदास महाराज, सरपंच लीलाबाई रावताळे, सामाजिक कार्यकर्ते ग्यानसिंग वेडू रावताळे व ग्रामस्थ उपस्थित होते. 

नंदुरबार जिल्हा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या तर्फे तोरणमाळ पोलीस चौकीसमोर विशाल भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. सलग तीन दिवस चाललेल्या या भंडाऱ्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. उद्योगपती नुहभाई नुराणी यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले. या वेळी बजरंग दलाचे संजय तुकाराम पाटील, गुलाल उर्फ भरत केशव पाटील, कैलास प्रल्हाद पाटील, ईश्वर गिरधर पाटील, हिरालाल पाटीदार, लकच्या पावरा, ग्रामसेवक टी. पी. कन्हैया यांनी परिश्रम घेतले. या विशाल भंडाऱ्याचे हे १७वे वर्ष होते. 

गणोर (ता. शहादा) येथील संत कबीर आश्रमात सालाबादप्रमाणे या वर्षीही तोरणमाळ येथे जाणाऱ्या यात्रेकरूंना दोन दिवसांपर्यंत आश्रमात मंडप टाकून भोजन देण्यात आले. या वेळी श्री दर्शन साहेबजी, श्री शिवेंद्रसिंह साहेबजी व गणोर येथील समस्त भक्त समाजाने परिश्रम घेतले. श्री सच्चिदानंद सेवा संस्थेतर्फे सच्चिदानंद सिद्ध दिव्ययोग आश्रमातही विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. गुरू परमहंस स्वामी निखिलेश्वरानंद यांचे शिष्य स्वामी सच्चिदानंद ब्रह्मचारी व कमल तलावाजवळील श्री दत्त आखाड्याचे दगानाथजी महाराज गुजरातवाले यांनी भक्तांना दिव्य उपदेश दिला. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search