Next
मुक्ताबाईंच्या पालखीचे रोपळे गावात स्वागत; प्रथेप्रमाणे गावकऱ्यांकडून भोजन
BOI
Friday, July 20, 2018 | 04:12 PM
15 0 0
Share this storyसोलापूर :
मुखी हरिनामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाचा गजर करत पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत मुक्ताबाईंच्या पालखीचे शुक्रवारी (२० जुलै) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारात पंढरपूर तालुक्यातील रोपळे गावात आगमन झाले. गावकऱ्यांनी प्रेमाने दिलेल्या भोजनाने वारकरी तृप्त झाले. 

रोपळे गावाला अन्नदानाची खूप वर्षांपासूनची परंपरा आहे. संत मुक्ताबाईंच्या पालखीतील वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था अनोख्या पद्धतीने केली जाते. घराघरात तयार केलेले अन्न एकत्र करून त्याचा प्रसाद वारकऱ्यांसह गावकऱ्यांना दिला जातो. त्यामुळे जातिभेद शिल्लक राहत नाही, तिथे शिल्लक राहते ते केवळ प्रेम... म्हणूनच ‘तुका म्हणे काला, कोठे अभेद देखिला’ या ओवीची आठवण यावी असाच हा उपक्रम असतो. रोपळे (ता. पंढरपूर) येथील ग्रामस्थांनी दिलेल्या अशा प्रेमाच्या भोजनाने संत मुक्ताबाईंच्या पालखीतील वारकऱ्यांनी तृप्तीचा ढेकर दिला. या पालखीसोबत सुमारे सुमारे बाराशे वारकरी चालत असून, त्यात ७०० महिला वारकऱ्यांचा समावेश आहे. या पालखीला ३०९ वर्षांची परंपरा आहे. रात्रीचा ३४वा मुक्काम संपवून या पालखी सोहळ्याने शुक्रवारी पंढरपूर हद्दीत प्रवेश केला. रोपळे गावात हा पालखी सोहळा सकाळी नऊ वाजता दाखल झाला. या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गावातील प्रत्येकाच्या घरात बनवलेले अन्न एकत्र करण्यात आले होते. हा समारोपाचा काला नसला, तरी प्रत्येकाच्या घरातून आणलेले अन्न एकत्र करण्यात आले. हा प्रसाद संत मुक्ताबाईंच्या पालखीतील वारकऱ्यांना प्रेमाने देण्यात आला. वारकऱ्यांसोबतच ग्रामस्थांनीही या प्रसादाचा लाभ घेतला. ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळाचे सदस्य विश्वंभर महाराज कदम यांनी रोपळे गावातील अन्नदानाच्या परंपरेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘या गावात अगदी मध्यरात्री जरी एखादी दिंडी आली, तरी दिंडीतील सर्व वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था ग्रामस्थ करत असतात. संत मुक्ताबाईंच्या पालखीतील वारकऱ्यांना तर गावातील सर्वांच्या घरांत बनवलेले अन्न दिले जाते. यामध्ये कोणीही जात-पात बघत नाही. सर्वांच्या घरातील अन्नाचे सेवन वारकऱ्यांबरोबरच गावकरीही करतात. यामुळे आम्हाला मोठे समाधान मिळते.’ या पालखी सोहळ्यातील रवींद्र महाराज हरणे, विश्वस्त पंजाबराव पाटील, पंकज पाटील, समाधान भुजेकर, घुरे शास्त्री आदींचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी सरपंच दिनकर कदम, नागनाथ माळी, नारायण गायकवाड, विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक विलास भोसले, रोपळे विकास प्रतिष्ठानचे संचालक अर्जुन भोसले, विलास (ल.) भोसले, विश्वंभर कदम, तानाजी पवार, पोपट कदम, किशोर महामुनी, बाळासाहेब पवार, ग्रामसेवक श्री. नवले आदी मान्यवर उपस्थित होते. 

 (रोपळे गावातील मुक्ताबाईंच्या पालखीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
अतिशय सुंदर उपक्रम आहे About 217 Days ago
अतिशय सुंदर उपक्रम आहे
0
0

Select Language
Share Link