मुंबई : ‘दुबईमध्ये भारतीयांना व्हिसा ऑऩ अरायव्हल आणि परदेशी गुंतवणूकदारांसाठी दहा वर्षांचा अधिवास परवाना देण्याच्या निर्णयामुळे येथील अर्थयंत्रणेला चालना मिळेल’, असा विश्वास युनायटेड अरब एमिरेट्समधील (युएई) सर्वात मोठा उद्योगसमूह डॅन्यूब ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष रिझवान साजन यांनी व्यक्त केला आहे.

रिझवान साजन म्हणाले, ‘परकीय गुंतवणूकदार, पात्र व्यावसायिक आणि प्रतिभावान विद्यार्थी यांच्यासाठी दहा वर्षांपर्यंतचा अधिवासी परवाना; तसेच खाजगी कंपन्यांना १०० टक्के परकीय मालकी हक्क देण्याचा निर्णय युएई प्रशासनानं घेतला आहे. या निर्णयामुळे इथल्या रिअल इस्टेट बाजारपेठेमध्ये सर्वात जास्त गुंतवणूक होणे अपेक्षित आहे. अमेरिकेचा वैध व्हिसा किंवा ग्रीन कार्डसह भारतीय पासपोर्ट असणारे लोक यूएईमध्ये व्हिसा ऑऩ अरायव्हलसाठी पात्र ठरतील. या देशाचा पर्यटक व्हिसा १४ दिवसांसाठी वैध असेल, अतिरिक्त शुल्कासह त्याला एक विस्तार करण्याची मुभा मिळेल. दुबई लँड डिपार्टमेंटच्या (डीएलडी) आकडेवारीनुसार दुबईच्या रिअल इस्टेट बाजारपेठेमधील गुंतवणूकदारांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक असून, त्यांनी २०१३ ते २०१७ या पाच वर्षांच्या कालावधीत तब्बल ८३.६५ अब्ज दिरहॅमची गुंतवणूक केली आहे. येथील प्रशासनाच्या अंदाजपत्रकानुसार यूएई आणि भारत यांच्यातील व्यापार २०२०पर्यंत १०० बिलियन डॉलर्सपर्यंत जाईल.’
ते पुढे म्हणाले, ‘यूएईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी ही सर्वात योग्य वेळ आहे. कारण यूएई प्रशासनाने हे क्षेत्र व्हॅट लिस्टमधून काढून टाकले आहे. यामुळे मालमत्तांच्या किंमती घसरल्या आहेत. ‘दुबई २०२० एक्स्पो’पर्यंत त्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणे हा सर्वात सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे. यूएईचे आर्थिक भविष्य उज्ज्वल आहे. स्थिरता, परवडणारी किंमत, उत्तम वर्ग आणि आरामदायीपणा या गोष्टी येथे आहेत. दुबई हे सर्वात परवडणाऱ्या किंमतीत मालमत्ता घेण्याजोगे ठिकाण आहे.