Next
मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी सिंगापूरची कंपनी करणार मदत
शिष्टमंडळाने घेतली पाणी पुरवठामंत्री व अर्थमंत्र्यांची भेट
प्रेस रिलीज
Wednesday, June 19, 2019 | 03:43 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मराठवाडा वॉटर ग्रीडला सिंगापूरची कंपनी अर्थसाह्य करणार आहे. १० हजार ५९५ कोटींच्या मराठवाडा वॉटर ग्रीडच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सिंगापूर कंपनी अर्थसाह्य करण्यास तयार आहे,’ अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

मंत्रालयामध्ये सिंगापूर कंपनीच्या शिष्टमंडळाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री लोणीकर यांची भेट घेऊन मराठवाडा वॉटर ग्रीडसंदर्भात सविस्तर चर्चा केली. या शिष्टमंडळामध्ये घो शो जेम्स, विनेशकुमार नथाले, सुरेंनथीरा कुनरत्नम, कौशिक तांती व  शिवम शर्मा यांचा समावेश होता.

मराठवाड्यात पडणारा सततचा दुष्काळ, मराठवाड्याची भौगोलिक परिस्थिती, विभागाचा पाणी प्रश्न सोडण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीडची गरज, तसेच वॉटर ग्रीडच्या तांत्रिक विषयावर चर्चा केल्यानंतर सिंगापूरच्या शिष्टमंडळाने अर्थसाह्य करण्यास तयार असल्याचे लोणीकर यांनी सांगितले.

मेकरोट कंपनीने पिण्याचे पाणी व औद्योगिक वापरासाठी ग्रीड पद्धतीची योजना करण्याचा अहवाल सादर केला असून, ग्रीड निर्माण करण्याचा पर्याय सूचवला आहे. ३० वर्षांसाठी म्हणजे २०५०पर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्तावित आहे. २०५०मध्ये ९६० दशलक्ष घनमीटर एकूण पाण्याची आवश्यकता लागणार आहे. यामध्ये नागरी, ग्रामीण व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा समावेश करण्यात आला आहे.

मराठवाड्यात ग्रीडद्वारे अशुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी एक हजार ३३० किलोमीटर लांबीच्या मुख्य पाईपलाइनवर मराठवाड्यातील सर्व ११ धरण जोडण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रत्येक तालुक्यात दोन ते तीन ठिकाणापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी एकूण 3220 किलोमीटर पाईपलाइन टाकणे प्रस्तावित आहे. या पाईपलाइनपासून कोणत्याही गावाचे अंतर वीस ते पंचवीस किलोमीटर राहील, त्यामधून सर्व गावांना गरजेच्यावेळी पाणीपुरवठा करता येईल, असे नियोजन आहे. अशुद्ध पाणी मुख्य जलवाहिनीसाठी एकूण तीन हजार ८५५ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे. तालुकास्तरावर पाणी पोहोचविण्यासाठी दुय्यम जलवाहिनीसाठी अंदाजे चार हजार ७४ कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search