Next
अरुण टिकेकर, राजा बढे, म. द. हातकणंगलेकर, सिद्धेश्वरशास्त्री चित्राव
BOI
Thursday, February 01, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

समाजशास्त्राचे गाढे अभ्यासक असणारे विद्वान पत्रकार अरुण टिकेकर, अवघ्या मराठी जनतेच्या मनात स्फुल्लिंग पेटवणारं ‘जय जय महाराष्ट्र माझा’ लिहिणारे गीतकार राजा बढे, प्रसिद्ध समीक्षक म. द. हातकणंगलेकर आणि महामहोपाध्याय सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचा एक फेब्रुवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
......
अरुण टिकेकर 

एक फेब्रुवारी १९४४ रोजी जन्मलेले अरुण टिकेकर व्यासंगी पत्रकार आणि समाजशास्त्राचे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध होते. महाराष्ट्र टाइम्सचे सहसंपादक आणि लोकसत्ताचे संपादक म्हणून त्यांची पत्रकारितेची कारकीर्द लक्षणीय होती. 

जन-मन, तारतम्य, स्थलकाल, काल-मीमांसा, कालांतर, इति-आदि, विवेचन अशी त्यांची सदरं लोकप्रिय होती. त्यांचं ग्रंथांवर विलक्षण प्रेम होतं आणि मराठी व्याकरणाबाबत ते जागरूक असत. स्वातंत्र्यानंतरच्या पन्नास-साठ वर्षांत काय गमावलं आणि काय कमावलं याचा आलेख काढणारं त्यांचं ‘कालान्तर’ हे पुस्तक अंतर्मुख करणारं होतं.

अस्वस्थ महाराष्ट्र - दोन खंड, स्थल काल, ऐसा ज्ञानगुरू, अक्षरनिष्ठांची मांदियाळी, ग्रंथ-शोध आणि वाचनबोध, कालमीमांसा, फास्ट फॉरवर्ड, मुक्तानंद : स्मृतिग्रंथ, रानडे प्रबोधन-पुरुष, बखर मुंबई विद्यापीठाची, शहर पुणे खंड २, जन-मन – असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. त्यांना अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता. 

१९ जानेवारी २०१६ रोजी त्यांचं निधन झालं.
...............

राजा नीलकंठ बढे

एक फेब्रुवारी १९१२ रोजी नागपुरात जन्मलेले राजा बढे हे अभिरुचीसंपन्न कवी, गीतकार, लेखक, नाटककार आणि कादंबरीकार अशा विविध पैलूंमुळे लोकप्रिय असणारं व्यक्तिमत्त्व! सुरुवातीच्या काळात वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून पत्रकारिता केल्यावर त्यांनी आकाशवाणीवर काम केलं होतं. 

असं म्हणतात, की आजकाल सर्रास लोकप्रिय असलेल्या ‘कथाकथन’ प्रकाराची सुरुवात बढे यांनीच १९६४ साली मुंबईत केली होती आणि त्या कार्यक्रमात ‘पुलं’ आणि ‘गदिमा’ यांनी कथाकथन केलं होतं.

एकीकडे ‘कळीदार कपुरी पान, कोवळं छान, केशरी चुना’ अशी ठसकेबाज लावणी लिहिणारे राजा बढे तितक्याच सहजतेने ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ सारखं तडफदार गीतही लिहून जात.

अशी गंमत आहे, ओहोळ, किती रे दिन झाले, क्रांतिमाला, चतुर किती बायका, छंदमेघ, पेचप्रसंग, रसलीना, मखमल, मंदिका, माझिया माहेरा जा, योजनगंधा, वीणागीते, शृंगार श्रीरंग, शेफालिका, स्वप्नगंधा, हसले मनी चांदणे, ही रात सवत बाई असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

आठ एप्रिल १९७५ रोजी त्यांचं निधन झालं.
...............

म. द. हातकणंगलेकर 
एक फेब्रुवारी १९२७ रोजी हातकणंगलेमध्ये जन्मलेले मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर हे अत्यंत प्रसिद्ध मराठी समीक्षक! सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजचे प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. इंग्लिशचे प्रोफेसर म्हणून काम करत असताना त्यांनी गो. नी. दांडेकर यांची ‘माचीवरचा बुधा’ आणि व्यंकटेश माडगूळकर यांची ‘सती’ यांसारख्या कादंबऱ्यांची इंग्लिशमध्ये भाषांतरं करून मराठी भाषेला जागतिक स्तरावर नेण्याचं काम केलं होतं. 

साहित्यातील अधोरेखिते, साहित्य : प्रेरणा आणि प्रवाह, निवडक मराठी समीक्षा, मराठी कथा : रूप आणि परिसर, साहित्यविवेक, आठवणीतील माणसं, भाषणे आणि परीक्षणे, उघडझाप, विष्णु सखाराम खांडेकर, साहित्यसोबती, ‘जीएं’ची निवडक पत्रे (खंड १ ते ४), वाङ्मयीन शैली आणि तंत्र, निवडक ललित शिफारस, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

२००८ साली सांगलीमध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

२५ जानेवारी २०१५ रोजी त्यांचं निधन झालं. 
............

सिद्धेश्वरशास्त्री विष्णुशास्त्री चित्राव 

एक फेब्रुवारी १८९४ रोजी पुण्यात जन्मलेले पद्मश्री सिद्धेश्वरशास्त्री विष्णुशास्त्री चित्राव हे अत्यंत व्यासंगी प्राच्यविद्यापंडित आणि साहित्यकोशकार म्हणून प्रसिद्ध होते. 

त्यांना महामहोपाध्याय आणि विद्यानिधी अशा उपाध्यांनी गौरवण्यात आलं होतं. भारतीय चरित्रकोश मंडळाचे ते संस्थापक होते.  

प्राचीन भारतीय स्थलकोश, संपूर्ण ऋग्वेद संहितेचे मराठी भाषांतर, महाभाष्य शब्दकोश, पाणिनींच्या अष्टाध्यायीचा शब्दकोश असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

सात जानेवारी १९८४ रोजी त्यांचं निधन झालं. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link