Next
गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा आदिवासी मुलांसाठी प्रेरणादीप
BOI
Friday, August 03 | 12:44 PM
15 0 0
Share this story



फलोदे :
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या फलोदे गावात नुकताच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा पार पडला. या मुलांच्या पुढील वाटचालीसाठी हा सोहळा प्रेरणादीप ठरला. गावात १० वर्षांपासून कार्यरत असलेले शहीद राजगुरू ग्रंथालय आणि पुण्यातील ललित कला मंदिर सार्वजनिक संस्था यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

आदिवासी भागातील मुला-मुलींची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी, यासाठी शहीद राजगुरू ग्रंथालयाच्या माध्यमातून विविध विधायक उपक्रम राबविले जातात. त्यातीलच एक भाग म्हणून २९ जुलै २०१८ रोजी गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. इयत्ता बारावीत चांगले यश संपादन केलेल्या सचिन रढे, विशाल मोरमारे, राहुल भांगरे यांना आणि दहावीच्या परीक्षेत चांगले यश संपादन केलेल्या शर्मिला मेमाणे, सागर मेमाणे, सोनू भांगरे यांना या वेळी रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच अन्य १० मुला-मुलींनाही पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी परिसरातील सुमारे ५० विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.

या वेळी ललित कला मंदिर सार्वजनिक संस्थेच्या विश्वस्त वसुधा दिवेकर, फलोदे गावाच्या सरपंच मनीषा मेमाणे, किसान सभा संघटनेचे तालुका सचिव अशोक पेकारी, सामाजिक कार्यकर्ते बाळू वायाळ, फलोदे गावाच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष लीलाबाई मेमाणे व परिसरातील आदर्श शिक्षक काळू भांगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना वसुधा दिवेकर म्हणाल्या, ‘शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. आदिवासी भागातील मुला-मुलींना शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येऊन सहकार्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. सामाजिक कार्यकर्ते बाळू वायाळ यांनीही उपस्थित मुला-मुलींना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. सन्मानित केलेल्या विद्यार्थ्यांपैकी दोन मुला-मुलींनी सत्काराला उत्तर म्हणून छोटेखानी मनोगत व्यक्त केले.

‘गुणवंत मुला-मुलींना सन्मानित करणे हा ग्रंथालयाचा अत्यंत चांगला व अनुकरणीय उपक्रम आहे,’ असे कार्यक्रमाचे अध्यक्ष काळू भांगरे यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पेकारी यांनी केले, तर आभार दीपक रढे यांनी मानले. सुनील पेकारी, ज्योती पेकारी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Samir Gare About 16 Days ago
Nice work
0
0

Select Language
Share Link