Next
बंदीश सजवणारे अलंकार...
BOI
Tuesday, December 04, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story


भारतीय संगीतातलं ख्यालगायन आणि बंदीश यांची तोंडओळख आपण आधीच्या काही लेखांमधून करून घेतली. रागाचे मूळ नियम कायम ठेवून, प्रत्येक वेळी कलाकार आपल्या बुद्धिकौशल्यानं ख्याल नटवतात. रागातील ख्याल सादर करताना, प्रत्येक कलाकाराचा स्वत:चा असा एक विचार त्यामागे असतो.... ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी पाहू या बंदीश फुलवणाऱ्या अलंकारांबद्दल...
..............................
रागाच्या चौकटीत राहूनही, कलाकाराला आपल्या पद्धतीनं मांडणी करण्याची मुभा असल्यानं, प्रत्येक कलाकाराच्या प्रतिभेनुसार एकच राग निरनिराळ्या ढंगांत सादर केला जातो. यामुळेच ख्यालगायनात कलाकाराची कल्पनाशक्ती आणि प्रतिभा सामर्थ्य दिसून येतं.

ख्यालाच्या बंदिशीतील बोली भाषेतल्या हिंदी शब्दरचना आणि त्यांतील भावभावना यामुळे विलंबित ख्याल - द्रुत ख्याल यांच्या साहाय्यानं रागातून तयार होणारी स्वरशिल्पं रसिकांना आवडतात. कलाकार स्वत:च्या विचारांनी राग सजवत असल्यानं, त्यातल्या स्वत्वाला महत्त्व प्राप्त होतं. त्यात एक प्रकारची उत्स्फूर्तता (स्पॉन्टॅनिअस एक्स्प्रेशन) असते, जिवंतपणा असतो. त्यामुळे अगदी एकाच कलाकाराचा, तोच राग, निरनिराळ्या मैफलीत, प्रत्येक वेळी निराळा आनंद देऊन जातो. तसेच एकच राग निरनिराळ्या कलाकारांनी सादर केलेलाही श्रोत्यांना ऐकायला आवडतो. 

राग विविध अंगांनी कसा सजवला अथवा खुलवला जातो, ते पाहू या...
आलाप, तान, बोलआलाप, बोलतान, सरगम ही ख्यालाची बंदीश सजवणारी विविध अंगं आहेत. जणू काही बंदिशीला सजवणारे अलंकारच. या प्रत्येकाचं वेगळं असं वैशिष्ट्य आहे.  

आलाप : कोणत्याही रागाच्या सादरीकरणाची सुरुवात आलापानं होते. संथ लयीत गायलेल्या, वाजवलेल्या स्वरांनी हळूहळू रागाचं चित्र काढायला सुरुवात होते. सुरुवातीच्या आलापातून रागाचा उठाव दिसू लागतो आणि जाणकार कानसेन श्रोता लगेचच कोणता राग सुरू झाला, हे ओळखतो. हळूहळू आलापातून रागाचं पूर्ण चित्र साकारू लागतं. रागात वापरले जाणारे कोमल, तीव्र स्वर, न घेतलेले स्वर, स्वरांचा विशिष्ट लगाव, रागात लागणाऱ्या स्वरांचं अल्पत्व-बहुत्व (प्रमाण), रागाचं वैशिष्ट्य दाखवणारा खास स्वरसमूह-पकड, त्यातून व्यक्त होणारा रागाचा भाव (मूड) अशा अनेक गोष्टी उलगडून दाखवण्याची क्षमता या आलापात असते. आलापातून व्यक्त होणाऱ्या स्वरसंगतींमुळे, ऐकणाऱ्याच्या मनात रागस्वरूप ठसवलं जातं. आलापातून सर्व गुणवैशिष्ट्यांसकट रागाचं चित्र स्पष्ट होतं.

गायनामध्ये सुरुवातीचा रागदर्शक आलाप थोडा गायल्यावर, तालबद्ध बंदिशीबरोबर पुढील स्वराविष्कार रंगवला जातो. बंदिशीची स्थाई व अंतरा गाताना, आलापाच्या साहाय्यानं रंग भरला जातो. चालू असलेल्या तालाच्या आवर्तनात (दिलेल्या अवकाशात) आलापातून रंग भरून पुन्हा सम गाठणं, हा आनंददायी अनुभव असतो. सम गाठण्याच्या कलाकाराच्या कौशल्याला, रसिक श्रोत्यांकडून दाद दिली जाते. स्थाईमध्ये मंद्र व मध्य सप्तकात होणारा स्वराविष्काराचा प्रवास हळूहळू तार सप्तकाकडे होऊ लागतो आणि तार षड्जाला भिडल्यानंतर अंतऱ्याचा मुखडा घेतला जातो. हा तार सप्तकातील षड्ज, समेवरील शब्दानुसार कधी आकारात, कधी ईकारात, उकारात लावला जातो आणि त्याचा विशुद्ध गोडवा रसिकांना मोहून टाकतो. भरजरी रत्नहारातील लखलखत्या पदकाप्रमाणे, ही अंतऱ्याची सम गाठण्याची क्रिया आणि लावलेला तार षड्ज रसिकांना आनंद देतो. अंतऱ्यामध्ये रागाचं उत्तरांग दाखवून रागाचं चित्र पूर्ण केलं जातं. 

वाद्यवादनात मात्र ही आलापाची क्रिया तालाशिवाय जास्त वेळ केली जाते. सतार, सरोद, संतूर, बासरी यांच्या वादनात तर तालाशिवायचे हे आलाप पाऊण तास किंवा तासभरसुद्धा चालतात आणि मग तालाबरोबर सादरीकरण केलं जातं. रागाचं पूर्ण स्वरूप साकारण्याची क्षमता या आलापात असतेच, त्याचबरोबर कलाकाराच्या विचारांची, कल्पकतेची क्षमताही यात दिसून येते. त्यामुळे कलाकाराचा वैचारिक रियाज जितका जास्त सखोल, तितका तो कलाकार आलापातून राग खुलवू शकतो. त्याची सगळी कल्पनाशक्ती तो पणाला लावतो आणि रंजकतेनं राग सादर करतो. 

तान : आलापापेक्षा एकदम वेगळा स्वराविष्कार म्हणजे तान. रागाचे स्वर जलद गतीनं म्हणजेच द्रुत लयीत गायले, की त्याला तान म्हणतात. तानेलाही रागाच्या नियमांची चौकट असतेच. पण द्रुत लयीत फिरणे हे एकच वैशिष्ट्य तानेत असतं. तानेतून कलाकाराची तयारी, रियाज, आवाजावरची हुकमत दिसून येते. मोटार रेसमध्ये जसा ट्रॅक ठरलेला असतो आणि फक्त वेगाला महत्त्व असतं, त्याप्रमाणे रागाच्या आरोह-अवरोहाच्या ठरलेल्या ट्रॅकमधून तान द्रुत लयीत फिरते. मूळ तालाच्या लयीच्या दुप्पट, चौपट, आठपट अशी वेगानं तान फिरत असते आणि कलाकाराचं हे कसब श्रोत्यांना आश्चर्यचकित करतं. द्रुतगतीत गायलेले वा वाजवलेले स्वर स्पष्टपणे ऐकू येणं, लयीबरोबर तिचा डौल राखणं अशा वैशिष्ट्यांसह गायलेल्या तानेला, दाणेदार तान म्हटलं जातं.

बोलआलाप - बोलतान : सर्वसाधारणपणे आलाप आणि तान आकारात गायले जातात, तर बंदिशींचे शब्द गुंफून घेतलेल्या आलाप-तानेला बोलआलाप - बोलतान म्हणतात. या सादरीकरणाला लयकारीची जोड असते. त्यामुळे बोलआलाप किंवा बोलतान गाऊन समेवर येण्याचा प्रवास जास्त थरारक असतो आणि कलाकाराची स्वराबरोबरच तालावरील असलेली हुकमत दाखवून देतो. आलाप तानेसह बंदीश रंगवताना, केवळ तालाचा ठेका धरलेला तबलजी, बोलआलाप बोलतानेबरोबर आपलं कसब दाखवू लागतो आणि कलाकाराची तबलजीबरोबर जुगलबंदी रंगते. यात शब्द, सूर, लय, ताल या सर्वांचा सुंदर मिलाफ अनुभवता येतो.

ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रेसरगम : याच टप्प्यावर गायक कलाकार आलापाचं, तानेचं नोटेशन (स्वराच्या नावासह... सा रे ग...) गाऊ लागतो. यालाही लयकारीची जोड असते. याला सरगम करणं असं म्हणतात. काही कलाकार या सरगम करण्यामध्ये माहीर असतात. ज्येष्ठ गायिका विदुषी प्रभाताई अत्रे यांनी सरगम या अंगाचा विशेष अभ्यास करून, सरगम जास्त लोकप्रिय केली. त्यांनी गायलेली रसपूर्ण मधुर सरगम रसिकांना विशेष आनंद देऊन जाते. आजकाल काही कलाकार लयकारीचा अतिरेक करत सरगम म्हणताना दिसून येतात. ती केवळ एक सर्कस वाटू लागते. स्वरांचं माधुर्य कायम ठेवून केलेली सरगम वेगळाच आनंद देऊन जाते.

अशा प्रकारे राग नटवताना आलाप, तान, बोलआलाप, बोलतान, सरगम अशा विविध अलंकारांचा वापर केला जातो. यापैकी एक एक अंगाला प्राधान्य देत, राग सादर करण्याच्या वैशिष्ट्यांमुळे गायन-वादनाच्या विविध शैली निर्माण झाल्या आणि याच विविध शैलींची घराणी तयार झाली. या घराण्यांबद्दल पुढे कधी जाणून घेऊ या.

तोपर्यंत ऐका.... प्रभाताई अत्रे यांचा राग मारुबिहाग किंवा कलावती. मालिनीताई राजुरकर यांचा राग भूप किंवा कौशिकरंजनी...

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होईल. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link