Next
‘संभाजीराजांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणार’
प्रेस रिलीज
Monday, March 19, 2018 | 04:49 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेले कर्तृत्व, समाजासाठी व धर्मासाठी दिलेले बलिदान सबंध देशाला प्रेरणादायी आहे. त्यांचे कार्य आणि बलिदान नव्या पिढीला कळावे, यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी लवकरच अभ्यास मंडळाशी बैठक घेऊन त्याबाबत निर्णय घेऊ; तसेच, श्री क्षेत्र वढू-तुळापूर येथे संभाजीराजांचे संग्रहालय उभारण्यासह शासकीय मानवंदना तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू," असे आश्वासन राज्याचे शालेय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिले.

पुणे जिल्हा परिषद, हवेली पंचायत समिती आणि श्री क्षेत्र तुळापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३२९ व्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरण दिन शनिवारी (१७ मार्च) श्री क्षेत्र तुळापूर येथे आयोजित केला होता. या प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, वर्षा तावडे, खासदार आढळराव पाटील, शिरूरचे आमदार बाबुराव पाचर्णे, माजी आमदार बापुसाहेब पठारे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, तुळापूरचे सरपंच गणेश पुजारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, पोलीस अधीक्षक सुवेज हक, हवेली पंचायत समितीच्या सभापती वैशाली महाडिक, उपसरपंच राहुल राऊत, माजी सरपंच रूपेशबापू शिवले, माजी उपसरपंच अमोल शिवले, शंभूराजे पालखी सोहळ्याचे प्रमुख संदीप भोंडवे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

तावडे म्हणाले, ‘संभाजीराजांचे कार्यकर्तृत्व एवढे आहे की, त्यांच्यासाठी कितीही केले तरी कमीच आहे. महाराजांचे शौर्य, धाडस आजच्या तरुणांना प्रेरणा देते. शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा इतिहास अभ्यासला, तर त्यातून आपल्या स्फूर्ती मिळते. वढू-तुळापूरची भूमी संभाजीराजांच्या आयुष्यातील अखेरच्या क्षणाची सोबती आहे. त्यामुळे वढू-तुळापूरला पर्यटन व ऐतिहासिक वारसा म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी स्थानिक आमदार आणि ग्रामस्थांनी थोडा पाठपुरावा करावा.’

या वेळी तावडे यांनी येथील संभाजी महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला व शाळेच्या अडचणी समजून घेत येत्या वर्षात येथे प्रयोगशाळा आणि अन्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

पाचरणे म्हणाले, ‘इंद्रायणी-भीमेच्या तीरावर वढू-तुळापूर असे एकत्रित तीर्थक्षेत्र व्हावे, या दोन गावांना जोडण्यासाठी पूल व्हावा, यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. त्याचबरोबर आजच्या दिवशी संभाजी राजांना दोन्ही ठिकाणी शासकीय मानवंदना देण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या मागण्या लवकरच मान्य होतील.’

पुजारी म्हणाले, ‘श्री क्षेत्र वढू-तुळापूरला तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा द्यावा, वढू-तुळापूरला जोडणारा पूल उभारावा. वढूप्रमाणे तुळापूर येथेही शासकीय मानवंदना द्यावी आणि संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. संभाजी महाराजांची समाधी, साखळदंड आणि सगळा इतिहास येणाऱ्या शंभुभक्तांना पहाता यावा, यासाठी संग्रहालय उभारायचे आहे.’

श्री संगमेश्वराचा अभिषेक व श्री छत्रपती शंभुराजांची पूजेने पुण्यस्मरण सोहळ्याची सुरुवात झाली. विनोद तावडे, वर्षा तावडे व मान्यवरांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या समाधीची, साखळदंडाची पूजा झाली व पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ह.भ.प. रोहिदास महाराज हांडे, शिवव्याख्याते गजानन वाव्हळ, शिवशाहीर वैभव घरत, शंभुव्याख्यात्या ह.भ.प. गितांजली झेंडे यांचे व्याख्यान झाले. श्री क्षेत्र पुरंदर ते श्री क्षेत्र तुळापूर या मार्गाने आलेल्या छत्रपती श्री संभाजी महाराज पालखीचे दिमाखात स्वागत झाले. शिवाजी महाराजांसमवेतच्या मावळ्यांच्या वंशजांना यावेळी सन्मानित करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.

पुण्यस्मरणदिन यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह समस्त तुळापूर ग्रामस्थांतर्फे कठोर मेहनत घेतली. भगव्या टोप्या, पताका आणि संभाजी राजांच्या घोषणांनी परिसर शंभुमय झाला होता.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link