Next
‘लघुपटाच्या माध्यमातून देशाला ऑस्कर मिळू शकतो’
उज्ज्वल निरगुडकर यांनी व्यक्त केला विश्वास
BOI
Saturday, June 08, 2019 | 04:01 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘लघुपट हे तरुणांचे माध्यम आहे. या माध्यमातून तरुण आज व्यक्त होत आहेत; परंतु त्याला ज्या प्रमाणात हवे त्या प्रमाणात महत्त्व दिले जात नाही. ऑस्कर पुरस्कारांमध्येही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. लघुपटाच्या माध्यमातून भविष्यात देशाला ऑस्कर पुरस्कार मिळू शकतो,’ असा विश्वास ऑस्कर पुरस्कारांचे परीक्षक उज्ज्वल निरगुडकर यांनी व्यक्त केले.

आम्ही पुणेकर आणि मराठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नवव्या पुणे लघुपट महोत्सवाचे उद्घाटन उज्ज्वल निरगुडकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव, समीर देसाई उपस्थित होते.

निरगुडकर म्हणाले, ‘ऑस्कर पुरस्कारांमध्ये आपण केवळ विदेशी चित्रपट विभागावरच लक्ष देतो; परंतु ऑस्कर पुरस्कारांमध्ये असलेल्या चार इतर विभागांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हे सर्व विभाग माहितीपट आणि लघुपटांच्या संदर्भातील आहेत; परंतु गेल्या अनेक वर्षांपासून याकडे आपण दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला ऑस्कर मिळू शकलेले नाही. लघुपट तरुणांचे माध्यम आहे. या माध्यमातून तरुण व्यक्त होऊ पाहत आहे. या माध्यमाकडे आपण चांगल्या पद्धतीने लक्ष दिले, तर एके दिवशी आपण या भागातून ऑस्कर पुरस्कारही जिंकू शकतो.’

‘ज्याप्रमाणे आपण ऑलम्पिक स्पर्धांना महत्त्व देतो त्याचप्रमाणे ऑस्कर पुरस्कार, कान्स आणि बर्लिन चित्रपट महोत्सवांनाही दिले पाहिजे. यासाठी खेळामध्ये ऑलम्पिक  पदक जिंकण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते त्याच प्रमाणे अशा महोत्सवात आणि पुरस्कारांमध्ये आपल्या देशाचे नाव उंचावण्यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची आज गरज आहे,’ असे निरगुडकर यांनी या वेळी नमूद केले.

प्रभात रोडवरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे नऊ जूनपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवामध्ये विविध देशांतील १००हून अधिक लघुपट दाखविले जाणार आहेत. नऊ जूनला सायंकाळी चार वाजता महोत्सवाचे पारितोषिक वितरण होईल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search