Next
‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचा ठाण्यात शुभारंभ
दत्ता पाटील
Thursday, August 16, 2018 | 02:50 PM
15 0 0
Share this article:ठाणे :
महाराष्ट्र सरकारच्या ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाचा आरंभ ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते नियोजन भवन सभागृहात स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट २०१८) करण्यात आला. या वेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. ‘युनिसेफ’च्या सहयोगाने, तसेच उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभाग व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या प्रसंगी शहापूर तालुक्यातील दत्तात्रय पाटील आणि ठाण्यातील अपूर्वा सणस या विद्यार्थ्यांची प्रातिनिधिक नोंदणी करण्यात आली. पालकमंत्र्यांनी या वेळी बोलताना ‘या उपक्रमाद्वारे सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल,’ असे सांगितले. ‘विद्यार्थ्यांमार्फत या योजना लोकांपर्यंत नेण्याचा हा उपक्रम ठाणे जिल्ह्यात निश्चितपणे यशस्वी होईल,’ असे उद्गार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काढले. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार म्हणाले, ‘बऱ्याचदा योजनांची परिपूर्ण माहिती लोकांना नसते. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून शासनाच्या योजना जनतेपर्यंत नेण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे.’ 

या वेळी या उपक्रमाची व्हिडिओ क्लिप उपस्थितांना दाखविण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थी, तसेच पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा माहिती अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

‘युवा माहिती दूत’ उपक्रमाची वैशिष्ट्ये

विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत थेटपणे पोहोचविणे हे ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. आजमितीला शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार मुख्यत्वे वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि रेडिओ यांच्यामार्फत केला जातो. सोशल मीडियाचा होणारा उपयोग मर्यादित स्वरूपाचा आहे. शिवाय, शासकीय योजनांचे बहुतांश प्रस्तावित लाभार्थी अर्धशिक्षित, दारिद्र्यरेषेखालील आणि दुर्गम भागातील असल्याने वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी संच अथवा रेडिओ ही माध्यमे ते वापरतात असे नाही. प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यत न पोहोचणाऱ्या शासकीय योजना दुहेरी संवादातून त्यांच्यापर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी समाजकार्याची आवड असलेल्या उत्साही तरुण वर्गाचे साह्य घेणे हा ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे.

उपक्रमासाठी स्वेच्छेने तयार असलेले किंवा निवडण्यात आलेले विद्यार्थी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी राज्य सरकारचे युवा माहिती दूत असतील. या कालावधीत किमान ५० प्रस्तावित लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासाठी लागू असणाऱ्या योजनांची माहिती ते देतील. युवा माहिती दूत म्हणून काम केल्यामुळे राज्य सरकारकरिता काम करण्याची महत्त्वाची संधी लोकांना मिळेल. ‘युवा माहिती दूत’ अशी ओळख राज्य सरकारच्या वतीने त्यांना सहा महिन्यांकरिता देण्यात येईल. ठरवून दिलेले काम केल्यानंतर या युवा माहिती दूतांना शासनाचे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, उच्च शिक्षण विभाग आणि तंत्रशिक्षण विभाग यांच्या सहकार्याने मोबाइल ॲप तयार करण्यात आले आहे. या उपक्रमात महाविद्यालयीन युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search