Next
‘करव्यवस्था सुधारणेसाठी करसल्लागारांनी पुढाकार घ्यावा’
‘टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन’तर्फे राष्ट्रीय कर परिषदेचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Monday, May 13, 2019 | 05:27 PM
15 0 0
Share this article:

दीपप्रज्वलन करताना डावीकडून नवनीतलाल बोरा, दीपक शहा, संतोष फिरोदिया, गिरीश बापट, अनघा कुलकर्णी, नरेंद्र सोनावणे, डॉ. अशोक सराफ, आनंद पसारी.

पुणे : ‘करदात्यांच्या पैशांवरच शासन चालत असते. त्यामुळे अधिकाधिक कर संकलन व्हायला हवे. करसल्लागार हे करदाते आणि शासन यांच्यातील दुवा असल्याने त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. अधिकाधिक कर संकलन व्हावे, यासाठी शासन स्तरावर करव्यवस्था सुधारण्यावर भर दिला जात आहे. या सुधारणेसाठी करसल्लागारांनी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. 

ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स-एआयएफटीपी (पश्चिम विभाग), दी वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पुणे (डब्लूएमटीपीए) आणि गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (जीएसटीपीएएम) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ज्ञानसंगम’ या दोन दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते होते. या वेळी ‘एआयएफटीपी’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक सराफ, सरचिटणीस आनंद पसारी, उद्योजक संतोष फिरोदिया, ‘एआयएफटीपी’चे विभागीय अध्यक्ष सीए दीपक शहा, ‘डब्लूएमटीपीए’चे अध्यक्ष नवनीतलाल बोरा, ‘जीएसटीपीएएम’चे उपाध्यक्ष अॅड. दिनेश तांबडे, परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र सोनावणे, समन्वयिका अनघा कुलकर्णी, श्रीपाद बेदरकर आदी मान्यवर उपस्थित होते. या परिषदेत सहा प्रबंध सादर करण्यात आले; तसेच एक चर्चासत्र झाले.

गिरीश बापट यांना सन्मानित करताना डावीकडून नवनीतलाल बोरा, नरेंद्र सोनावणे, गिरीश बापट, डॉ. अशोक सराफ, संतोष फिरोदिया, आनंद पसारी.

बापट म्हणाले, ‘कर व्यवस्थेमध्ये अडचणी असल्याने करदात्यांना त्रास सहन करावा लागतो. ही व्यवस्था आणखी चांगली करण्यासाठी शासन नियमित प्रयत्नशील आहे. ‘एक देश एक कर’ या तत्त्वानुसार ‘जीएसटी’ कायदा आणला आहे. यामुळे बऱ्याच अंशी सुसूत्रता येत आहे. त्यात आणखी काही बदल करावे लागतील. त्यासाठी अशा प्रकारच्या परिषदा उपयुक्त ठरतील. कर व्यवस्थेविषयीच्या अडचणींचा अभ्यास करून त्यात आवश्यक बदलांसाठी आपण अर्थमंत्रालयाशी चर्चा करू शकतो.’


डॉ. सराफ म्हणाले, ‘कर रचनेवर आपण अनेक परिषदा, चर्चासत्रे घेतो; मात्र त्यातील ज्ञान तेवढ्यापुरते मर्यादित न राहता भविष्यातही त्यातील मुद्दे उपयुक्त ठरावेत, यासाठी त्याचे दस्तावेज (डॉक्यूमेंटेशन) करून ठेवले पाहिजे. कर भरण्यासंदर्भात आपल्या मानसिकतेत बदल व्हायला हवेत. करदात्यांना आपण नियमित आणि योग्य कर भरण्याचा सल्ला दिला पाहिजे. ‘जीएसटी’ हा कायदा चांगला असून, सुरुवातीला त्यात अडचणी येत आहेत. पण हळूहळू त्यात सुसूत्रता येईल.’

आनंद पसारी, नवनीतलाल बोरा यांनीही मनोगत व्यक्त केले. नरेंद्र सोनावणे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सीए दीपक शहा यांनी परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. गौरी मांजरेकर यांनी सूत्रसंचालन केले. श्रीपाद बेदरकर यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search