Next
‘प्रशासनातील संवेदनशील व्यक्तींनी वंचितांच्या आयुष्यात कविता फुलवावी’
BOI
Monday, January 29 | 03:32 PM
15 0 0
Share this story

सतीश राऊत लिखित ‘पाझर हृदयाचा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी (डावीकडून) मंदार जोगळेकर, अरुण शेवते, सतीश राऊत, रामदास फुटाणे, डॉ. अक्षयकुमार काळे, सचिन ईटकर आणि उद्धव कानडे.

पुणे : ‘प्रशासनात कार्यरत असताना विविध पदांवर आणि विविध विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळते. आपण जनतेचे प्रतिनिधी असून, समाजातील वंचितांचे, दुर्लक्षितांचे प्रश्न सोडवायला आपण या पदावर काम करीत आहोत, अशी प्रामाणिक भूमिका घेऊन प्रशासनातील संवेदनशील व्यक्तींनी वंचितांच्या आयुष्यात कविता फुलवावी,’ असे मत माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. 

प्रशासकीय अधिकारी असलेले सतीश राऊत यांनी लिहिलेल्या आणि ‘बुकगंगा पब्लिकेशन्स’ने प्रकाशित केलेल्या ‘पाझर हृदयाचा’ या कवितासंग्रहाचे प्रिंट बुक, ई-बुक आणि ऑडिओ बुक अशा तिन्ही स्वरूपात प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. २७ जानेवारी रोजी झालेला हा सोहळा महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा आणि बुकगंगा पब्लिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, अध्यक्ष उद्धव कानडे, कवी अरुण शेवते आणि ‘बुकगंगा’चे सीईओ मंदार जोगळेकर उपस्थित होते. 

या वेळी शरद पवार म्हणाले, ‘मी सतत नवोदित कवींच्या शोधात असतो. त्यांच्या कविता ऐकायला मला आवडतात. कारण त्यांच्या कवितेत धग असते. मर्ढेकर आणि तांबे हे श्रेष्ठ कवी होतेच. परंतु अलीकडील नवोदित आणि बंडखोर कवी ज्या प्रकारे समाजातील उपेक्षितांच्या आणि वंचितांचे दुःख मांडत आहेत, त्यावरून साहित्याला नवी दिशा मिळत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. राऊत यांच्यासारख्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता जपत समाजातील पीडितांचे, वंचितांचे दुःख त्यांच्या साहित्यरुचीनुसार कविता, कथा-कादंबऱ्या आदी साहित्यप्रकारांतून मांडावे. तसेच त्यांनी त्यांच्या प्रशासकीय अधिकारांचा उपयोग करून समाजातील तळागाळातील घटकातील समाजात कवितांचे मळे फुलवावेत. बंडखोर कवींची कविता हेलावून आणि हादरून टाकते. विचार करायला प्रवृत्त करते. राऊत यांनी लिहिलेल्या छावणी, निवडणूक, दुष्काळ या कवितांवरून सर्वसामान्यांचे दुःख हे त्यांच्या कवितांचे प्रेरणास्थान असल्याचे लक्षात येते. आमच्यासारख्या सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांच्या आयुष्यात अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते किंवा काही प्रसंगांचे साक्षीदार व्हायला मिळते. अशा अनेक प्रसंगांत काव्य दडलेले असते. चर्मकार, भटक्या-विमुक्त जातीतील अनेक कवी पुढे येऊ पाहत आहेत, हे आशादायी चित्र आहे. या समाजातील नागरिकांच्या अनेक पिढ्या पुस्तक, साहित्य, कविता याच्या जवळपास फिरकल्या नव्हत्या. परंतु त्या सर्व दबलेल्या भावनांना आता आवाज फुटत आहे.’ 

लेखक, समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे म्हणाले, ‘राऊत यांच्या कवितांचा पिंड सामाजिक आहे. समाज हा त्यांच्या कवितांचा केंद्रबिंदू आहे. मराठी साहित्यात श्रेष्ठ काव्य म्हणून सामाजिक कवितांना स्थान मिळालेले आहे. प्राचीन काव्याच्या परंपरेकडे पाहिले, तरी आपल्याला हेच काव्य श्रेष्ठ असल्याचे पुरावे मिळतात. आधुनिक कवीदेखील संतांच्या सामाजिक परंपरेतून येणाऱ्या कवितांपुढे नतमस्तक झालेले दिसून येतात. संत परंपरेतून आलेल्या काव्यातदेखील सामाजिक काव्य असल्याने ती कविता चिरकाल टिकणारी आहे. हस्तिदंती मनोऱ्यात राहून कवी वास्तवाच्या जवळ जाणारी कविता लिहू शकत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष ते दाहक वास्तव जगलेले असले पाहिजे. समाजात मिसळावेच लागते, नाहीतर ती केवळ अलौकिकाची कविता होते, लौकिकाची होत नाही. राऊत यांच्या कवितेची नाळ समाजाभिमुखतेशी जोडलेली आढळते. दिव्याखालचा अंधार ते लपवत नाहीत.’

‘बुकगंगा’चे सीईओ मंदार जोगळेकर म्हणाले, ‘लेखक कसा आहे, हे वाचकांनी ठरवावे, प्रकाशकांनी नव्हे, असे मला वाटते. आम्ही साहित्य लोकांपर्यंत पोहोचवू अशी आमची भूमिका आहे. मामुर्डीसारख्या छोट्या गावातून आलेल्या सतीश राऊत यांनी लिहिलेल्या कविता संवेदनशील, समाजभान असलेल्या कवीची साक्ष देतात. त्यामुळे हे साहित्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, असे आम्हाला वाटले आणि हे पुस्तक प्रकाशित करण्याचे निश्चित केले. ते कविता वाचत असताना लक्षात आले, की त्यांचा आवाजही चांगला आहे. त्यामुळे ऑडिओ बुक करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली. मराठी माध्यमातील मुले कमी होत आहेत, नवीन पिढीला वाचायला आवडत नाही. अशा वेळी ऑडिओ बुक हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे ऑडिओ बुकच्या निर्मितीवरही भर देत आहोत. ई-बुकच्या माध्यमातून साहित्य जतन होते. त्यामुळे ई-बुक स्वरूपातही हे पुस्तक प्रकाशित केले आहे. प्रिंट, ऑडिओ आणि ई-बुक अशा तिन्ही माध्यमांतून प्रकाशित होत असलेला हा पहिलाच कवितासंग्रह आहे. गावागावातील लेखक, कवी यांना व्यासपीठ मिळाले पाहिजे. वाचनसंस्कृती लोप पावतेय असे म्हटले जाते ते चुकीचे आहे. छोट्या गावांमधील लोकांपर्यंत पुस्तके पोहोचतच नाहीत. त्यांच्यापर्यंत पुस्तके पोहोचवण्यासाठी ‘बुकगंगा’ची स्थापना झाली. मराठी भाषा जपली पाहिजे यासाठी सकारात्मक पद्धतीने आम्ही काम करत आहोत, सर्वांच्या पाठिंब्यावर हे काम सुरू आहे. 

कवी सतीश राऊत यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले, तसेच काही कवितांची झलक सादर केली. या काव्यसंग्रहातील काही निवडक कविता वि. दा. पिंगळे, रमणी सोनवणे, भरत दौंडकर, अरुण शेवते आणि उद्धव कानडे यांनी सादर केल्या. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ‘वात्रटिका’कार रामदास फुटाणे यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. वसुंधरा काशीकर यांनी सूत्रसंचालन केले, तर ‘बुकगंगा’च्या सुप्रिया लिमये यांनी आभारप्रदर्शन केले. 

(‘पाझर हृदयाचा’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशनावेळी सतीश राऊत यांनी व्यक्त केलेल्या मनोगताचा, त्यांच्या कवितांचा, प्रकाशन सोहळ्याचा आणि शरद पवार व मंदार जोगळेकर यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत. ‘पाझर हृदयाचा’ हा कवितासंग्रह ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी किंवा त्याचे ई-बुक व ऑडिओ बुक डाउननोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.) 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link