Next
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं...!
मोहन काळे
Monday, April 09, 2018 | 01:02 PM
15 0 0
Share this story

वाडी रत्नागिरी (कोल्हापूर) : दख्खनचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्योतिबाच्या दर्शनासाठी रविवारी (आठ एप्रिल) रोजी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भाविकांनी गुलाल-खोबऱ्याची उधळण करून ‘ज्योतिबाच्या नावानं चांगभलं’ असा गजर केला. 

या वेळी चैत्र महिन्यातील रविवारीच अष्टमी आल्याचा योगायोग होता. ज्योतिबाची मुख्य यात्रा चैत्र पौर्णिमेला असते. या दिवशी ज्या भाविकांना यात्रेला येणे जमले नाही, असे भाविक अष्टमीला ज्योतिबाच्या दर्शनासाठी वाडी रत्नागिरीच्या डोंगरावर हमखास जमतात. रविवारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविकांबरोबरच आंध्र प्रदेश व कर्नाटकातील भाविकांनी आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. राज्य परिवहन महामंडळाने भाविकांच्या सोयीसाठी कोल्हापूर ते ज्योतिबापर्यंत जादा एसटी बसेस सोडल्या होत्या. या मार्गावर खासगी वाहतूक पूर्ण बंद असल्यामुळे एसटीला मोठी गर्दी होती. काही भाविक स्वतः गाड्या करून आले होते. काही हौशी भाविक अजूनही बैलगाड्या सजवून यात्रेला आल्याचे चित्र दिसते. 

कोल्हापूरला येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या व एसटी बसेस भाविकांनी खचाखच भरून येत होत्या. ज्योतिबाचे दर्शन झाल्यावर भाविकांनी यमाई देवीचेही दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, काही मानाच्या आसनकाठ्यांची भाविकांनी वाजत-गाजत मिरवणूक काढली. सायंकाळी श्रींच्या पालखीचा छबिना निघाला. वाजत गाजत निघालेला हा सोहळा डोळ्यांत साठवून भाविक परतीच्या प्रवासाला निघाले. सायंकाळी ज्योतिबाच्या भक्तांनी घरोघरी आंबिलाची पूजा करून त्याच्या प्रसादाचे वाटप केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link