सोलापूर : जिल्हा परिषदेने पंतप्रधान आवास योजनेतून एक हजार ४८, तर राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेतून तीन हजार ७०९ घरकुले उभारली आहेत. त्याबद्दल ग्रामीण विकास यंत्रणेच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात नुकताच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांचा विशेष सत्कार केला.
या प्रसंगी नवाळे म्हणाले, ‘पंतप्रधान आवास योजनेत सोलापूर जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे. राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेत सोलापूर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्याच्या या कामगिरीत सांगोला पंचायत समितीने एक हजार ६२९ आणि माळशिरसने एक हजार ६२६ घरकुले उभारली आहेत. पूर्ण घरकुलांच्या संख्येत राज्यात माळशिरस पंचायत समिती दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या दोन वर्षांत पंचायत समितीने रमाई, पारधी घरकुल योजनेत ५१३ घरकुले पूर्ण केली आहेत. उत्तर सोलापूर पंचायत समिती सहाव्या आणि करमाळा पंचायत समिती आठव्या क्रमांकावर आहे. त्यांनी अनुक्रमे ४४१ आणि ४१५ घरकुले उभारली.’
सोलापूर जिल्ह्याच्या कामगिरीबद्दल नवी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन आणि ग्रामविकास विभाग सचिव असिम गुप्ता, राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी यांच्या हस्ते नवाळे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सांगोला गटविकास अधिकारी संतोष राऊत आणि माळशिरस गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांचाही सत्कार करण्यात आला.
ग्रामीण विकास यंत्रणेच्या कामकाजाबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनीही अभिनंदन केले आहे.