Next
ध्येयप्राप्तीचे इंगित सांगणारे पुस्तक
प्रसन्न पेठे (Prasanna.pethe@myvishwa.com)
Friday, March 23, 2018 | 11:53 AM
15 0 0
Share this story

कुठलंही ध्येय ठरवताना हा विचार करणं आवश्यक आहे, की ‘मी हे ध्येय का निवडतोय? हे ध्येय पूर्ण करण्यासाठी कुठले कुठले मार्ग आहेत? आणि त्या मार्गावरून चालण्यासाठी माझ्याकडे काय काय शस्त्रं आहेत, माझी बलस्थानं काय आहेत?’ - या तीन गोष्टींचा विचार करून आपण कामाला लागलो, तर अशक्यप्राय असं काही नसतं आणि ध्येयपूर्तीचा आनंद नक्की मिळतो. ही गोष्ट मनोज अंबिके यांनी त्यांच्या ‘ध्येयामागील ध्येय’ या पुस्तकातून सहज आणि भरपूर उदाहरणं देऊन सांगितली आहे.. त्या पुस्तकाचा हा परिचय...
..............
स्वतः व्यवस्थापकीय सल्लागार आणि तज्ज्ञ प्रशिक्षक असणाऱ्या मनोज अंबिके यांनी दैनंदिन व्यवहारातली चपखल उदाहरणं देऊन, यशस्वी होण्यासाठी ध्येयनिश्चिती कशी करावी आणि त्यासाठी आवश्यक ती तयारी कशी करावी, हे ‘ध्येयामागील ध्येय’ या पुस्तकाच्या २४ प्रकरणांमधून सोप्या शब्दांत उलगडून सांगितलंय. 

नक्की यशस्वी कोण किंवा यशाची व्याख्या काय यासंबंधी ते म्हणतात, ‘क्षणभर विचार करून बघा. ही पृथ्वी म्हणजे मॉल आहे. या मॉलमध्ये मला नक्की काय मिळवायचं आहे हे माहीत नाही. मग आपल्याला जे नजरेला येईल तिकडे आपण आकृष्ट व्हायला लागतो. अनेकदा ती गोष्ट चुकीची असते, अयोग्य असते असं नाही; पण ती गोष्ट खरंच मला पहिजे का आणि किती तीव्रतेने पाहिजे हे माहीत नसल्यामुळे किंवा त्याच्यावर विचार न झाल्यामुळे ज्या गोष्टीची जास्त आवश्यकता आहे तिथे आपण पोहोचतोच असं नाही. ज्याच्या जीवनात ध्येय असतं आणि ज्याच्या जीवनात निश्चित ध्येय नसतं त्यांच्या जीवनात हाच फरक आहे...’ 

ते म्हणतात, ‘आपल्या आयुष्यात आपल्याला दोन गोष्टी कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एक, मला कुठे पोहोचायचं आहे आणि दुसरं, आत्ता मी कुठे आहे. यामध्ये ‘आत्ता मी कुठे आहे?’ हे फार महत्त्वाचं! वास्तवाची जाणीव असायला हवी. आपल्या सामर्थ्याची जाणीव असायला हवी.’ 

‘ध्येय प्राप्त करण्यासाठी ‘बांधिलकी’ फार महत्त्वाची. आपण जे ठरवू ते करणं आणि ते करायची जिद्द स्वतःच्या मनात असणं महत्त्वाचं. ध्येयाचं नियोजन करताना वेळेचं आणि शक्तीचं गणित महत्त्वाचं, तसंच दूरध्येयदृष्टी असणं महत्त्वाचं ठरतं,’ असंही त्यांनी म्हटलं आहे. 

‘इंग्लिशमध्ये ‘3-B किंवा बीबीबी’ ज्याला म्हणतात ते ‘ब्रेकिंग बॅक ब्रिज’ म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादं काम सोडायची इच्छा येईल, मधूनच हे काम सोडून द्यावं असं वाटेल, तेव्हा मागे जाण्याचा ब्रिज ब्रेक करा. मागचे पूल तोडून टाका. आता मागे जाणे नाही. कारण मागे जायला रस्ताच नाही,’ असंही ते सांगतात.

अंबिके यांनी त्यांचे मुद्दे विशद करताना ‘दिशा बदला, दशा बदलेल! ध्येय बदला, परिणाम बदलेल!’ यांसारखी चमकदार वाक्यं वापरली आहेत, ज्यामुळे मुद्दा अधोरेखित तर होतोच; पण तो समजायला चांगली मदत होते.

‘कामांचा प्राधान्यक्रम (प्रायॉरिटी) ठरवा. परेटो अॅनॅलिसिस (८०-२० रेशो) पद्धत वापरायला शिका. धरसोड किंवा चालढकल करण्याची वृत्ती सोडा. आत्मपरीक्षण करा,’ असे मुद्दे त्यांनी मांडले आहेत. 

पुस्तकाच्या अखेरीस ‘मल्टिटास्किंग’, ‘गोल सेटिंग’, ‘सकारात्मकता’ अशा विषयांवर त्यांनी विचार मांडले आहेत. 

कोणत्याही वयाच्या व्यक्तीनं जरूर वाचावं आणि त्यात दिलेल्या मोलाच्या सल्ल्यांचं पालन करून आपापली ध्येयप्राप्ती करावी, असं हे पुस्तक आहे. 

पुस्तक : ध्येयामागील ध्येय 
लेखक : मनोज अंबिके 
प्रकाशन : मायमिरर पब्लिशिंग हाउस प्रा. लि., सहकारनगर नंबर २, पुणे - ४११००९ 
पृष्ठे : १४४ 
मूल्य : १६० ₹ 

(‘हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link