Next
भारतीय वाद्यसंगीत - भाग दोन
BOI
Tuesday, July 30, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


वर्षानुवर्षं लोकसंगीतात वापरल्या जाणाऱ्या ‘बासरी’ या पारंपरिक वाद्याबद्दल संशोधनात्मक कार्य करून पन्नालाल घोष यांनी त्याला मैफलीचे वाद्य म्हणून प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून दिली.पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीची लोकप्रियता वाढविण्याचं कार्य केलं. ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी मधुवंती पेठे सांगत आहेत काही दिग्गज भारतीय वादक कलाकारांबद्दल...
....................................
बासरी : पंडित पन्नालाल घोष
सकाळचा रामप्रहर.. भूपाळीचे स्वर... सुरुवातीलाच बासरीतून निघालेली एक लकेर कानावर पडते.. खरोखरच सकाळची प्रसन्नता मनाला स्पर्शून जाते. पहाडी प्रदेश.. दऱ्याखोऱ्यांत सकाळची ऊन्हं पडली आहेत... गायवासरांचे कळप चरायला निघाले आहेत.. तेव्हा गुराखी स्वत:तच मग्न होऊन वाजवतो ती बासरीवरची पहाडी धून.. कृष्णाने रासक्रीडा रचली... होळीचे रंग उधळले.. गोपी रंगात न्हाऊन निघाल्या, पण हे चित्र बासरीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कृष्णाचा नुसता उल्लेख जरी आला, तरी मनात बासरी वाजायला लागते. 

पंडित पन्नालाल घोषअशी ही लोकधुनेतील बासरी, आपण सुगमसंगीतात कायमच ऐकत आलो आहोत. पण एखाद्या गायकाच्या भारदस्त आवाजात मन मोहून टाकणारे दरबारी, मारवा यांसारखे धीरगंभीर राग बासरीवर आळवता येऊ शकतील? अशा पूर्वांगप्रधान रागांचा मंद्र सप्तकातला रागविस्तार बासरीवर परिणामकारकरीत्या वाजवता येईल? असे प्रश्न कुणा बासरीवादकाला पडायला लागले, तर तो नक्कीच कुणीतरी वेगळा विचार करणारा कलाकार असणार. हो असा विचार करणारे ज्येष्ठ बासरीवादक होते. पंडित पन्नालाल घोष. 

वर्षानुवर्षं लोकसंगीतात वापरल्या जाणाऱ्या बासरी या पारंपरिक वाद्याला, पं. पन्नालाल घोष यांनी मैफलीचे वाद्य म्हणून प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून दिली. त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि बासरीवर केलेलं क्रांतीकारी संशोधन हे फार मोठं कार्य आहे. त्यासाठी त्यांनी बासरीची रचना आणि तंत्र या विषयांचा खूप खोलवर अभ्यास केला. 

जगभरात बासरीचे अनेक प्रकार आहेत. हे वाद्य मुख्यत: ‘सुषिर’ वाद्यप्रकारात (विंड इन्स्ट्रूमेंट) मोडतं. बासरी ही तोंडाने हवा फुंकून वाजवली जाते. पाश्चात्य संगीतात वाजवली जाणारी बासरी (फ्लूट) ही बहुदा धातूची असते आणि त्यावरील छिद्रांवर चाव्या बसवलेल्या असतात. याउलट भारतीय बासरी साधारणत: बांबूची असते. तिच्यावर बोटं ठेवण्यासाठी विशिष्ट अंतरावर छिद्रं असतात. बासरीत तोंडानं हवा फुंकून आणि बासरीवरील छिद्रं बोटांनी उघड बंद करून अपेक्षित स्वर वाजवला जातो. उत्तर हिंदुस्थानी संगीतात वाजवल्या जाणाऱ्या ‘बासरी’वर सहा छिद्रं आणि फुंक मारण्यासाठी एक छिद्र असतं. तर कर्नाटक संगीतातील ‘वेणू’वर आठ छिद्रं असतात. 

पं. पन्नालाल घोष हे आडवी बासरी (उजवीकडे बासरी धरून) वाजवत असत. त्यांची फुंक जबरदस्त परिणामकारक होती. ख्याल गायकीच्या अंगानं वादन, हे त्यांच्या बासरीवादनाचं वैशिष्ट्य होतं. म्हणूनच ख्यालगायकीसाठी उपयुक्त अशी खर्जाची बासरी त्यांनी बनवली. हे त्यांचं अतिशय महत्त्वाचं संशोधन होतं. यासाठी त्यांनी अल्युमिनियम, पितळ, बांबू अशा विविध प्रकारांपासून तयार झालेल्या बांसऱ्यांचे नादगुण तपासून पाहिले. बांबूच्या बांसरीपेक्षा पाश्चिमात्य वाद्यमेळ्यातील धातूच्या बासरीचा (सिल्व्हर फ्लूट) नाद किती वेगळा असतो, ते त्यांना जाणवलं. 

बासऱ्यांचे निरनिराळे प्रकार, त्यांची लांबी रुंदी, त्यांवरील छिद्रांची संख्या याबाबत त्यांनी सतत प्रयोगात्मक अभ्यास केला. त्यांत बांबूपासून तयार झालेली बासरी त्यांना अधिक भावली. तिचा स्वर जास्त नैसर्गिक वाटला. ख्यालगायकीसाठी त्यांनी तयार केलेल्या खर्जाच्या बासरीला फक्त चारच छिद्रं होती. त्यावर मंद्र पंचम, मध्यम, गंधार, ऋषभ आणि मंद्र षड्जही (खर्ज) वाजवता येत असे. त्यामुळे मल्हार, तोडी, दरबारी, मारवा यांसारखे पूर्वांगप्रधान व गंभीर प्रकृतीचे रागही, परिणामकारकरीत्या त्या बासरीवर वाजवता येत असत. खर्जाची बासरी बनवण्यामागे त्यांचा हाच उद्देश होता.

दुसरं म्हणजे त्यांनी बासरीची लांबी वाढवून ३२ इंच (४८ सेमी) केली. त्याचप्रमाणे त्यांनी बासरीच्या अगदी शेवटच्या टोकाला आणखी एक छिद्र वाढवले. त्यामुळे स्वरांची मर्यादाही वाढली. पंडितजींच्या वादनात ठुमरी, कजरी यांसारखे उपशास्त्रीय गीतप्रकारही असत. त्यांच्या या नव्या बासरीमुळे खटके, हरकती, मुर्की असे उपशास्त्रीय आणि संगीताच्या बाजाला उपयुक्त स्वरालंकार सहजपणे वाजवता येऊ लागले. दीपावली, जयंत, चंद्रमोळी, नुपुरध्वनी या त्यांच्या नवीन रागरचनाही अप्रतिम होत्या.

बासरीवादनात वादकाची फुंक महत्त्वाची असते. त्यांच्या काळी माईक, स्पीकर्सचं युग नव्हतं. त्यामुळे फुंक ताकदीने भरणं आवश्यक असायचं. पंडितजींनी कमावलेली शरीरसंपदा ही त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेली देणगी होती आणि त्यांनी स्वत: मेहनतीनं ती टिकवली होती. याचा उपयोग त्यांना बासरीवादनात झाला. त्यांच्या आडव्या बासरीची फुंक जबरदस्त ताकदीची होती. त्यात एक वेगळाच गोडवा होता. त्यांच्या बासरीतून निघालेला सूर, भावनेनं ओथंबलेला असायचा. म्हणूनच तो श्रोत्यांच्या ह्रदयाला भिडायचा. 

अनेक गुरूंकडून पंडित घोष यांनी अनेक गोष्टी आत्मसात केल्या. उस्ताद खुर्शीद अहमद खाँ यांच्याकडून ते शास्त्रशुद्ध बासरीवादन शिकले. पंडित गिरिजाशंकर चक्रवर्ती यांच्याकडून, धृपदापासून ठुमरीपर्यंत अनेक गीतप्रकार शिकले. कोलकाताच्या रायचंद बोराल यांच्याकडून फिल्मी संगीत आणि वाद्यवृंद संचालन शिकले, पण प्रख्यात सतारवादक उस्ताद अल्लाउद्दीन खाँ साहेबांच्या (पं. रविशंकर यांचे सासरे, अन्नपूर्णादेवींचे वडील) वादनशैलीचा सर्वांत जास्त प्रभाव त्यांच्या वादनावर होता. वादनातील सर्वांगसुंदर परिपूर्णता आणि कलेवरची निष्ठा, ही वैशिष्ट्यं त्यांच्यामुळे पन्नाबाबूंमध्ये आली, असं ते स्वत: सांगत असत. पं. देवेंद्र मुर्डेश्वर (पन्नाबाबूंचे जावई), व्ही. जी. कर्नाड आणि रासबिहारी देसाई हे पन्नाबाबूंचे पट्टशिष्य. त्यांनी पन्नाबाबूंच्या वादनशैलीची परंपरा पुढे चालवली. 

पंडित हरिप्रसाद चौरासियापं. हरिप्रसाद चौरासिया :
पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी आपल्या बासरीवादनाने या वाद्याची लोकप्रियता वाढविण्याची मोलाची कामगिरी केली. एक बासरीवादक म्हणून हरिजींनी कार्यक्रम करायला सुरुवात केली, तेव्हा साउंड सिस्टीमचा वापर सुरू झाला होता. हरिजीसुद्धा आडवीच बासरी वाजवतात, पण पन्नाबाबूंसारखी उजवीकडे न घेता, डावीकडे घेऊन. मुळातच दमदार असलेली स्वत:ची फुंक, ध्वनिक्षेपकाचा पुरेपूर फायदा घेत, ते अधिक परिणामकारक वाजवतात. (साउंड सिस्टीम कितीही चांगली असली, तरी गायक-वादकांना ताकदीनं सूर लावावाच लागतो. तेव्हाच तो सुरेल, कसदार लागतो. साउंड सिस्टीम तो स्वर फक्त अधिक परिणामकारकरीत्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवते.)

पंडित हरिप्रसाद चौरासिया आणि पंडित शिवकुमार शर्माख्यालगायकीच्या अंगानं राग वाजवताना, रागाच्या स्वरविस्ताराबरोबरच (आलापी), हरिजींनी आपल्या बासरीवादनाला, सतारवादनातील ‘जोड-झाला’च्या वादन तंत्राची जोड दिली. तबला साथीबरोबर जुगलबंदी करत, स्वर आणि तालाची लयकारी या दोन्हीचा आनंद ते आपल्या वादनातून श्रोत्यांना देतात. यामुळेच त्यांचं बासरीवादन देशात आणि परदेशातही लोकप्रिय झालं. हरिजींनी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय शैलीच्या बासरी वादनाचे जगभर असंख्य कार्यक्रम केले. त्यांनीही आपले असंख्य शिष्य तयार केले. त्याचप्रमाणे पंडित शिवकुमार शर्मांसारख्या प्रसिद्ध संतूरवादकाबरोबर,  शिव - हरी या नावानं, हिंदी चित्रपटगीतांना संगीत दिलं. आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाने आणि नम्र वर्तनाने त्यांनी रसिकांच्या मनात स्थान मिळवलं. पंडित पन्नालाल घोष आणि त्यांचेच शिष्य असलेले पंडित हरिप्रसाद चौरासिया, या भिन्न वादनशैली असलेल्या दोन बासरीवादकांनी, वाद्यवादनाच्या क्षेत्रात बासरी या वाद्याला अत्युच्च स्थानावर नेऊन ठेवलं.

(सूचना : भारतीय संगीतातील वाद्यवादनातील महत्त्वाचे बदल नजरेस आणून देणं या उद्देशाने भारतीय वाद्य संगीत आणि वाद्य कलाकार यांची माहिती देण्याचा प्रयत्न आहे. सर्व वादक कलाकारांचा परिचय किंवा वाद्यसंगीताचा इतिहास सांगणं हा उद्देश नाही. त्यामुळे काही प्रसिद्ध आणि लोकप्रिय वादक कलाकारांबद्दल उचित आदर बाळगून, काही निवडक कलाकारांच्या संशोधनात्मक कार्याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करत आहे.)

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search