Next
‘त्यांनी’ जपलाय काष्ठशिल्पकलेचा वारसा...
संदेश सप्रे
Wednesday, October 31, 2018 | 12:29 PM
15 0 0
Share this story

अनंत व दिनेश सुतार यांनी घडविलेल्या आकर्षक लाकडी मूर्ती

देवरुख :
लाकडी मूर्ती बनविणे ही अत्यंत कौशल्याची आणि कष्टाची कला. गेल्या काही वर्षांत काष्ठमूर्ती बनविण्याची कला लोप पावत चालली आहे. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाने गावातील अनंत सुतार यांनी मात्र काष्ठमूर्तिकलेची परंपरा गेली ५० वर्षे जोपासली आहे. 

प्राचीन काळापासून वास्तुकलेच्या विकासाबरोबरच मूर्तिकलेचाही विकास झाला. लाकूड, माती, दगड, तसेच लोखंड, तांबे, सोने, चांदी असे धातू आणि रत्नांपासून मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या. यातील लाकडापासून मूर्ती बनविण्याची कला आज जवळपास लयाला गेली आहे. देवदार, चंदन, मोह, खैर, बेल, जीवक केशर, आंबा, साग आदींच्या लाकडापासूनच मूर्ती तयार केल्या जातात. अन्य लाकूड त्यासाठी उपयुक्त ठरत नाही. अलीकडे ही झाडेच नाहीशी होत असल्याने ही कला जोपासणेही कठीण आहे. तरीही ताम्हानेसारख्या गावात राहून अनंत गणपत सुतार यांनी लाकडापासून मूर्ती बनविण्याची कला गेली ५० वर्षे जोपासली आहे. त्यांचा दिनेश यानेही तो वारसा पुढे सुरू ठेवला आहे.  

वाडवडिलांकडून लाभलेली सुतारकामाची परंपरा वयाच्या १५व्या वर्षापासून जोपासत अनंत सुतार यांनी गृहोपयोगी फर्निचर, विविध लाकडी वस्तू तयार करण्याचे काम केले. हे काम करताना त्यांना लाकडापासून मूर्ती तयार करण्याचा छंद जडला. विविध प्रकारचे-आकाराचे गणपती, श्रीकृष्ण, गौरीचे मुखवटे, संपूर्ण गौरी, साईबाबा अशा अनेक देवतांच्या मूर्ती त्यांनी अत्यंत उत्तम रीतीने साकारल्या. काही इंचापासून ते तीन-चार फुटांपर्यंतच्या मूर्ती ते सहज घडवतात. त्यांनी घडवलेल्या सुबक मूर्तींना रत्नागिरी जिल्ह्यासह कोल्हापूर, सिंधुदुर्ग, मुंबई, पुण्यातही चांगली मागणी आहे.  

आज वयाच्या साठीतही ते उत्तम कारागिरी करतात. या कामात त्यांना त्यांचा मुलगा दिनेश मदत करतो. केवळ मूर्तीवरच न थांबता शिमागोत्सवात आवश्यक असणाऱ्या पालख्यांवरही आकर्षक कारागिरी ते करतात. कोकणातील घरांसमोरचे लाकडी झोपाळे, नक्षीदार पलंग घडविण्यातही त्यांचा हातखंडा आहे.   

याबाबत अनंत सुतार सांगतात, ‘या कामात एकाग्रता महत्त्वाची असते. या कामातील कार्व्हिंगचे (नक्षीकाम) काम वेळखाऊ व कलाकुसरीचे आहे. त्यामुळे या कामात चिकाटी धरून ठेवणे आवश्यक आहे. जिद्द व चिकाटीने हा व्यवसाय जोपासल्यास ही कला आगामी काळात तग धरून राहील.’

संपर्क : दिनेश सुतार – ९४०३७ ६५७३१
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link