Next
जग हे नाटकशाला...
गेल्या ६० वर्षांतील मराठी रंगभूमीचा इतिहास
BOI
Sunday, September 29, 2019 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

संगीत देवबाभळी

अतिशय लोकप्रिय असलेली पुरुषोत्तम करंडक एकांकिका नुकतीच पार पडली. त्या निमित्ताने ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांनी ‘किमया’ या सदराच्या आजच्या लेखात गेल्या ६० वर्षांतील मराठी रंगभूमीचा इतिहास आणि आठवणींना उजाळा दिला आहे.
...........
अतिलोकप्रिय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा अर्थात २०१९ची ‘पुरुषोत्तम करंडक’ स्पर्धा नुकतीच पार पडली. नगरच्या ‘न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज’ने सादर केलेल्या ‘लाली’ या एकांकिकेने ‘पुरुषोत्तम करंडक’ पटकावला. सलग तीन वर्षे हे कॉलेज या करंडकाचे मानकरी ठरले आहे, हे विशेष. सन १९६ पासून ‘महाराष्ट्रीय कलोपासक’ नाट्यसंस्थेने सुरू केलेल्या या स्पर्धेची महाविद्यालयांमधील नाट्यवेडे विद्यार्थी चातकासारखी वाट बघत असतात. नवीन वर्षात प्रवेश घेतल्याबरोबर त्यांची लगबग सुरू होते. नवे लेखक, नवे विषय, नवे-जुने कलाकार निवडले जातात. मग तालमी सुरू होतात आणि रात्री रंगत जातात.

‘पुरुषोत्तम’चा थरार मी स्वत: १९६३पासून अनुभवलेला आहे. एमईएस (गरवारे) कॉलेजतर्फे प्रत्यक्ष रंगमंचावर आणि ‘बॅकस्टेज’ला काम केलेले आहे. त्याच वर्षी विक्रम गोखलेने कर्णाचे काम केलेली ‘राधेय’ ही एकांकिका स्पर्धेत सादर झाली. दिग्दर्शक होते भालबांचे बंधू खंडेराव केळकर. मी मदतीला होतोच. ‘फर्ग्युसन’मधून आमच्या दोन्ही मुलींनी पुढे ‘पुरुषोत्तम’मध्ये सहभाग घेऊन पारितोषिके मिळवलेली आहेत. आमच्या वेळी बी. जे. मेडिकल कॉलेजचा दरारा होता. जब्बार पटेल, विद्याधर वाटवे आदींनी सादर केलेली, विजय तेंडुलकर लिखित ‘बळी’ ही एकांकिका बहुधा ६४ साली पहिली आली होती. अजूनही ती चांगली आठवते. नंतर आम्हीही ‘एमईएस’मधून वार्षिक स्नेहसंमेलनात ‘बळी’चा प्रयोग केला. ‘पुरुषोत्तम’चे वैभवच काही और आहे. त्याची तिकिटे मिळवण्यासाठी विद्यार्थी पहाटेपासून, किंबहुना रात्रीपासूनच लांबच्या लांब रांगा लावतात. प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी निरनिराळ्या महाविद्यालयांची मुले-मुली ‘आवाज कुणाचा...’ अशा दणदणीत घोषणा वर्षानुवर्षे करत आले आहेत. एकांकिका सुरू होताच मात्र संपूर्ण शांतता पसरते. ‘पुरुषोत्तम’च्या मुशीत अनेक उत्तम कलाकार घडलेले आहेत आणि पुढे व्यावसायिक रंगभूमी, तसेच चित्रपट क्षेत्र गाजवत आहेत.

'काळे बेट आणि लाल बत्ती' नाटकातील सर इंद्रसेन आंग्रेच्या भूमिकेत प्रा. मधुकर तोरडमल.

१९६५मध्ये ‘एमईएस’च्या वार्षिक स्नेहसंमेलनात खंडेराव केळकरांनीच बसवलेले वसंत कानेटकर लिखित ‘प्रेमा तुझा रंग कसा’ हे नाटक खूप गाजले. विक्रम गोखले त्यात ‘बाजीराव’ आणि मी ‘बच्चाजी’ झालो होतो. सर्व महाविद्यालयांमधून सादर होणाऱ्या नाटकांतून आम्हाला पहिल्या क्रमांकाचा ‘वाळवेकर करंडक’ त्या वेळी मिळाला होता. पुढच्या वर्षी कानेटकरांच्या ‘वेड्याचं घर उन्हात’ या नाटकात विक्रमने प्रमुख भूमिका केली. त्यानंतर, जयवंत दळवींच्या ‘बॅरिस्टर’ नाटकाद्वारे विक्रम व्यावसायिक कलाकार झाला आणि हिंदी-मराठीतला आघाडीचा दर्जेदार नट म्हणून प्रसिद्ध झाला. आजही तो कार्यरत आहे. (‘मिशन मंगल’मधला शास्त्रज्ञ आठवा.)

भरत नाट्यमंदिर

‘पुरुषोत्तम’नंतर अनेक नाट्यस्पर्धा सुरू झाल्या. त्यात वाढच होत गेली. तरुण कलाकार मोठ्या उत्साहानं त्यात भाग घेतात. काही वृत्तपत्रेही स्पर्धा आयोजित करतात. व्यावसायिक नाटकांना प्रेक्षक गर्दी करत नाहीत, अशी ओरड अनेक वर्षे सुरू आहे. काही ठरावीक नाटके ‘हाऊसफुल’ चालतात. (तिला काही सांगायचंय, अलबत्या गलबत्या, एका लग्नाची पुढची गोष्ट, संगीत देवबाभळी, इत्यादी) कलाकारांचे मोठे मानधन, वाढता प्रवासखर्च, नाट्यगृह-जाहिरातींचा खर्च हे आता परवडत नाही. त्या पार्श्वभूमीवर हौशी नाट्यस्पर्धांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो. त्यांना छोटी नाट्यगृहेसुद्धा चालतात. हल्ली तशी बरीच निर्माण झालेली आहेत. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांसाठी म. रा. कामगार कल्याण केंद्राने नाट्यस्पर्धा सुरू केली. ती अनेक वर्षे चालू आहे. तशाच आंतरबँक स्पर्धा होतात. अशा प्रकारच्या बऱ्याच स्पर्धा आहेत.

आनंद म्हसवेकरांचे 'यू टर्न'

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धा गेली ६० वर्षे आयोजित केली जाते - तो अनेक दिवसांचा महोत्सवच असतो. रोजचे किंवा ‘सीझन’ तिकिटसुद्धा अगदी कमी असते. मी वर्षानुवर्षे त्यातली सगळी नाटके बघत आलेलो आहे. त्यातली अनेक नाटके खूप गाजली, रंगभूमीला मोठमोठे कलाकार मिळाले. नगरचे प्रा. मधुकर तोरडमल त्यातूनच पुढे आले. नगर-नाशिकच्या संस्थांना पूर्वी पुण्यातच भाग घ्यावा लागे. तोरडमलांनी प्रथम ‘भोवरा’ हे नाटक सादर केले. लेखन, दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका त्यांचीच. ते इतके जबरदस्त, खिळवून ठेवणारे होते, की पुण्यातील नाट्यप्रेमी मंडळी थक्क झाली. प्रा. तोरडमल नगरला महाविद्यालयात इंग्रजी विषय शिकवत. मी त्या वेळी भाकीत केले होते, की ‘ते लवकरच नोकरी सोडून नाट्यक्षेत्रात दाखल होणार!’ एक-दीड वर्षातच ते खरे झाले. ‘भोवरा’ला पारितोषिक मिळाले नाही. परंतु पुढच्या वर्षीच त्यांचे ‘काळे बेट लाल बत्ती’ हे नाटक अंतिम स्पर्धेत पहिले आले. त्या वेळची लक्षात राहिलेली अन्य नाटके अशी - ‘कलोपासक’चे ‘कथा कुणाची व्यथा कुणा’, ‘पीडीए’चे ‘तू वेडा कुंभार’, थिएटर अॅकॅडमीचे ‘लोभ नसावा ही विनंती’, नाशिकचे ‘बुडत्याचा पाय खोलात’, इत्यादी इत्यादी. हल्ली राज्यात अनेक केंद्रांवरून स्पर्धा घेण्यात येतात. अंतिम स्पर्धा मुंबईत होते. गद्य नाटकांबरोबरच संगीत आणि संस्कृत नाटकांच्या स्वतंत्र स्पर्धा होतात. अशा रीतीने वर्षभर सर्वत्र नाटकांचेच वातावरण असते. मराठी लोक वर्षभर फक्त नाटकेच करतात की काय, असे वाटू शकेल!

संगीत महानिर्वाण

तरुण पिढीचे लेखन, दिग्दर्शन, अभिनयातील नैपुण्य बघून निश्चितच आनंद आणि अभिमान वाटतो. नाटकाची आवड भारतीयांच्या रक्तातच भिनलेली आहे. जागतिक रंगभूमीचा इतिहास खूप जुना आहे. राजदरबारात उत्तमोत्तम नाटके सादर होत. इंग्लंडमधील विल्यम शेक्सपिअरची कारकीर्द हा तिकडच्या नाट्ययुगाचा कळसाध्याय आहे. भारतातही किमान दोन हजार वर्षांपूर्वी भरतमुनींनी ३६ अध्यायांचे ‘नाट्यशास्त्र’ तयार केले. त्यात रंगभूमीच्या सर्व अंगांचा सूक्ष्म, तपशीलवार विचार केलेला आहे. अशी आख्यायिका आहे, की ब्रह्मदेवाने ‘नाट्यवेद’ हा पाचवा वेद तयार केला. त्यात ऋग्वेदातील पाठ्य, यजुर्वेदातील अभिनय, सामवेदातील गायन आणि अथर्ववेदातील ‘रसा’चा समावेश होता. भरतमुनींनी त्याचाच विस्तार/सुलभीकरण केले. शरीराच्या १० मुद्रा, हातांच्या आणि मानेच्या ३६, तसेच डोक्याच्या १३ मुद्रांचे त्यात वर्णन आहे. रंगमंच रचनेचीही माहिती दिलेली आहे. नृत्य-नाट्य सादरीकरणात त्यांचा शेकडो वर्षे वापर होत आलेला आहे. आजचे रंगकर्मी पौर्वात्य आणि पाश्चात्य रंगभूमीचा गंभीरपणे अभ्यास करतात, नवनवे प्रयोग करतात.

संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ सांगलीत १८४३ साली विष्णुदास भावे यांनी ‘सीता स्वयंवर’ नाटकापासून रोवली. त्यामुळे सांगलीला नाट्यपंढरी म्हटले जाते. अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, विष्णुपंत औंधकर, कृ. प्र. खाडिलकर, वि. दा. सावरकर, राम गणेश गडकरी, हे आरंभीच्या काळातील नाटककार. कीचकवध, संन्यस्त खड्ग यांसारखी नाटके ब्रिटिशांविरुद्ध प्रचार करण्यासाठी लिहिली गेली. त्यानंतरच्या गद्य-पद्य नाटककारांची परंपरा फार मोठी आहे. वि. वा. शिरवाडकर, आचार्य अत्रे, मो. ग. रांगणेकर, विद्याधर गोखले, पुरुषोत्तम दारव्हेकर, बाबूराव गोखले, पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर, बाळ कोल्हटकर, विजय तेंडुलकर, सुरेश खरे, जयवंत दळवी, रत्नाकर मतकरी, वसंत सबनीस, आदी. ही यादी देण्याचे कारण म्हणजे त्यांची नाटके लगेच आपल्या डोळ्यांसमोर येतात आणि नाटक आपल्या रक्तात किती भिनलेले आहे, याची कल्पना येते. 

नव्या पिढीतील प्रसिद्ध नाटककारांची संख्यादेखील कमी नाही. त्यातील निवडक नावे घ्यायची झाल्यास ही पुढे येतात - महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, जयंत-संजय पवार, अजित-प्रशांत दळवी, श्रीनिवास भणगे, सुहास तांबे, शफाअत खान, आनंद म्हसवेकर, इत्यादी. दिग्दर्शक, नाट्य-कलाकारांचीही फार मोठी उज्ज्वल परंपरा आहे.

नाटक, संगीत आणि चित्रपट हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. स्पर्धा, ताणतणाव, आजारपण, मानसिक अस्वस्थता अशा वातावरणात त्या तीन गोष्टी आपल्याला तारून नेतात, अंत:करण आनंदाने भरून टाकतात. ती ईश्वरी योजनाच आहे. असे म्हणता येईल. सध्या वाचनसंस्कृती जशी संक्रमण काळातून जात आहे, त्याचप्रमाणे त्या तिन्ही क्षेत्रांमध्ये (अपवाद वगळता) गर्दीला ओहोटी लागलेली आहे. त्यावरचा एक प्रभावी उपाय म्हणजे गावोगाव छोटी नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे उभी राहिली पाहिजेत. मराठी लोकांनी मराठी नाट्य-चित्रांना आधार, प्रोत्साहन द्यावे हे अपेक्षित आहेच. शिवाय, अनेक उत्तम प्रयोग आणि कलाकृती निर्माण होत आहेतच. त्यांचे स्वागत झालेच पाहिजे.

जुन्या काळी संगीत नाटके रात्रभर चालत. आता चार ते सहा अंकांची नाटके फक्त दोन अंकात संपादन करून सादर होतात. संगीत देवबाभळी, संगीत चंद्रप्रिया यांसारखी नाटके खूप गाजत आहेत, ही दिलासा देणारी गोष्ट आहे. अमोल बावडेकर आणि प्रसाद सावकारने (८०व्या वर्षी) केलेल्या ‘अवघा रंग एकचि झाला’ नाटकाचे असंख्य प्रयोग झाले. एके काळी गाजलेली संगीत नाटके तर होतच आहेत. मध्यंतरी ‘संगीत कुलवधू’चेही थोडे प्रयोग झाले. ‘घाशीराम’ आणि ‘महानिर्वाण’सारखी नाटके नवनव्या संचात बसवली जातात.

बिरबलाच्या एका कथेनुसार, एकूण २७ नक्षत्रांमधून (पावसाची) नऊ नक्षत्रे वजा केली तर बाकी शून्य उरते. त्याच चालीवर, मराठी माणसाच्या जीवनातून नाटक वजा केले तर उरेल तो आत्माविहीन जीव!

मराठी रंगभूमीला माझा मानाचा मुजरा!

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

रवींद्र गुर्जर(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search