Next
कलावर्धिनीतर्फे नवव्या ‘परिक्रमा’ नृत्य महोत्सवाचे आयोजन
प्रेस रिलीज
Tuesday, October 24 | 06:19 PM
15 0 0
Share this story

पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेल्या कलाकारांचा कलाविष्कार आणि नृत्यसादरीकरण अनुभवण्याची सुवर्ण संधी देणाऱ्या ‘परिक्रमा’ या नृत्य महोत्सवाचे आयोजन येत्या शनिवारी, २८ व रविवार, २९ ऑक्टोबर दरम्यान करण्यात असल्याची माहिती कलावर्धिनी चॅरीटेबल ट्रस्टच्या सचिव अरुंधती पटवर्धन यांनी दिली.

कलावर्धिनी चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने दरवर्षी ‘परिक्रमा’ या नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.  महोत्सवासंदर्भात अधिक माहिती देताना अरुंधती पटवर्धन म्हणाल्या, ‘शास्त्रीय नृत्याचा प्रचार व्हावा या उद्देशाने कलावर्धिनी चॅरीटेबल ट्रस्ट दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करीत असते. ‘परिक्रमा’ नृत्य महोत्सव हा त्याचाच एक भाग असून महोत्सवाचे हे नववे वर्ष असल्याचा आम्हाला आनंद आहे.  या महोत्सवात अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांच्या नृत्याविष्काराबरोबर व्याख्याने ऐकण्याची संधीही पुणेकर रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे.’    

या महोत्सवाची सुरवात शनिवारी,२८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता टिळक स्मारक मंदिर येथे होणार आहे. कथक गुरु बिरजू महाराज यांची नात शिंजीनी कुलकर्णी यांच्या कथक नृत्य सादरीकरणाने महोत्सवाला सुरुवात होईल. त्यानंतर कलावर्धिनी संकुल रचित भरतनाट्यम् या नृत्यप्रकाराचे सादरीकरण होईल तर पहिल्या दिवसाचा समारोप हा संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या अलार्मेल वल्ली यांच्या शिष्या मीनाक्षी श्रीनिवासन यांच्या भरतनाट्यम् सादरीकरणाने होईल.

रविवारी, २९ तारखेला कर्नाटक हायस्कूल येथील शकुंतला शेट्टी सभागृहात सकाळी १० वाजता ‘संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये भारतीय कलांच्या अभ्यासात भरीव योगदान देणारे प्रसिद्ध लेखक, पत्रकार गौरी रामनारायण आणि आशीष खोकर हे नृत्य याविषयाशी संबंधित विषयांवर मार्गदर्शन करतील. महोत्सवाच्या  समारोपाचा हा दुसरा दिवस ज्येष्ठ कलाकारांच्या नृत्याविष्काराने वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. या वेळी  शकुंतला शेट्टी सभागृहात  रविवारी  सायंकाळी ५.३० वाजता 'अभिव्यक्ती' या कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध नृत्यांगना मनीषा साठे यांचे कथक नृत्य पाहण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे. यानंतर संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या डॉ. सुचेता भिडे चापेकर यांच्या भरतनाट्यम् सादरीकरणाने महोत्सवाची सांगता होईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link