Next
लग्नसमारंभाच्या ए-टू-झेड तयारीची ए-टू-झेड माहिती!
प्रसन्न पेठे
Tuesday, July 31 | 09:54 AM
15 0 0
Share this story

‘घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून’ असं म्हणण्याची पद्धत आहे. कारण माणसाच्या आयुष्यात या दोन गोष्टी प्रचंड महत्त्वाच्या आणि प्रचंड खर्चिक! या दोन गोष्टींसाठी माणसाला अतिशय नियोजनबद्ध तयारी करावी लागते. विशेषतः घरच्या लग्नकार्याच्या बाबतीत अलीकडच्या छोट्या कुटुंबातल्या माणसांची धावपळ तर विचारायलाच नको! लग्न ठरल्यावर खरेदी, मानपान, खर्च, रीतीरिवाज, सणवार अशा अनेक गोष्टींची नीट आखणी करून धावपळ, मनःस्ताप कसा टाळावा हे सांगणारं स्मिता शिरसाट यांचं ‘लग्नाची डायरी’ हे पुस्तक त्या दृष्टीने नक्कीच उपयोगी ठरणारं आहे. त्या पुस्तकाचा हा परिचय...
.............
ख्रिस्तपूर्व ३५० वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अॅरिस्टॉटलने एका ठिकाणी लिहिताना ‘वेल बिगन इज हाफ डन’ असा वाक्यप्रयोग केला आहे. म्हणजे ‘व्यवस्थित आखणी करून, प्लॅन करून सुरुवात केल्यावर हातात घेतलेलं कार्य, निम्मं तिथेच जिंकल्यासारखं असतं.’ हे खूप प्राचीन काळापासून आपण ऐकत आलो आहोत. मराठी माणसाच्या आयुष्यात स्वतःचं घर आणि आपल्या मुलामुलींची लग्नकार्यं या सर्वांत महत्वाच्या, समाधान देणाऱ्या, पण खर्चिक बाबी असतात. बऱ्याचदा त्यातलं नियोजन चुकलं, तर निष्कारण धावपळ आणि त्यापायी मनःस्तापाला तोंड द्यावं लागतं. विशेषतः लग्नकार्य हे तर अधिकच ताणाचं. कारण तिथे दोन घराण्यांच्या नातेसंबंधांचा आणि इभ्रतीचा प्रश्न असतो. त्या दृष्टीने लग्नकार्याची बारीकसारीक तयारी, सर्व विधींची माहिती आणि त्यासाठी उपयुक्त तक्ते देऊन स्मिता शिरसाट यांनी ‘लग्नाची डायरी’ या पुस्तकाच्या रूपाने वाचकांची मोठीच सोय केली आहे. 

बारा पानांच्या पहिल्या प्रकरणात लग्नाच्या पहिल्या टप्प्यापासून म्हणजे वधू-वर संशोधनापासून, साखरपुडा, केळवण, शिवण बघणे, मेंदी काढणे... ते बांगड्या.. देवदेवक... हळद... सीमान्त पूजन...गौरीहरापर्यंतचे विवाहपूर्व विधी आणि नंतर प्रत्यक्ष लग्नसमारंभामधले कन्यादान, सूत्रवेष्टन, कंकण, मंगळसूत्र बांधणे, विवाह होम, कानपिळी, अग्निप्रदक्षिणा, पाणिग्रहण, सप्तपदीपासून ते पुढे गृहप्रवेश आणि कुलदैवत दर्शन, चुडा काढणे अशा महत्त्वाच्या जवळपास ३१ छोट्या-मोठ्या विधींची माहिती फोटोंसह दिली आहे.

त्यानंतरच्या काही प्रकरणांमध्ये कुलदैवत, सिव्हिल मॅरेजसाठी आवश्यक माहिती असणारे तक्ते, साखरपुडा ते पाचपरतावणापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांची नीट योजना आखणारे तक्ते, छायाचित्रकार, सौंदर्यप्रसाधक, डेकोरेटर, संगीत कार्यक्रम यांची माहिती आणि वेळा सांगणारे तक्ते दिले आहेत. ते बघितले, की आपण किती व्यवस्थित आखणी करू शकतो ते लक्षात येतं.

त्यानंतर साखरपुड्याला आणि लग्नाला आमंत्रण देण्यासाठी निमंत्रितांची यादी कशी करायची, कोण-कोण येणार, पुरुष किती, स्त्रिया किती, कुठल्या गावचे, नक्की कुठल्या कार्यक्रमला/उपकार्यक्रमाला बोलवायचं.. त्यासाठीचे तक्ते आणि त्यातलं कोडीफिकेशन यांसाठीचे फार सुंदर तक्ते पुढच्या २८-३० पानांत दिले आहेत. आमंत्रणपत्रिका कशी असावी, त्यासाठी लागणारी पाकिटे यांचा हिशेब कसा ठेवायचा, भेटवस्तू, पॅकिंग मटेरियल, ज्यांना आमंत्रण पोस्टाने पाठवायचं त्यासाठी त्यांच्या घरच्या पत्त्याचे तक्ते अशी उपयुक्त माहिती दिली आहे. 

त्यापुढच्या प्रकरणामध्ये लग्नाची खरेदी आणि खर्चाची विस्तृत माहिती भरण्यासाठीचे तक्ते दिले आहेत. मग त्यात कुलदैवतांच्या तपशीलापासून ते मानपानाची यादी, वरासाठी/ वधूसाठीच्या खर्चाचा तपशील लिहिण्यासाठी तक्ते, सोने-चांदी दागिने यांचा तपशील असे सर्व मोठे आणि बारीकसारीक तपशील लिहिण्यासाठीचे तक्ते दिले आहेत. ते वाचताना वाचकाला आपोआप मार्गदर्शन होत जातं, की नियोजनात सुसूत्रता कशी आणता येईल...

त्यानंतर हळद/पूजेचं सामान, फुले/उपकरणे यांची यादी सत्यनारायण पूजेची यादी, संपूर्ण कार्यासाठी लागणारे तांदूळ आणि नारळ यांचा तपशील देणारे तक्ते दिले आहेत. असे सर्व तक्ते पूर्ण भरल्यावर त्यांची संक्षिप्त रूपात एकाखाली एक नोंद करण्यासाठी एक मास्टर लिस्ट दिली आहे, जेणेकरून एका दृष्टिक्षेपात संपूर्ण कार्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा अंदाज कळू शकेल. हा सगळा भाग अतिशय उपयुक्त ठरेल असाच आहे. 

त्याच्या पुढच्या प्रकरणामध्ये, लग्नाच्या दिवसाच्या सकाळपासून ते उलटी आकडेमोड (Back-calculation) करत नक्की प्रारंभ कोणत्या तारखेपासून करायचा ते दर्शवणारा तक्ता दिला आहे. लग्नाच्या अगोदर करण्याच्या किमान २७ आणि लग्नाच्या दिवशी करायच्या किमान ४१ कामांची यादी दिली आहे. तीही फारच उपयुक्त आहे. 

घरी राहायला येणाऱ्या पाहुण्यासाठी सकाळ/दुपार/रात्रीच्या खाण्या-पिण्याचं नियोजन अचूक असावं. त्यासाठीही तक्ते दिले आहेत. डिस्पोझेबल वस्तूंची (चहाचे कप, पेपर नॅपकीनपासून ताटांपर्यंत) यादी दिली आहे, ज्या अवश्य लागतात पण नंतर फेकायचं कुठे, कधी त्यात गडबड होऊ शकते... नंतरच्या प्रकरणात बाराही महिन्याच्या सणवारांची माहिती दिली आहे.

या पुस्तकात आणखी गंमत म्हणजे नवऱ्याने घ्यायचे काही उखाणेही दिले आहेत, तसंच ओव्या, मंगलाष्टकं यांबरोबरच लोणची, पापड, फेण्या, सांडगे, मुरांबे आणि काही गोड पदार्थांच्या पाककृतीही दिल्या आहेत.

एकुणात, हे पुस्तक हाताशी असल्यावर कितीही मोठं लग्नकार्य असलं, तरी योजनाबद्ध पद्धतीनं सर्व कामांची आखणी करून दडपणाशिवाय ते उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी मदत होईल, हे नक्की.  

हे पुस्तक जरूर वाचावं असंच आहे.

पुस्तक : लग्नाची डायरी        
लेखिका : स्मिता किरण शिरसाट          
प्रकाशक : संजना पब्लिकेशन्स, दत्तवाडी, गोवा ४०३ ७०४     
संपर्क : स्मिता किरण शिरसाट ९९२३४ ५६३०१           
पृष्ठे : १६२ 
मूल्य : ४९९ रुपये 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link