Next
शेअर खरेदीस अनुकूल वातावरण
BOI
Sunday, April 08, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

चांगली तिमाही, तसंच पावसाळाही समाधानकारक होण्याचा अंदाज असल्याने शेअर बाजारात तेजीचा कल आहे. राजकीय साठमारीकडे बाजाराने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे निवडक कंपन्यांचे शेअर्स घेण्याची ही योग्य संधी आहे. याविषयी सविस्तर मार्गदर्शन ‘समृद्धीची वाट’ या सदरात ....  
.......
गेल्या आठवड्यात, बुधवारी, चार एप्रिल रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले २०१८-१९ वर्षातील पहिले त्रैमासिक आर्थिक धोरण जाहीर केले. ते ‘जैसे थे’ स्वरूपाचेच होते. रेपो दर व अन्य व्याजदर बदलले गेले नाहीत. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवल्याने इथेही व्याजदर वाढेल का, अशी शंका होती; पण तसे झाले नाही. उलट येत्या सहा महिन्यांत महागाईची वाढ जेमतेम चार पूर्णांक सात टक्के ते पाच पूर्णांक एक टक्का इतकी होईल; पण अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर सात पूर्णांक चार टक्के होईल. सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP) तितके वाढेल असे म्हटले गेले आहे; मात्र सरकारी धोरणे कुठे घसरली व फसली, तर आर्थिक घसरण होऊ शकेल असा तिने इशारा दिला आहे. क्रूड पेट्रोलच्या जागतिक किंमती वाढण्याची मात्र रिझर्व्ह  बँकेला चिंता वाटते. आपल्याला गरजेपैकी ७० टक्के पेट्रोल आयात करावे लागते. किमती वाढल्या, तर आपला व्यापार समतोल (Balance of Trade) धोक्यात येईल. सध्या आपल्याकडे विदेश मुद्रा गंगाजळी चारशे अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे रुपयाचा डॉलर व पौंडाशी विनिमय दर स्थिर आहे. 

भारताच्या तेल शुद्धीकरण कंपन्या येत्या २०१८ -१९ या वर्षात इराणकडून दुप्पट पेट्रोल विकत घेणार आहेत. दररोज तीन लाख ९६ हजार पिंपे तेल आयात होईल; यंदा खरीप पीक उत्तम असेल. कारण पावसाळा समाधानकारक असण्याचे भाकीत हवामान शास्त्रज्ञांनी केले आहे. त्याचप्रमाणे भारतीय कंपन्यांची जानेवारी- मार्चअखेर (२०१८) तिमाही चांगली असणार आहे. विक्री व नक्त नफ्यात २० ते २५ टक्के वाढ अपेक्षित आहे. या सर्व बाबींमुळे शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. राजकीय क्षेत्रात शासन व विरोधी पक्ष यांच्यात  मारामारी चालू असली, संसदेत काम ठप्प होत असले, तरी बाजार तिकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शुक्रवारी निर्देशांक ३३ हजार ६२६ वर, तर निफ्टी दहा हजार ३३१वर बंद झाला. 

हेग आणि ग्राफाइट इंडिया या कंपन्यांतील गुंतवणुकीची संधी अजूनही सोडू नये. हेगचा शेअर सध्या दोन हजार ९५१ रुपयांवर आहे, तर ग्राफाइट इंडिया सातशे २२ रुपयांना उपलब्ध आहे. ते अनुक्रमे चार हजार रुपयांपर्यंत व ८५० रुपयांपर्यंत वाढतील. याखेरीज बजाज फायनान्सही एक हजार ६५० रुपयांवरून एक हजार ९३९ रुपयांपर्यंत गेला आहे. तो २२०० रुपयापर्यंत वाढू शकतो. रेप्को होम फायनान्सचा शेअर शुक्रवारी ६०५ रुपयांना उपलब्ध होता. तो वर्षभरात ८५० रुपयापर्यंत वर जावा. गृहवित्तक्षेत्रातील दिवाण हाउसिंग फायनान्स कंपनीचा शेअर ५४० रुपयांना मिळत आहे; पण बहुतेक नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांचे शेअर्स येत्या आठ महिन्यांत तेजाळणार असल्याने दिवाण हाउसिंग फायनान्स सातशे २० रुपयापर्यंत वर जाईल. 

‘अनंत हस्ते कमलावराने। देता किती घेशील दो कराने।।’ अशी आज स्थिती असली, तरी उच्चांकी भावात खरेदी करण्याची चूक करू नये. शेअर्सचे भाव खाली-वर होत असतात. त्यांचा अभ्यास करून, भाव कमी होत असतात त्यावर नजर ठेवून मगच खरेदी करावी. पाच-सात कंपन्या निवडाव्यात. त्यांचा संदर्भ वर आलाच आहे. त्यात जिंदाल स्टील व देव इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअर्सची भर घालावी.

- डॉ. वसंत पटवर्धन
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link