Next
‘कौमार्य चाचणी हा मानवतावादी समाजाला लागलेला कलंक’
लीलाबाई इंद्रेकर यांचे प्रतिपादन
BOI
Wednesday, July 03, 2019 | 03:48 PM
15 0 0
Share this article:

लीलाबाई इंद्रेकर यांची मुलाखत घेताना प्रज्ञा महाजन व सुप्रिया जाधव

पुणे : ‘कौमार्य चाचणी हा मानवतावादी समाजाला लागलेला कलंक असून, समाजातील प्रत्येक घटकाने या चाचणीविरुद्ध उभे ठाकण्याची वेळ आलेली आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ आंदोलक लीलाबाई इंद्रेकर यांनी केले. 

करम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘कौमार्य चाचणी-एक अमानवी प्रथा’ या कार्यक्रमातील मुलाखतीदरम्यान त्या बोलत होत्या. कार्यक्रमात भूषण कटककर, सुप्रिया जाधव व प्रज्ञा महाजन उपस्थित होते. सुप्रिया जाधव व प्रज्ञा महाजन यांनी इंद्रेकर यांची मुलाखत घेतली. 

‘कंजारभाट समाजाच्या विकासाला खीळ बसण्यामागे त्या समाजातील जातपंचायतच कारणीभूत आहे. देशाची घटना व कायदा न मानता स्वतःचे प्रतिसंविधान तयार करून आपल्याच समाजाला वेठीला धरणारी जातपंचायत ही अनिष्ट प्रथांचे मूळ आहे. आज कंजारभाट समाजातील अनेक नागरिक उच्चशिक्षित असून, ते अशा रुढींविरुद्ध लढा देत आहेत. मात्र एकविसाव्या शतकातही जातपंचायतीचे हुकूम मानण्याची हतबलता समाजातील काही घटकांमध्ये दिसून येत आहे. मुलींच्या स्वाभिमानाची पायमल्ली होत असून, त्यांचा शारीरिक  व मानसिक छळ होत आहे. हे थांबवण्यासाठी जातपंचायतीचे अस्तित्व अमान्य करून त्यांच्यावरच बहिष्कार टाकण्याची वेळ आलेली आहे,’असे लीलाबाई इंद्रेकर म्हणाल्या. 

आपल्या बीजभाषणात भूषण कटककर म्हणाले, ‘पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीला मालमत्ता समजण्याचा सर्वात दुर्दैवी दाखला म्हणजे कौमार्य चाचणी हा प्रकार आहे. स्त्रियांनी घरातील स्त्रियांना या प्रथेविरुद्ध लढण्यासाठी प्रवृत्त करायला हवे तर पुरुषांनी घरातील स्त्रियांना आपली मालमत्ता समजणे प्रथम बंद करायला हवे.’ 

या कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते व कंजारभाट समाजातील कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर निमंत्रितांचे कविसंमेलन झाले. त्यात सुप्रिया जाधव, प्राजक्ता पटवर्धन, स्वाती यादव, माधुरी गयावळ, आरुषी दाते, अपर्णा डोळे आदींनी कविता सादर केल्या. 

चंचल काळे यांनी सूत्रसंचालन केले, तर मृण्मयी अस्वार यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search