Next
शिवाजी विद्यापीठात किरणोत्सार मापन यंत्रणा स्थापन
राज्यातील पहिलेच अकृषी विद्यापीठ; संशोधनाचे नवे दालन खुले
BOI
Wednesday, July 24, 2019 | 12:59 PM
15 0 0
Share this article:

शिवाजी विद्यापीठातील ‘आयर्मोन’ सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. पी. एस. पाटील, डॉ. व्ही. जे. फुलारी, डॉ. एन. व्ही. मोहळकर, डॉ. आर. एस. व्हटकर, डॉ. एम. व्ही. टाकळे, डॉ. एन. एल. तरवार

कोल्हापूर : ‘भाभा अणू संशोधन केंद्राच्या ‘आयर्मोन’(IERMON) सुविधेची प्रस्थापना हा शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा असून, त्यामुळे येथील संशोधक शिक्षक व विद्यार्थ्यांना संशोधनाचे एक नवे दालन खुले झाले आहे. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा,’असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागामध्ये भाभा अणू संशोधन केंद्राच्या (बीएआरसी) सहकार्याने इंडियन एनव्हायर्नमेंटल रेडिएशन मॉनिटरिंग नेटवर्क अर्थात ‘आयर्मोन’ (IERMON) ही सुविधा प्रस्थापित करण्यात आली आहे. तिचे औपचारिक उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी  विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, पदार्थविज्ञान अधिविभाग प्रमुख तथा अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील, डॉ. व्ही. जे. फुलारी, डॉ. एन. व्ही. मोहळकर, डॉ. आर. एस. व्हटकर, डॉ. एम. व्ही. टाकळे, डॉ. एन. एल. तरवार व विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. शिर्के म्हणाले, ‘भाभा अणू संशोधन केंद्राने ही सुविधा विद्यापीठामध्ये मोफत प्रस्थापित केली आहे. अशी सुविधा प्रस्थापित करणारे शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील पहिले अकृषी विद्यापीठ ठरले आहे. पर्यावरणात विविध प्रकारचे किरणोत्सार (रेडिएशन) असतात. त्यामध्ये गॅमा रेडिएशनचाही समावेश असतो. या किरणोत्साराच्या पातळीचे मापन, नोंदी घेऊन त्यावर सातत्याने नजर ठेवून विशिष्ट मर्यादेपलिकडे ती गेल्यास त्यावर तातडीने योग्य ती कार्यवाही करणे या दृष्टीने ही सुविधा महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे अणू संशोधन क्षेत्रामधील संशोधक शिक्षक व विद्यार्थी यांना या सर्व माहितीचा अभ्यास व विश्लेषण यासाठी अतिशय महत्त्वाचा उपयोग होणार आहे. विद्यापीठीय अणू संशोधन क्षेत्रात या निमित्ताने एक नवे दालन आज खुले झाले आहे. ‘इस्रो’च्या रिसिव्हर प्रस्थापनेमुळे या पूर्वीच अवकाश संशोधन क्षेत्रातील एक महत्त्वाचे दालन विद्यापीठातील संशोधकांना खुले झाले आहे. त्यानंतर आता या नव्या सुविधेमुळे विद्यापीठाच्या संशोधकीय वाटचालीला आणखी गती प्राप्त होईल. या सुविधेचा योग्य पद्धतीने वापर करावा’.


‘आयर्मोन’ सुविधेच्या प्रस्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. आर. जी. सोनकवडे म्हणाले, ‘अणुऊर्जेमुळे केवळ विध्वंसक अणुबॉम्ब तयार होतो, असे नाही, तर त्यापासून विधायक अशा अनेक बाबी साध्य केल्या जातात. वीजनिर्मिती हा त्याचा महत्त्वाचा पैलू आहेच, पण त्यापुढे जाऊन उद्योग, कृषी, आरोग्य उपचार अशा अनेक बाबींसाठी अणुऊर्जा ही वरदान ठरली आहे. या क्षेत्रात अद्यापही संशोधनाच्या बऱ्याच संधी आहेत. त्याचप्रमाणे खनिज इंधनांच्या अतिरेकी वापरामुळे ग्लोबल वॉर्मिंगसारख्या परिणामांना सामोरे जावे लागत असताना अणुऊर्जेकडे पर्यायी स्रोत म्हणूनही पाहिले जाते आहे. किरणोत्सार नियंत्रित स्वरुपात असेल तर तो मानवासाठी वरदान ठरू शकतो. निसर्गामध्येसुद्धा भूजन्य आणि अवकाशजन्य अशा दोन प्रकारचे किरणोत्सार सुरू असतात. जमिनीमधील युरेनियम, थोरियम आणि पोटॅशियम हे पदार्थ सातत्याने किरणोत्सार करीत असतात. युरेनियमचे प्रमाण एक ते पाच पीपीएम आणि थोरियमचे प्रमाण दोन ते १० पीपीएम इतके असते. जमिनीत मुळातच अवघे एक ते दोन टक्के पॉटॅशियम असते. त्यातीलही केवळ ०.०१२ टक्के इतकेच पोटॅशियम किरणोत्सारी असते. याखेरीज अवकाशात, पर्यावरणात, हवेतही काही विशिष्ट प्रकारचे किरणोत्सार होत असतात. काही विशिष्ट मर्यादेपर्यंत त्यांचा मानवावर काही अनिष्ट परिणाम होत नाही. मात्र, पातळी ओलांडल्यास ती मानवी आरोग्यास धोकादायक ठरू शकते. म्हणून त्यांचे सातत्याने मापन करीत राहणे आवश्यक असते. अशा सर्व प्रकारच्या किरणोत्साराचे मापन करणे ‘आयर्मोन’ सुविधेमुळे शक्य होते. नैसर्गिक किरणोत्साराची पातळी ओलांडली जात असल्याचे यामुळे वेळीच लक्षात येऊ शकते आणि त्यावर गरजेनुसार लघु, मध्यम आणि दूरगामी स्वरुपाच्या योग्य उपाययोजना करणेही संशोधकांना शक्य होते. त्या दृष्टीने नैसर्गिक पर्यावरणीय किरणोत्साराच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे दालन शिवाजी विद्यापीठात खुले होत आहे, ही अभिमानाची बाब आहे’.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search