पुणे : भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅंड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’तर्फे (आयएमईडी) आंतरमहाविद्यालयीन ‘सी-गुगली स्पर्धा २०१८’ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन क्वार्क प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य तांत्रिक अधिकारी क्विंस्टन पिमेन्टा यांच्या हस्ते झाले.
उद्घाटनप्रसंगी भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि ‘आयएमईडी’चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर उपस्थित होते. ही स्पर्धा आयएमईडी कॅंपसमध्ये २१ व २२ सप्टेंबर रोजी झाली.
या स्पर्धेमध्ये पुण्यातील विविध महाविद्यालयांतून एमसीए विभागाचे पदवीचे शिक्षण घेणारे व पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘माहिती तंत्रज्ञान’ विषयावर आधारित या स्पर्धेचे संयोजन प्रा. डॉ. अजित मोरे, प्रा. सत्यवान हेंबाडे, प्रा. डॉ. नीलेश महाजन, भारती ऐलीकर यांनी केले होते.
पदवीचे शिक्षण घेणारे व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्य वाढ आणि क्षमता वाढीसाठी उपयोग व्हावा या प्रमुख हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.