Next
शास्त्रीय संगीतातल्या दिग्गजांच्या आठवणी
BOI
Tuesday, November 20, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

पंडित कुमार गंधर्व आणि ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या सच्च्या रसिकांना, पं. भीमसेन जोशी, पं. वसंतराव देशपांडे, पं. कुमार गंधर्व, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. राम मराठे, माणिक वर्मा, प्रभा अत्रे, मालिनी राजूरकर ही नावं म्हणजे दैवतासमान. आयुष्यात अशा दिग्गजांना भेटता आलं, तर त्याहून मोठं सुख नाही... ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी मधुवंती पेठे सांगत आहेत अशाच दिग्गज कलाकारांच्या भेटीच्या काही आठवणी...
.............................
गायिका माणिक वर्मामाझं भाग्य एवढं मोठं, की माझ्या लहानपणापासून मला संगीत क्षेत्रातल्या दिग्गज कलाकारांना अनेकदा भेटता आलं, त्यांच्या मैफली ऐकता आल्या, अगदी जवळून त्यांचा सहवास अनुभवता आला. याचं कारण म्हणजे माझा जन्म एका कलाकाराच्या घरात झाला. मुंबई आकाशवाणीचे गायक आणि एच. एम. व्ही. कंपनीचे संगीत दिग्दर्शक पं. ए. पी. नारायणगावकर हे माझे वडील. ते स्वत: कलाकार असल्यानं, त्यांची अनेक कलाकारांशी ओळख होती. मैत्री, घरोबा होता. त्यामुळे आमच्या घरात या दिग्गज कलाकारांचं येणं-जाणं असायचं. त्यांच्या गप्पा, चर्चा सगळं काही ऐकायला मिळायचं आणि एका गोष्टीची कायम जाणीव व्हायची, ती म्हणजे संगीताच्या दुनियेतले हे लखलखते तारे, प्रत्यक्ष आयुष्यात किती साधे, नम्र, जमिनीवर पाय असलेले आहेत. शिवाय आपल्या संगीत कलेशी अत्यंत प्रामाणिक. अनेक प्रसंगांमधून मी त्यांचा हा साधेपणातला मोठेपणा अनुभवला, तो खूप भावलाही. 

रात्र रात्र रंगलेल्या या कलाकारांच्या मैफली प्रत्यक्ष समोर बसून ऐकल्या. त्यांना मिळणारी रसिक श्रोत्यांची दाद अनुभवली आणि मला माझ्या आयुष्याचं प्रेयस जणू लहान वयातच सापडलं. सुदैवानं तेच पुढे श्रेयसही झालं. हे सर्व दिग्गज कलाकार, रसिकांमध्ये सारखेच लोकप्रिय होते. कोण ज्येष्ठ, कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ अशी तुलनाच त्यांच्यात शक्य नव्हती. बागेतली सर्वच फुलं आपापल्या परीनं मोहक. कुणाचा रंग, कुणाचा सुगंध त्यांच्या त्यांच्या जागी मोठाच. रसिकांना आनंद देणं हेच त्यांचं काम.

१९६६पासून चेंबूरला आमच्या विद्यालयातर्फे दर वर्षी गानमहर्षी जयंती संगीत महोत्सव साजरा व्हायचा. तीन-चार दिवस सलग हा कार्यक्रम चालायचा. रसिकांना कोणत्याही प्रवेशशुल्काशिवाय प्रवेश आणि कलाकारही मानधनाच्या कोणत्याही अटीशिवाय येत. सगळाच खुशीचा मामला. रसिकांच्या तुडुंब गर्दीत रात्र रात्र कार्यक्रम रंगायचे. कलाकारही अशा रसिकांसाठी मनसोक्त गायचे. १९७८मध्ये पं. भीमसेन जोशी याचं गायन ठेवायचं ठरलं. त्या वेळी यशाच्या शिखरावर असलेले पंडितजी, अप्पांच्या (माझ्या वडिलांच्या) एका फोनवर यायला तयार झाले. केवळ मैत्रीखातर. 

पंडित भीमसेन जोशीपुण्यातून निघून पत्नी वत्सलाबाईंसह पंडितजी सकाळी ११ वाजता आमच्या चेंबूरच्या घरी हजर. जेवण, गप्पा झाल्यावर वामकुक्षी. नंतर सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम. त्या भेटीत पंडितजींनी मला प्रश्न केला, ‘काय.. गाणं शिकतेस ना?’ मी होकारार्थी मान हलवल्यावर म्हणाले, ‘भीमपलास येतो का? कोणत्या बंदिशी येतात?’ ‘अब तो बडी बेर भई बडा ख्याल..’ आणि ‘मिल जाना रामपिया रे.. द्रुत बंदीश येते’, मी सांगितलं. ‘बिरजमें धूम मचायो श्याम... माहिती आहे का?’, परत त्यांनी विचारलं. त्यावर म्हटलं, ‘हो.. (मनातल्या मनात म्हटलं.. त्यात काय, किती सोप्पी बंदिश)’ आणि काय आश्चर्य...!! त्या दिवशीच्या कार्यक्रमात पंडितजी भीमपलास गायले आणि चक्क याच दोन बंदिशी. 

बिरजमें धूम मचायो श्याम। कैसे मैं सखी जाऊॅं अपने धाम।
सब सखियन मिल होरी खेलत है। अखियन डारत गुलाल।।

ही म्हणजे अगदीच प्राथमिक बंदीश, असा समज असलेल्या मला, त्या बंदिशीचं मोठं देखणं रूप ऐकायला आणि पाहायला मिळालं. पंडितजी कधी कधी ‘भीमपलास’मधली, कवन बताई रे.. ही द्रुत बंदीशही घ्यायचे. 

कवन बताई रे। हूं चली जात मथुरा नगरमें। मिलनको श्याम धाम।
नही जाने दिल की प्यासी। है उदासी क्या करू अब। छोड दिये धन धान। जपत हूं नाम। 

मोठी ढंगदार बंदीश. कधी त्या बंदिशीवर रचलेलं, गमते सदा मजला, हे नाट्यगीत गायचे. कोणतीही बंदीश गायले तरी त्यांचा भीमपलास हमखास रंगायचा. पंडितजी अगदी साधेपणानं सांगायचे, ‘मला कितीही राग माहीत असले, तरी मैफलीत गायला मोजकेच दहा-बारा राग आवडतात.’ 

पंडितजींच्या सच्च्या सुरांनी जाणते-अजाणते सर्वच रसिक मोहून जायचे. त्यामुळेच ते ख्याल गात असावेत. अभंग, मग तो मराठी असो वा कन्नड, ऐकणारा श्रोता, त्यांच्या धबधब्यासारख्या सूर-प्रवाहात चिंब भिजून जायचा. माझ्या लहानपणापासून कित्येक वर्षं मी त्यांचे कार्यक्रम ऐकत आले; पण त्यांच्या स्वरातला ताजेपणा, आवाजातला भारून टाकणारा भारदस्तपणा तसाच राहिला. त्यांच्या अभंगवाणी कार्यक्रमांतून लोकप्रिय झालेले सर्वच अभंग रागदारीवर आधारित असत. ते ऐकताना अगदी सोपे वाटायचे; पण गायला गेलं, की कळायची त्यांच्या गायकीची खोली. तसंच पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात, शेवटच्या दिवशी पहाटे रंगायचा तो पंडितजींचा तोडी. त्यासोबत गोपाला, करूना क्यूं नही आये.. या ठुमरीचे आर्त स्वर.

या सर्व गोष्टींबरोबरच मला त्यांच्या आणखी एका गोष्टीचं खास अप्रूप होतं. पंडितजी कुठेही भेटले, तरी अगदी नावासकट मला ओळखायचे, याचं. अनेक वर्षांनी बोरिवलीला एका कार्यक्रमासाठी पंडितजी आले होते. मी त्यांना जाऊन भेटले, नमस्कार केला. विचारलं, ‘ओळखलंत कां?’  तसं हसून ते म्हणाले, ‘एपीची मुलगी... चेहराच सांगतोय.’ मी मनोमन हरखून गेले. सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सितारादेवी यांचे नृत्याचे कार्यक्रम मी लहानपणी खूप वेळा पाहिले. विशिष्ट लयदार ठेक्यावर पदन्यास करणं आणि ठुमरीवरचा भावपूर्ण अभिनय मला फारच आवडायचा. त्यापैकी एक प्रसंग लक्षात राहिला तो असा... 

उस्ताद झाकीर हुसैन१९६७-६८ची गोष्ट असेल. दादरच्या डिसिल्वा शाळेच्या प्रांगणात झालेल्या महाराष्ट्र राज्य संगीत महोत्सवात सितारादेवींचं नृत्य होतं. तबलासाथीला तरुण वयातला झाकीर हुसैन होता. तोडे-परण-गती अप्रतिम वाजवत होता. सितारादेवीही त्याच्या वादनावर खूश होत्या. त्या पढंत करीत (बोल म्हणत) आणि त्यानुसार नाचून दाखवत. तेव्हा त्यांच्याबरोबर तसेच बोल झाकीर वाजवत होता. दोघांची जुगलबंदी रंगली होती. मग झाकीरने बोल वाजवावेत आणि सितारादेवींनी त्याप्रमाणे पदन्यास करावा अशी जुगलबंदी सुरू झाली. दोघेही एकसे बढकर एक. कोणी मागे हटेना. रसिकांना तर ती पर्वणीच वाटत होती. ते बेहद खूश. टाळ्यांच्या कडकडाटानं रसिकांनीच दोघांना मानवंदना दिली. त्या वेळी सितारादेवी कौतुकानं झाकीरला म्हणाल्या, ‘हम असली घी के जमानेके लोग है। मैं साठ साल की और तुम तो अभी जवान हो। बहोत अच्छा बजा रहे हो। लेकीन मेरी उमरमें ऐसा बजाओगे तो मान जाऊँ।’, त्यावर झाकीरने लगेच उठून त्यांचे पाय धरले. आशीर्वाद घेतले. झाकीरचं रुबाबदार व्यक्तिमत्त्व, त्यानं लहानपणापासून केलेली तबलावादनाची साधना, वागण्या-बोलण्यातली अदब, सर्व काही कुणालाही भुरळ पडावी असंच होतं. 

या दिग्गज कलाकाराबद्दल एक गोष्ट मला नेहमीच भावली, ती म्हणजे आपल्या कलेच्या सादरीकरणात ते असे काही हरखून जातात, की एक दिव्य तेज-साधनेची आभा त्यांच्याभोवती दिसायला लागते. असं कलाकारांचं स्वर्गीय सौंदर्य न्याहाळण्याचं भाग्य मला अनेक वेळा लाभलं. असंच ऐकलेलं उस्ताद तिरखवाँ साहेबांचं तबलावादन लक्षात राहिलंय. दादरच्या छबिलदास शाळेत कार्यक्रम होता. त्या वेळी खाँ साहेबांचं वय फक्त नव्वद वर्षं. सभागृह खचाखच भरलेलं. आम्ही स्टेजला चिकटून पुढेच बसलेलो. वार्धक्यानं झुकलेल्या खाँ साहेबांना, दोघांनी आधार देऊन सभागृहात आणलं आणि अक्षरश: उचलून स्टेजवर ठेवलं. या परिस्थितीत ते आता काय आणि किती वेळ वाजवणार असा विचार सर्वांच्याच मनात येऊन गेला असणार; पण खाँ साहेबांनी तबल्यावर थाप मारली आणि सुरू केलेला त्रिताल चक्क सव्वा तास वाजवला. सर्व रसिक थक्क होऊन ऐकत होते. आधी जाणवलेलं वार्धक्य वादनात मात्र कुठेच दिसत नव्हतं. मनगटापासून पुढचे दोन्ही हाताचे पंजे, तरुणाला लाजवतील अशा सफाईनं फिरत होते. चेहऱ्यावर वादनातली प्रसन्नता आणि तपश्चर्येचं तेज दिसत होतं. त्यांच्या तबलावादनातली एक दिव्य अनुभूती त्या दिवशी रसिकांना पाहायला मिळाली होती.

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होईल. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
आसावरी शास्त्री About 329 Days ago
फार सुंदर लेख आहे. ही दिग्गज माणसं... प्रत्यक्षात इतकी साधी असतात म्हणूनच तर ती मोठी असतात..
0
0
Mahesh Sathe About 329 Days ago
Khup chhan lekh.
0
0

Select Language
Share Link
 
Search