Next
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कधी काढून घ्यावी?
BOI
Monday, June 17, 2019 | 12:12 PM
15 0 0
Share this article:म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना नेहमी एक प्रश्न पडतो, तो म्हणजे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक नेमकी काढायची कधी? गुंतवणूक कुठे, किती आणि कशी करावी, याबाबतचा सल्ला आर्थिक नियोजन सल्लागार देतात; मात्र ती कधी काढावी याबाबत सांगत नाहीत. या प्रश्नाचे उत्तर देणारा हा लेख...
..................
म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना त्यांनी ज्यात पैसे गुंतवले आहेत, त्या फंडांच्या कामगिरीच्या तुलनेत कमी परतावा मिळतो, असे अभ्यासातून दिसून आले आहे. हे घडण्यामागे बरीच कारणे आहेत. मात्र, प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे गुंतवणूकदारांची चुकीच्या वेळी गुंतवणुकीतून बाहेर पडण्याची प्रवृत्ती. जेव्हा बाजार बेभरवशाचा होतो आणि सर्वोत्तम म्युच्युअल फंडही वाईट कामगिरी करू लागतात तेव्हा गुंतवणूकदार गोंधळून जातात आणि पुढील नुकसान टाळण्याच्या हेतूने फंड विकून टाकतात. खरे म्हणजे त्यांनी फंडाची विक्री करेपर्यंत नुकसान असे झालेलेच नसते; तोपर्यंत कोणतेही नुकसान हे कल्पनेच्या पातळीवरच असते. पुढे, जेव्हा ते फंड जोर धरू लागतात आणि बाजारातील परिस्थिती पालटते, तेव्हा गुंतवणूकदारांच्या मनात पुन्हा आशा पल्लवीत होते आणि ते पुन्हा पैसे गुंतवू लागतात. एकदा विक्री करून अशा तऱ्हेने पुन्हा पैसे गुंतवण्याच्या प्रक्रियेत गुंतवणूकदार परताव्याच्या बाबतीत मोठे नुकसान करून घेतात. अर्थात, यासाठी एकट्या गुंतवणूकदाराला दोष देता येणार नाही. गुंतवणूक करण्याबद्दल, एसआयपी सुरू करण्याबद्दल सल्ले प्रत्येक जण देतो; पण या गुंतवणुकीचे रूपांतर प्रत्यक्ष पैशात कधी करायचे याबद्दल कोणीच काही सांगत नाही. खरे म्हणजे गुंतवणूक कधी करावी हे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच त्यातून पैसा कधी काढून घ्यावा हेही महत्त्वाचे आहे.

तुम्हाला म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून पैसा काढून घ्यावासा वाटेल, अशा पाच स्थिती खाली दिलेल्या आहेत.

- तुम्ही एखाद्या लक्ष्यापर्यंत पोहोचता तेव्हा..

बहुतेक जण पैसे गुंतवतात ते घर खरेदी करण्यासाठी, स्वप्नातील सुटीवर खर्च करण्यासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी. तुम्हाला ज्या लक्ष्यासाठी पैसा लागणार आहे, त्याच्या ६ ते १२ महिने आधी, तुमची शेअरमधील गुंतवणूक विकून टाका आणि तो पैसा मुदतठेव किंवा फ्लोटिंग रेट फंडात टाका. बाजारात मंदी असेल, तर तुम्ही दुसऱ्या एखाद्या स्रोतांतून पैसा उभा करू शकता का हे तपासा किंवा तुमचे लक्ष्य थोडे पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा.

- तुम्हाला वैयक्तिक आपत्कालीन परिस्थितीसाठी पैसा हवा असतो तेव्हा...

तुम्ही तुमच्या आकस्मिकता खात्यात टाकलेल्या रकमेहून अधिक पैसा आवश्यक आहे अशी परिस्थिती व्यक्तिगत आयुष्यात उद्भवू शकते. अशा वेळी पीपीएफ आणि टपाल खात्यातील बचती मुदतपूर्व काढण्याची सोय नसेल, तर तुम्हाला म्युच्युअल फंड विकून पैसा उभा करावा लागू शकतो. 

 तुमच्या पोर्टफोलिओचा ताळेबंद नव्याने बसवावा लागतो तेव्हा....

तुमच्या गुंतवणुकीचे ९१ टक्के यश अवलंबून असते ते संपदेच्या विभाजनावर (अॅसेट अलोकेशन) असे अभ्यासांती सिद्ध झाले आहे. समजा, तुम्ही ६० टक्के इक्विटी आणि ४० टक्के डेट असे प्रमाण निश्चित केले आहे; पण बाजारातील परिस्थितीमुळे तुमच्याकडील इक्विटीचे प्रमाण ८० टक्के झाले. आता पोर्टफोलिओ पूर्वीच्या विभाजनावर आणण्यासाठी तुम्हाला इक्विटी विकण्याची आणि डेट विकत घेण्याची गरज भासेल. अशा परिस्थितीत तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडाचे रूपांतर डेट म्युच्युअल फंडात करू शकता.

तुमची गुंतवणूक खराब कामगिरी करते तेव्हा...

तुमची गुंतवणूक वाईट कामगिरी करेल, अशा वेळाही येतात. असे घडते तेव्हा ही खराब कामगिरी कशामुळे होत आहे याचा विचार करा. मोजक्या विभागांमध्ये गर्दी झाल्यामुळे, फंड व्यवस्थापक बदलल्यामुळे की एकंदर बाजाराची कामगिरी वाईट असल्यामुळे गुंतवणुकीची कामगिरी खराब होत आहे याचा विचार करा. काही वेळा, एखादा फंड खूप चांगली कामगिरी करतो, तेव्हा त्याच्याकडे पैशाचा मोठा ओघ वळतो आणि या पोर्टफोलिओतील अतिरिक्त रोख रकमेमुळे तात्पुरत्या काळासाठी खराब कामगिरीचे चित्र निर्माण होते. अर्थात स्कीमच्या मूलभूत गुणविशेषातच बदल झाला असेल, तर तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून फंड विकून टाकण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. 

अधिक चांगली संधी उपलब्ध असते तेव्हा...

बहुतेक लोक गुंतवणुकीतून पैसे काढून घेण्यासाठी देतात आणि याचा परिणाम म्हणून संपूर्ण पोर्टफोलिओ घुसळून निघतो. तुमची गुंतवणूक वर दिलेल्या कारणांपैकी कशामुळे खराब कामगिरी करत नसेल, तर अधिक चांगल्या परताव्यासाठी या गुंतवणुकीतून पैसे काढून त्या गुंतवणुकीत घालण्यापेक्षा आहेत तेथेच ते ठेवणे कधीही उत्तम. अन्य कोणत्याही क्षेत्राप्रमाणे गुंतवणुकीच्या जगातही निष्ठेचे फळ मिळतेच. कारण यामुळे तुमचा खर्च, कर कमी होतात आणि परतावा वाढतो.


अनेक लोकांना बाजारातील विविध परिस्थितींचा अंदाज घेणे, गतकाळातील  प्रवाहांचा अभ्यास करणे आणि आपल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करणे सोपे जात नाही. येथेच मदतीला येतो तो आर्थिक नियोजक. तो तुम्हाला उद्दिष्टांचे नियोजन करण्यास, आदर्श विभाजन निश्चित करण्यास, गुंतवणुकीच्या योग्य पर्यायाची निवड करण्यास मदत करतो आणि वेळोवेळी तुमच्या पोर्टफोलिओचा आढावाही घेण्यात मदत करतो. थोडक्यात, तुमची उद्दिष्टे डोक्याला कोणताही मनस्ताप न होता पूर्ण करण्याचा आनंद मिळवण्यासाठी तो तुम्हाला मदत करतो.

अमर पंडित, संस्थापक, हॅपीनेस फॅक्टरी डॉट इन
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search