Next
कृषी उत्पन्नात कोटीच्या उड्डाणाचा ‘जांब’ गावाचा संकल्प
‘अनिवासी सातारकर मित्र’ संस्था देणार मदत
BOI
Monday, August 20, 2018 | 04:14 PM
15 0 0
Share this article:


पुणे : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील ‘जांब’ या गावाने जलसंधारणाद्वारे शेतीचे पाणी वाढविण्याचा आणि त्याद्वारे गावाचे कृषी उत्पन्न एक कोटी रुपयांनी वाढविण्याचा संकल्प केला आहे. जलयुक्त शिवार, पाणी फाउंडेशन स्पर्धा, वनविभागाची कामे अशा अनेक माध्यमातून गावाने श्रमदान, योगदान देऊन  पाणी पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केले असून,गावातील पाचशे एकर पडीक जमीन लागवडीखाली येणार आहे. 

 सरपंच रेश्मा निकम‘या कामात पुण्यातील ‘अनिवासी सातारकर मित्र’ संस्था गावाला मदत करणार आहे. पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास गेलेल्या कामांमुळे गावातील पाचशे एकर पडीक जमीन लागवडीखाली येणार आहे’, अशी माहिती गावच्या सरपंच रेश्मा निकम यांनी दिली.

 ‘जरंडेश्वर डोंगरालगत असलेल्या या गावाची लोकसंख्या एक हजार ९९४ इतकी आहे. गावाला तीन डोंगराचे सान्निध्य असून, या डोंगरातून ‘माथा ते पायथा’ तत्त्वावर जलसंधारणाची कामे केली. त्यासाठी तीन पुरुष, दोन महिलांनी ‘पाणी फाउंडेशन’चे प्रशिक्षण घेतले आहे. गावाने पहिल्याच वर्षी पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत सहभागही घेतला. भारतीय जैन संघटनेने गावाला ‘जेसीबी’, ‘पोकलेन’ दिले. त्यातून साडेतीनशे तास काम झाले. या दोन यंत्रांसाठी डिझेलची व्यवस्था वर्गणी काढून करण्यात आली. ओढ्यांचे खोलीकरण, नाल्यातील, पाझर तलावातील गाळ काढणे अशी कामे झाली. गावाने एकोणीस हजार मीटर इतके सलग समतल चर (सी.सी.टी.), दोन पाझर तलाव तयार केले आहेत. वृक्षारोपणासाठी चार हजार खड्डे घेतले असून, रोपवाटिका उभारून चिंच, करंज, जांभूळ अशी पाच हजार रोपे तयार केली आहेत’, असेही निकम यांनी सांगितले.

‘शेजारच्या अनेक गावात हिरवळ दिसत असताना, आमची शिवारे, शेती उघडी दिसत असे. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन जलसंधारणाचे काम करण्याचे ठरवले आणि त्यानुसार सगळ्या गावाने एकत्र येऊन श्रमदान केले. आता गावातील शेतीला मुबलक पाणी मिळेल. खरीप हंगामात सोयाबिनचे पहिले पिक निघाल्यावर पाचशे एकर शेती पाण्यावाचून पडीक रहायची. आता रब्बी हंगामात या वर्षीच्या जलसंधारणाच्या कामामुळे पाणी उपलब्ध झाल्यानंतर गहू, हरभरा, ज्वारी अशी पिके घेता येतील आणि गावचे एकत्रित कृषी उत्पन्न एक कोटी रुपयांनी वाढेल, अशी खात्री वाटते’, असे गावकरी संतोष निकम यांनी सांगितले.

‘पुण्यातील स्वयंसेवी संस्था, कंपन्यांचे सीएसआर फंड यातून गावाचे जलसंधारण नियोजन पूर्ण व्हावे आणि गावातील सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी ‘अनिवासी सातारकर’ संस्था प्रयत्न करणार आहे’, असे संस्थापक बी. एस. जाधव यांनी सांगितले. 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search