Next
उद्योग, शिक्षण क्षेत्रात सहकार्यवाढीची आवश्यकता
‘एमसीसीआयए इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह’मध्ये तज्ज्ञांचे मत
BOI
Friday, December 07, 2018 | 12:29 PM
15 0 0
Share this story

‘इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह’मध्ये सहभागी झालेले डॉ. राजेंद्र जगदाळे, प्रशांत गिरबाने, दिनानाथ खोलकर, प्रदीप भार्गवा, नूर नक्सबांदी व चमनलाल धांडा.

पुणे : ‘अभिनवता हा कुठल्याही उद्योगाच्या व्यवसाय धोरणातील महत्त्वाचा घटक असून, त्याला चालना देण्यासाठी उद्योग व शिक्षण क्षेत्रात अधिक समन्वय व सहकार्य गरजेचे आहे’, असे मत सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडियाचे सरसंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी व्यक्त केले. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरतर्फे हॉटेल शेरटन ग्रँड येथे एक दिवसीय ‘इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. 

या वेळी टीसीएस लिमिटेडचे उपाध्यक्ष व अॅनालिटिक्स अँड इनसाईटस विभागाचे जागतिक प्रमुख दिनानाथ खोलकर, जीआयझेड इंडियाच्या प्रायव्हेट सेक्टर विभागाचे संचालक नूर नक्सबांदी, जीआयझेडच्या एमएसएमई इनोव्हेशन प्रोजेक्ट विभागाचे संचालक चमनलाल धांडा, ‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष प्रदीप भार्गवा व सरसंचालक प्रशांत गिरबाने उपस्थित होते. या वेळी डॉ. राजेंद्र जगदाळे आणि दिनानाथ खोलकर यांनी बीजभाषण केले. 

या उद्घाटनाच्या सत्रात दोन महत्त्वाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. जीआयझेड आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर यांच्यात लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये नवनिर्मितीला चालना देण्यासाठी सहकार्य करण्याबाबत करार झाला, तर जीआयझेड आणि टाटा टेक्नॉलॉजीज यांच्यात वाहन उद्योग आणि हवाई वाहतूक उद्योग या दोन क्षेत्रात सहकार्य करार झाला. 

डॉ. राजेंद्र जगदाळे पुढे म्हणाले, ‘अभिनवतेसाठी लोकांशी संवाद साधणे गरजेचे आहे. लोकांशी आपण जेव्हा संवाद साधतो, तेव्हा त्यांच्या समस्या आपल्या लक्षात येतात आणि त्या लक्षात आल्यावर संशोधन करून नावीन्यपूर्ण उपाययोजना आपण विकसित करू शकतो. यासाठी उद्योग, संशोधन संस्था व शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये समन्वय आणि सहकार्य महत्त्वाचे आहे.’

टीसीएस लिमिटेडचे उपाध्यक्ष व अॅनालिटिक्स अँड इनसाईटस विभागाचे जागतिक प्रमुख दिनानाथ खोलकर म्हणाले, ‘संशोधन व अभिनवता हे उद्योगातील महत्त्वाचे घटक असून, यासाठी आमच्या कंपनीने याआधीच अॅकॅडेमिक्स इंटरफेस प्रोग्राम सुरू केला होता. त्याअंतर्गत आमच्या कंपनीमध्ये फॅकल्टी व्हिजिट, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, अॅन्युअल मीट, विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक कार्यशाळा, इंटर्नशिप प्रोग्राम असे अनेक पुढाकार घेण्यात आले. डिजिटल इंडियाला चालना मिळावी यासाठी पुढील पिढीचे विद्यार्थी घडविण्यासाठी व्हीजेटीआयमध्ये आयओटी लॅब प्रस्थापित करण्यात आली. त्याशिवाय शिक्षण क्षेत्रासाठी ‘टीसीएस आयओएन’ या सर्वांत मोठ्या व्यासपीठाची निर्मिती केली आहे.

या वेळी बोलताना जीआयझेड इंडियाच्या प्रायव्हेट सेक्टर विभागाचे संचालक नूर नक्सबांदी म्हणाले, ‘नुसतीच चांगली संकल्पना असणे पुरेशी नाही. ती प्रत्यक्षात कशी उतरविता येईल हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शिक्षण संस्था व उद्योगामध्ये सहकार्य महत्त्वाचे आहे, पण त्याचबरोबर संशोधन व अभिनवतेवर काम करणाऱ्या गटांमध्ये विविधता हवी.’

‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष प्रदीप भार्गवा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या परिषदेची संकल्पना ‘कोलॅबोरेट टू इनोव्हेट’ अशी होती. ही परिषद जर्मन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व भारत सरकारच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये धोरणकर्ते, उद्योगातील नेतृत्व, शिक्षणतज्ञ, लघु व मध्यम उद्योगातील प्रतिनिधी आदींनी भाग घेतला होता.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link