Next
ग्रेट एस्केप
प्रसन्न पेठे
Friday, October 27 | 03:35 PM
15 0 0
Share this story

शेतकरी कुटुंबातून मुंबईत नोकरीसाठी आलेल्या शरद या पत्रकाराच्या आयुष्यात अतर्क्य आणि विलक्षण घटना घडतात. एका खासगी कंपनीतली नोकरी सुटते; पण कंपनीच्या मालकाची मुलगी त्याच्या प्रेमात पडते. पुन्हा पत्रकारितेकडे वळल्यानंतर त्याला वार्तांकनासाठी काबूलमध्ये जावं लागतं. तिथे तो अफगाणिस्तानच्या अंतर्गत घडामोडींमध्ये ओढला जात्तो. अमेरिका, तालिबान, खुनाचा खटला, पाठलाग, गोळीबार, भुयारातून पलायन असा मसाला ठासून भरलेली ही कादंबरी – ‘ग्रेट एस्केप.’ त्या कादंबरीची ही ओळख...
.............
पत्रकार मंडळींचे दैनंदिन आयुष्य नेहमीच रंगतदार घटनांनी भरलेले असते. ‘ग्रेट एस्केप’ कादंबरीचा कथानायक हाही एक पत्रकार. एका शेतकरी आंदोलनाच्या वेळी पोलीस गोळीबारात गुंडाप्पा बिरके या शेतकऱ्याचा बळी जातो. त्या संदर्भात शरदने केलेली बातमी भलतीच खळबळ उडवते. शरदवर कारवाई होऊन त्याला तुरुंगात जावे लागते. त्याची नोकरी जाते. तुरुंगातून सुटून आल्यावर टीव्हीवरच्या मुलाखतीमुळे मात्र तो रातोरात प्रसिद्धीच्या झोतात येतो.

एका खासगी कंपनीत नोकरी मिळते; पण तिथेही त्याच्या प्रामाणिक वागण्याचा त्रास होणारे, काहीतरी कारस्थान रचून त्याला मालकाच्या नजरेतून उतरवून हाकलतात. पुढे काही विलक्षण घटना घडून त्याच मालकाची मुलगी, सिमरन त्याच्या आयुष्यात येते. आणि यथावकाश त्यांचे प्रेमही जमते. त्याच्या घरून त्यांच्या लग्नाला संमतीही मिळते. 

दरम्यान, त्याला दिल्लीच्या एका नामवंत इंग्लिश दैनिकात नोकरी मिळते. तो दिल्लीला जातो. तिथे अण्णा हजारेंचे आंदोलन जवळून पाहून त्याचे वार्तांकन करतो. ते गाजते. दरम्यान त्याचे नातेवाईक आणि सिमरनसुद्धा दिल्लीत येऊन जाते. पुढे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते. त्याच्यावर दैनिकातर्फे मोठी कामगिरी सोपवली जाते, ती म्हणजे तालिबानच्या विळख्यात सापडलेल्या अफगाणिस्तानमध्ये जाऊन वार्तांकन करण्याची! 

शरद काबुलला जातो. अफगाणमधली ढासळलेली राजकीय स्थिती, उद्ध्वस्त झालेली सामाजिक चौकट आणि तालिबानचा वाढता प्रभाव पाहतो. तिथले भ्रष्ट नेते आणि उद्ध्वस्त सामाजिक परिस्थिती त्याला कुठेतरी भारताशी साधर्म्य दाखवून देते आणि तशीच स्थिती होऊ शकणाऱ्या भारताच्या भवितव्याविषयी चिंताही उत्पन्न करते!
 
त्याची ओळख अफगाणिस्तानच्या संसदेमध्ये, लोया जिर्गामध्ये काम करणाऱ्या मसूदशी होते. दोघांची मैत्रीही होते. दरम्यान त्याला तिथल्या पुरुषसत्ताक पद्धतीत चर्चेचा विषय ठरलेली एक विशेष केस ऐकायला मिळते. आपल्याच नवऱ्याचा हमीदाने केलेला खून. वरकरणी साधी वाटणारी ती केस प्रत्यक्षात गंभीर असते. शरद त्याच्या चौकस स्वभावानुसार त्यातले सत्य जाणू इच्छितो. हमीदाची मुले गायब करण्यात आलेली असतात. का? कशासाठी? शरद त्या केसमुळे एका वेगळ्याच गुंत्यात अडकत जातो. जेमतेम १७व्या वर्षी तालिबान्यांची दहशत न जुमानता सामाजिक कार्य करणाऱ्या ‘परी’ नावाच्या सुंदर मुलीशी त्याची भेट होते. हमीदाची मुले शोधण्यासाठी ती शरदला मदत करायला तयार होते.   

पुढे मसूद शरदला आपल्या गावच्या हवेलीत घेऊन जातो; पण तिथे त्यांच्यावर मसूदच्या विरोधकांचा जिवघेणा हल्ला होतो. मसूदच्या हवेलीवर बॉम्बस्फोट आणि गोळ्यांचा वर्षाव.... हवेलीच्या गुप्त भुयारातून जाताना त्यांच्यावर तुफानी गोळीबार.... पुढे काय होते? मसूद आणि शरद दोघेही जिवंत राहतात का? दोघे निसटू शकतात का? परीचे काय होते? हमीदाच्या मुलांचे काय होते? सिमरनचे काय होते? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वाचा अमोल जाधवलिखित ‘ग्रेट एस्केप.’ 

पत्रकारिता, सामाजिक चळवळी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, आधुनिक तरुणाई आणि त्यांची जीवनशैली, मानवी आयुष्याची क्षणभंगुरता, अफगाणिस्तानमधली राजकीय परिस्थिती आणि तिथे होणारा अमेरिका, रशियाचा हस्तक्षेप अशा विविध बाबींना स्पर्श करीत अमोल जाधव यांनी ही कादंबरी रचली आहे. त्यासाठी त्यांनी इतिहास, भूगोल आणि वर्तमानाचा अभ्यास केलेला जाणवतो. काही ठिकाणी त्यांनी आपल्या प्रतिभेने काही अचाट घटनांची निर्मिती केलेली दिसते; पण ती अशा प्रकारच्या वेगवान, थरारक कादंबरीतली रंजकता कायम ठेवण्यासाठी चालून जाते.

ज्यांना देशोदेशीच्या डिटेक्टिव्ह कादंबऱ्या नियमित वाचण्याची सवय आहे किंवा जेम्स बाँडचे सिनेमे बघण्यात मजा येते, अशांना ही कादंबरी जवळची वाटेल. १६८ पानांची ही कादंबरी वाचनीय आहे. 

लेखक : अमोल जाधव 
प्रकाशक : महाजन ब्रदर्स, २२७, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३०
पृष्ठे : १६८ 
मूल्य : २३५ रुपये
  
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा.)  
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link