Next
आगाशे विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी घेतला निवासी शिबिराचा आनंद
BOI
Monday, March 11, 2019 | 12:50 PM
15 0 0
Share this storyरत्नागिरी :
रत्नागिरीतील कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी नुकताच निवासी शिबिराचा आनंद लुटला. योग्य नियोजनामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला.

मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांनी शाळेत निवासी शिबिर आयोजित करण्याची कल्पना मांडली आणि सर्व शिक्षकांनी त्या कल्पनेला आनंदाने पाठिंबा दिला. चौथीच्या तीन तुकड्यांतील विद्यार्थी व शिक्षक शिबिरात सहभागी झाले. पालकांना याची पूर्वकल्पना देण्यात आली होती. यातत मुलांना मजा-मस्तीबरोबरच काही वेगळे करायला, पाहायला, अनुभवायला मिळाले. शिबिराच्या दिवशी सकाळी शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर यांनी शिबिराचे उद्घाटन केले. मुलांनी रंगीबेरंगी फुगे उडवून उपक्रमाची सुरुवात केली. प्रबंधक विनायक हातखंबकर, विनय परांजपे, सुनील वणजू आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले.१२ विद्यार्थी आणि एक शिक्षक असे गट तयार करण्यात आले होते. गो. भ. बियाणी बालमंदिरच्या मुख्याध्यापिका शेट्ये यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका कदम यांनी प्रास्ताविकामध्ये शिबिराची माहिती दिली. चित्रकला, मातीकाम कार्यशाळेत श्रीकांत ढालकर यांनी विद्यार्थ्यांना वेगळ्या विश्वात नेले. त्यांनी गणपतीबाप्पाचे गाणे म्हणत फळ्यावर छान चित्र काढले. चित्र कसे काढायचे हे मुलांशी छान संवाद साधून त्यांनी सांगितले. त्रिकोण, चौकोन अशा भौमितिक रचनांतून चित्रे कशी काढायची हेदेखील त्यांनी दाखविले. हत्ती, बगळा, फूल यांचे चित्र या भौमितिक रचनांचा वापर करून त्यांनी काढून दाखवले. पुढे काही पक्षी, त्यांची चित्रे दाखवून माहिती सांगितली. त्या त्या पक्ष्यांचे आवाजही काढून दाखवले. खंड्या, दयाळ, भारद्वाज यांचे हुबेहूब आवाज ऐकून मुले रमली. मातीपासून विविध वस्तू बनवण्यासही त्यांनी शिकवले. तोंड बंद करून गाणे म्हणणे, हसताना गाणे म्हणणे असे काही गमतीशीर प्रकारही त्यांनी दाखवले. त्यामुळे या शिबिरातील सर्वांना मजा आली. नंतर मुलांनी मातीकाम केले व गाणी म्हटली. (ढालकर यांच्या सादरीकरणाचा व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)कागदकाम कार्यशाळेत मुलांनी पिशव्या बनवल्या. त्यानंतर बालोद्यानातील स्विमिंग टँकमध्ये शिक्षकांच्या देखरेखीखाली विद्यार्थ्यांनी भिजण्याची मजा लुटली. दिवेलागणीच्या वेळी प्रांगणात तुळशीपुढे पणत्या लावल्या. लायटिंगमुळे शाळेची शोभा वाढली. शुभंकरोती, अथर्वशीर्ष, रामरक्षा स्तोत्रे सर्वांनी म्हटली. वाढदिवसानिमित्त मुलांचे औक्षण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई या वर्गातील विद्यार्थ्यांनी गप्पा मारल्या, गाणी म्हटली. 

खिचडी व टॉमेटो सूपचा आस्वाद घेतल्यानंतर श्रीवल्लभ साठे यांनी विद्यार्थ्यांना दुर्बिणीतून आकाशदर्शन घडवले. त्यानंतर मुलांनी शेकोटीचा आनंद घेतला. नंतर मुले झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सर्व मुले पहाटे उठून प्रांगणात जमा झाली. रिया मलुष्टे हिने झुंबा डान्स शिकवला. नंतर चहा-बिस्किटाचा आस्वाद आणि रम्य आठवणी घेऊन मुले घरी परतली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link