Next
मुंबईतील पर्यटन : कुलाबा, नरिमन पॉइंट परिसर
BOI
Wednesday, August 28, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण मुंबईचा इतिहास थोडक्यात पाहिला. तसेच गेटवे ऑफ इंडिया परिसराची माहिती घेतली. आजच्या भागात पाहू या कुलाबा आणि नरिमन पॉइंट परिसर.
..........
ताज हॉटेलच्या समुद्रकिनाऱ्याला लागून असलेला रस्ता थेट बाँबे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबवरून कुलाबा भागात जातो. कफ परेड आणि नरिमन पॉइंट हा भाग उच्चभ्रू वस्तीचा आहे. या भागात अनेक टोलेजंग इमारती आहेत. विविध बहुराष्ट्रीय कंपन्या, हॉटेल्स या भागात आहेत. कफ परेडच्या दक्षिणेला कुलाबा भाग असून, त्यातील बऱ्याच भागात जाता येत नाही. तो नौदलाच्या ताब्यात आहे. मंत्रालयाच्या समोरील मादाम कामा रोडच्या दक्षिण बाजूपासून नेव्हीनगरपर्यंतच्या भागाची माहिती आजच्या भागात घेऊ या.

विधानभवन

विधानभवन :
नरिमन पॉइंट येथे महाराष्ट्राच्या विधानभवनाची देखणी इमारत उभी आहे. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्राची पारंपरिक नऊवारी साडी नेसून या इमारतीचे उद्घाटन केले होते. या इमारतीसाठी अभ्यास करण्याकरिता शंकरराव चव्हाण यांनी मलेशियाला अधिकारी पाठविले होते. हनीकोंब प्रकारात असलेली घुमटाकार इमारत तिच्या वेगळेपणाने आकर्षक दिसते. विधानसभा व विधान परिषद, तसेच संयुक्त सभागृह आणि सचिव व मंत्र्यांची कार्यालये यात अंतर्भूत आहेत. याच्या तळघरात ४५० टन क्षमतेची वातानुकुलन यंत्रणा आहे. 

कफ परेड : हा मुंबईतील एक उच्चभ्रू निवासी भाग आहे. नेव्हीनगर आणि बधवार पार्कच्या मध्ये असलेल्या या भागात अनेक श्रीमंती घरे आहेत. बॉम्बे सिटी इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट या संस्थेचे टी. डब्ल्यू. कफ यांचे नाव या भागाला देण्यात आले आहे. टी. डब्ल्यू. कफ १९०१-१९०२मध्ये नगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. मुंबईत प्लेगच्या साथीला पायबंद घालण्यासाठी बॉम्बे सिटी इम्प्रूव्हमेंट ट्रस्टची (बीआयटी) स्थापना नऊ डिसेंबर १८९८ रोजी केली गेली. महापालिका आणि शासनाने सर्व रिक्त जागा या मंडळाकडे सोपविल्या. शहरातील स्वच्छता आणि राहणीमान सुधारण्यासाठी या संस्थेने बऱ्याच उपाययोजना केल्या. या ट्रस्टमुळे योजनाबद्ध उपनगरे अस्तित्वात आली. 

हजरत शेख हसन दर्गासंस्थेने शहराच्या मध्यभागी, गर्दीच्या ठिकाणी रस्ते रुंदीकरण केले. गर्दीच्या रहिवासी भागांच्या मध्यभागी समुद्राच्या हवेला वाहण्यासाठी एक नवीन पूर्व-पश्चिम रस्ता, प्रिन्सेस स्ट्रीट बनविला गेला. याच दिशेने उत्तर-दक्षिण सिडनहॅम रोडदेखील (आता मोहम्मद अली रोड) बांधला गेला. १८९८नंतर मुंबईचा अफाट विस्तार झाला. लोकसंख्या कोटीच्या घरात गेली. लोकांचे राहणीमान उंचावले. रस्त्यावरून आधी सायकल, मग स्कूटर आणि मग चारचाकी जाऊ लागल्या; पण रस्ते तेवढेच आहेत. फार फार तर एकदिशा मार्ग झाले. त्यात रस्तारुंदी फारशी करावी लागली नाही. याचे श्रेय या संस्थेकडे जाते. 

नेव्हीनगर : हे कुलाब्याच्या दक्षिणेकडील टोकावर वसलेले आहे. टाटा मूलभूत संशोधन संस्थाही याच भागात आहे. हजरत शेख हसन अली दर्गाही याच भागात आहे. कोहली स्टेडियम, फुटबॉल मैदान, सेंट जोसेफ चर्च, अफगाण चर्चही याच भागात आहे. ब्रिटिश साम्राज्याच्या काळात नेव्हीनगर परिसराला ‘डक्सबरी’ म्हणून ओळखले जात असे आणि तेथे हवाई पट्टी होती. पूर्वी हे असुरक्षित ठिकाण म्हणूनदेखील ओळखले जात असे. अफगाण चर्च हे इथले सर्वांत प्राचीन बांधकाम आहे. येथे आशिया खंडातील सर्वांत मोठे आरमारी मुख्यालय आहे. 

अफगाण चर्चअफगाण चर्च : सन १८३८च्या सिंध आणि अफगाणमधील युद्धात धारातीर्थी पडलेल्या ब्रिटिश जवानांच्या स्मरणार्थ सन १८५७मध्ये हे चर्च बांधले गेले असून, त्या चर्चला सेंट जॉन्स चर्च म्हणूनही ओळखले जाते. सेंट जॉन दी इव्हॅजिएललिस्टचे बांधकाम १८४७पासून सुरू झाले. १८५८मध्ये ते पूर्ण झाले. हे सुंदर चर्च आजही चांगल्या अवस्थेत आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा भागात नेव्हीनगरमध्ये हे चर्च आहे. इंग्रजी आर्किटेक्ट जॉन मॅकडॉफ डेरिक यांनी चर्चचा आराखडा सादर केला होता; पण खर्चिक असल्याच्या कारणावरून तो नाकारण्यात आला. १८४७मध्ये शहर अभियंता हेनरी कोनबीयर यांनी सादर केलेला गॉथिक शैलीतील आराखडा मंजूर करण्यात आला. गव्हर्नर सर जॉर्ज रसेल क्लार्क यांनी चार डिसेंबर १८४७ रोजी चर्चची पायाभरणी केली. कोनबीयर नगर अभियंता, आर्किटेक्ट विल्यम बटरफिल्ड, तसेच कॅप्टन सी. डब्ल्यू. ट्रेमेनहेअर यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या साह्याने अफगाण वॉर मेमोरियल मोझाइक, पॉलिक्रोम फ्लोर टाइल, चर्चमधील गायन स्टॉल्स, स्क्रीनदेखील बटरफिल्डच्या डिझाइनमध्ये तयार केले गेले. सर कोवासजी जहांगीर यांनी इमारत पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी ७५०० रुपयांची देणगी दिली होती. 

कुलाबा : हा दक्षिण मुंबईतील एक भाग आहे. पोर्तुगीज या भागास कांदिल म्हणत; मात्र ब्रिटिशांनी याला कोलियो असे नाव दिले. कुलाबा हा शब्द कोळीभाषेतील कोळभात यावरून आलेला आहे. कोळी पोर्तुगीज येण्यापूर्वीपासूनच येथे राहत असलेले मुंबईचे मूळ निवासी आहेत. आताचा कुलाबा पूर्वी दोन विभागांत होता. मुंबईच्या सात बेटांपैकी हे एक बेट असून, तो म्हणजे कुलाबा आणि धाकटा कुलाबा. १८७२मध्ये कुलाब्याला स्वतंत्र नगरपालिका होती. 

पोर्तुगीजांनी धाकट्या कुलाब्यावर तो भाग ब्रिटिशांच्या ताब्यात देण्यापूर्वी राज्य केले. गोव्यातील पोर्तुगीज सरकारने तेथील सर्व घरे मुंबईतील पाद्रोआडो पार्टीचे प्रमुख बिशप ऑफ दमाओ यांना भाडेतत्त्वावर राहण्यासाठी दिली होती. १७९६पर्यंत कुलाबा एक लष्करी छावणी बनले होते. कुलाबा माशांच्या विविधतेसाठी प्रसिद्ध होते. बॅडेमी रेस्टॉरंट आणि बगदादी रेस्टॉरंट, तसेच अनेक आधुनिक पब, रेस्टॉरंट्स आणि क्लब हे सगळे आज कुलाब्याच्या कॉस्मोपोलिटन वातावारणाचा भाग आहे. 

कुलाबा वेधशाळा : अपर कुलाबा भागात हवामान वेधशाळा १८२६मध्ये स्थापन झाली. आता ती आधुनिक रडार यंत्रणेसह सुसज्ज आहे. कुलाबा कॉजवे १८३८मध्ये पूर्ण झाल्यावर उर्वरित दोन बेटे इतरांना जोडण्यात आली. फोर्टमधील कॉटनग्रीन येथे कापूस एक्स्चेंज १८४४ येथे आणले व हळूहळू कुलाबा हे व्यावसायिक केंद्र बनले. परिसरातील जागांच्या किंमती वाढू लागल्या. पुढे कॉटन एक्चें  ज शिवडी-माझगाव भागात हलविण्यात आले. कुलाबा कॉजवे १८६१ आणि १८६३ मध्ये विस्तृत करण्यात आले. स्टर्न्स आणि कीटरेड यांनी १८७३मध्ये अश्वचलित ट्राम सुरू केल्या. 

ससून डॉकयार्ड

ससून डॉकयार्ड :
ससून डॉक्स हे मुंबईतील कफ परेड भागातील आझादनगर येथील सर्वांत जुने डॉकयार्ड आहे. ज्यू समाजाचे अल्बर्ट अब्दुल्ला डेव्हिड ससून यांच्या मालकीची ही कंपनी (डेव्हिड ससून अँड कंपनी) होती. अल्बर्ट अब्दुल्ला डेव्हिड हे इराकमधून स्थलांतरित झालेल्या ज्यू समाजातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा मुंबईच्या सुरुवातीच्या औद्योगिक जडणघडणीत मोलाचा वाटा राहिला आहे.

ससून डॉकयार्ड प्रवेशद्वार

ससून डॉक्समध्ये प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठी असलेले जुने प्रवेशद्वार आजही आहे. त्यावर मध्यभागी टॉवर असून, व्हिक्टोरियन घड्याळ होते. या टॉवरची दुरुस्ती करून नूतनीकरण करण्यात येणार आहे. मुंबईत रेशीम व सुती वस्तूंचे उत्पादन ससून कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात सुरू करून कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला. 

ससून डॉकयार्ड

ही गोदी १८७५ मध्ये बांधण्यात आली. ही गोदी कोणालाही बघता येते. येथून मुख्यत्वे मत्स्यव्यापार चालतो. प्रोंग हे दीपगृह १८७५मध्ये या बेटाच्या अगदी दक्षिण टोकाकडे बांधण्यात आले. 

मुकेश मिल

मुकेश मिल :
१५० वर्षांपूर्वी ससून डॉकयार्डजवळ ११ एकरांच्या परिसरात ही मिल सुरू झाली होती. काळाच्या ओघात ती बंद पडली. भेसूर दिसणाऱ्या मिलच्या इमारतीत चित्रपटांचे शूटिंग चालू असते. सुरुवातीला या जागेमध्ये हॉरर चित्रपटांचे शूटिंग चालत असे. येथे भुताटकी असल्याची अफवा आहे. आता मात्र ही इमारत धोकादायक झाली आहे. मुकेश मिल आणि व्यवस्थापनाला मिलचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिलेले आहेत. तोपर्यंत मिलमध्ये कोणत्याही प्रकारचे समारंभ किंवा चित्रीकरण करण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश पालिकेने दिले आहेत. 

नरिमन हाउसची हल्ल्यानंतरची स्थितीबधवार पार्क : पूर्वीचे कुलाबा टर्मिनस येथे होते. कुलाबा स्टेशन प्रवासी वाहतुकीसाठी १८६३मध्ये सुरू झाले. चर्चगेटपासून आता जिथे इरॉस थिएटर आहे, तिथून हा मार्ग जायचा; मात्र १९३०मध्ये बॅकबे रेक्लमेशन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी कुलाबा स्टेशन बंद करण्यात आले. कुलाबा वुड गार्डन, सागर उद्यान ही उद्यानेही या भागात आहेत. 

नरिमन हाउस (छाबड) : या यहुदी (ज्यू) प्रार्थनास्थळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २८ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला चढविला व तेथे राहत असलेल्या धर्मगुरूची पत्नीसह हत्या झाली. त्या वेळी मोशे हा अवघा दोन वर्षांचा मुलगा आणि त्याची दाई सँड्रा सॅम्युअल तेवढे वाचले. या इमारतीमध्ये असलेल्या अतिरेक्यांचा खातमा करताना हेलिकॉप्टरचा केलेला वापर व त्या वेळी झालेला गोळीबार हे भयानक दृश्य त्या वेळी टीव्हीवरून सर्वांनी पाहिले आहे. नरिमन हाउसमधील एका मजल्यावर गोळीबार, तसेच बाँबस्फोटाच्या खुणा मुद्दाम जपून ठेवण्यात आल्या आहेत. 

कुलाबा मार्केट व शहीद भगतसिंग रोड यांच्यामधील एका गल्लीत हे प्रार्थनास्थळ आहे. ज्यू लोक अतिरेक्यांच्या निशाण्यावर असल्याने कुलाब्याच्या अंतर्भागात येऊन त्यांनी याची टेहळणी केल्याचे दिसून येते. त्याच बरोबर लिओपोल्ड कॅफे, ओबेराय ट्रायडेंट या कुलाब्यातील हॉटेल्सवरही अतिरेक्यांनी हल्ला केला होता. 

एअर इंडिया इमारत (डावीकडे)

नरिमन पॉइंट : मंत्रालयाच्या समोरील कामा रोडच्या दक्षिणेला बॅकबेपर्यंत असलेल्या भागाला नरिमन पॉइंट म्हणून ओळखले जाते. या भागात शासकीय कार्यालये, विधान भवन, अनेक देशांच्या वकिलाती, तसेच व्यापारी वकिलातीपण आहेत. एअर इंडियाची १०५ मीटर उंचीची २४ मजली इमारतही कामा रोडवरच आहे. तसेच महाराष्ट्र शासनाची १९ मजली प्रशासकीय इमारतही याच रस्त्यावर आहे. काही मंत्र्यांची निवासस्थाने, भारतातील अनेक बँकांची मुख्यालये, ओबेराय ट्रायडेंट हे हॉटेल याच भागात आहे.

वर्ल्ड ट्रेंड सेंटर : दोन संकुले असलेली ही ३५ मजली ५११ फूट उंच इमारत १९७०मध्ये बांधण्यात आली आहे. 

एक्स्प्रेस टॉवर्सवरून दिसणारे दृश्य

एक्स्प्रेस टॉवर्स :
नरिमन पॉइंटमध्ये समुद्राच्या बाजूला ही २५ मजली इमारत आहे. तिची उंची ३४४ फूट आहे. इंडियन एक्स्प्रेस लिमिटेडच्या मालकीच्या या इमारतीत संस्थेचे कॉर्पोरेट मुख्यालय आहे. या वास्तूची रचना जोसेफ अलेन स्टेन या अमेरिकन आर्किटेक्टने केली होती. ते भारतात स्थायिक झाले होते. त्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला होता. या इमारतीमध्ये गोएंका यांच्या एक्सप्रेस समूहासह अनेक कंपन्यांची कॉर्पोरेट कार्यालये आहेत. 

ट्रायडेंटवीर नरिमन : ते १९३५मध्ये मुंबईचे महापौर होते. १९२८मध्ये उजेडात आलेल्या ‘बॅकबे रेक्लमेशन’ घोटाळ्यामध्ये सामील झालेल्या जॉर्ज बुचन या ब्रिटिश अभियंत्याविरुद्ध त्यांनी आवाज उठविला व ते सर्वज्ञात झाले. त्यांनी गांधीजींच्या असहकार आंदोलनात व मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला होता. काँग्रेसबरोबर मतभेद झाल्याने ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि सुभाषबाबूंच्या फॉरवर्ड ब्लॉकमध्ये सहभागी झाले. त्यांच्या समरणार्थ या भागाला नरिमन पॉइंट हे नाव देण्यात आले. 

कसे जाल कुलाबा भागात?
कुलाबा भाग हा मुंबईच्या दक्षिण टोकावर आहे. चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून कुलाब्यात जाण्यासाठी बस व टॅक्सी सेवा उपलब्ध आहे. 
 
- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(मुंबईतील पुरातन वारसा वास्तूंबद्दल माहिती देणारे, आर्किटेक्ट चंद्रशेखर बुरांडे यांनी लिहिलेले  लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
mahesh balkrishna patil About 22 Days ago
aapan dileli mahiti atishay uttam aahe. mi gelya 50 years pasun mumbai madhye rahat asun , aani vt la job karat asun dekhil mala barech goshti mahit navhatya. thanks . thank you very much . aapla whats app cha group asel tar please mala add kara sir. mahesh b patil , working in mumbai police , 9870527955
0
0
रमेश अत्रे About 23 Days ago
सुरेख माहितीपूर्ण लेख!
0
0

Select Language
Share Link
 
Search