Next
किशोरकुमार
BOI
Saturday, August 04, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

हिंदी चित्रपटसृष्टीचा प्रचंड लोकप्रिय गायक आणि अभिनेता किशोरकुमार याचा चार ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...
.......
चार ऑगस्ट १९२९ रोजी खांडवा येथे (मध्य प्रदेश) जन्मलेला आभासकुमार गांगुली हा किशोरकुमार या नावाने प्रचंड लोकप्रिय असणारा गायक आणि अभिनेता. त्याने झुमरू, दूर गगन की छाव में, दूर का राही आणि बढती का नाम दाढी यांसारख्या स्वतःच्या सिनेमांना संगीतसुद्धा स्वतःच दिलं होतं. मोठा भाऊ अशोककुमार यांच्यामुळे त्याला मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सहजी प्रवेश मिळून गेला आणि त्याने त्या संधीचं सोनं केलं. त्याला पार्श्वगायनातच करिअर करायचं होतं, तरीही वडील भाऊ अशोककुमारच्या आग्रहास्तव त्याने चित्रपटातही कामं स्वीकारली आणि अतिशय सहजसुंदर आणि चतुरस्र अभिनयाचं दर्शन घडवलं. त्याने बिमल रॉय यांच्या ‘नौकरी’, तसंच हृषीकेश मुखर्जी यांच्या ‘मुसाफिर’ यांसारख्या सिनेमांतून आपल्या संवेदनशील अभिनयाची चुणूक दाखवून दिली. ‘दूर का राही’ आणि ‘दूर गगन की छाव में’ हे सिनेमेसुद्धा त्याच्यातल्या सशक्त अभिनयाला वाव देणारे होते. त्याच्या गमत्या स्वभावाला वाव मिळाला तो चलती का नाम गाडी, हाफ टिकट, झुमरू, दिल्ली का ठग, नयी दिल्ली, पडोसन आणि प्यार किये जा यांसारख्या विनोदी ढंगाच्या सिनेमांतून आणि त्याने बहार उडवून दिली. ५० आणि ६०च्या दशकात त्याला स्वतःच्या सिनेमांत स्वतःकरिता आणि सचिनदांमुळे देव आनंदसाठी काही सिनेमांतून पार्श्वगायनाची संधी मिळत गेली. मोहम्मद रफी, मुकेश, हेमंतकुमार, मन्ना डे यांसारख्या मातब्बर गायकांच्या तुलनेतही त्याची गाणी गाजली होती; पण त्याला तुफान लोकप्रियता मिळाली ती राजेश खन्नाच्या ‘आराधना’मुळे.... रफीसाबच्या आवाजात दोन ड्युएट्स रेकॉर्ड करून आजारी पडलेल्या सचिनदांऐवजी, संगीताची जबाबदारी सांभाळणाऱ्या राहुलदेव बर्मन यांनी पुढची सुपरहिट तीन गाणी त्याच्या आवाजात रेकॉर्ड केल्यावर! ती सर्वच गाणी आणि सिनेमा प्रचंड गाजला आणि तो सुपरस्टार राजेश खन्नाचा हुकुमी आवाज बनला... आणि अर्थातच फिल्म इंडस्ट्रीचा लाडका गायक. मग मात्र ७० आणि ८० अशी दोन दशकं त्याने खिशात टाकली. त्या काळातल्या सर्वच हिरोंसाठी तो गात होता. ६०च्या संपूर्ण दशकात पडद्यावर रफीच्या आवाजात गाणारे शशी कपूर, धर्मेंद्र, जितेंद्र यांसारख्यांसाठीही संगीतकार आवर्जून त्याच्या आवाजाचा वापर करू लागले आणि तो सर्वांत बिझी पार्श्वगायक बनला. त्याला १९७१ ते १९८६ या कालावधीत १९ वेळा फिल्मफेअरचं नामांकन मिळालं होतं. आठ वेळा तो फिल्मफेअर पुरस्काराचा मानकरी ठरला. छोटासा घर होगा, मुन्ना बडा प्यारा, आ चल के तुझे, ये दर्दभरा अफसाना, अगर सुन ले तो इक नगमा, मेरे मेहबूब कयामत होगी, खूबसूरत हसीना, नखरेवाली, एक लडकी भीगी भागी सी, हाल कैसा है जनाब का (त्याने स्वतः पडद्यावर साकार केलेली गाणी); ख्वाब हो तुम या कोई हकीकत, जीवन के सफर में राही, हम है राही प्यार के, ये दिल न होता बेचारा, गाता रहे मेरा दिल, अरे यार मेरी, फूलों के रंग से, चूडी नही ये मेरा, जीवन की बगिया, ए मैने कसम ली, दिल आज शायर है, किसका रस्ता देखे, बहोत दूर चले जाना है (देव आनंदसाठी म्हटलेली); कोरा कागज था, मेरे सपनों की, रूप तेरा मस्ताना, ये श्याम, प्यार दीवाना होता है, दीवाना लेके आया है, ओ मेरे दिल के चैन, एक अजनबी, भीगी भीगी रातों में, मेरे दिल में आज क्या है, खिज के फूल पे आती, जीवन से भरी, जिंदगी के सफर में, दिए जलते है, ये लाल रंग, मैं शायर बदनाम, कुछ तो लोग कहेंगे, ये जो मोहब्बत है (राजेश खन्नासाठी म्हटलेली), तेरे बगैर जाने जाना, कैसे कहे हम, आज मदहोश हुआ, ओ मेरी शर्मिली, वादा करो नही छोडोगी, तेरा मुझ से है पहले का नाता, घुंगरू की तरह (शशी कपूरसाठी म्हटलेली), मुसाफिर हूँ यारों, मैं जहाँ चला जाऊँ, दिल की बाते, हाल क्या है दिलों का, ओ माझी रे (जितेंद्रसाठी म्हटलेली), पल पल दिल के पास, हम बेवफा, मैने देखा एक सपना (धर्मेंद्रसाठी म्हटलेली) आणि याखेरीज कालानुरूप त्याने अमिताभ, ऋषी कपूरपासून अनेक स्टार लोकांसाठी गायलेली गाणी अमाप लोकप्रिय ठरली आहेत. १३ ऑक्टोबर १९८७ रोजी त्याचं मुंबईत निधन झालं. 

यांचाही आज जन्मदिन :
गेल्या शतकात मराठीमध्ये धीटपणे प्रणयकथा लिहिणारे ना. सी. फडके (जन्म : चार ऑगस्ट १८९४, मृत्यू : २२ ऑक्टोबर १९७८) 
अभिनयकौशल्याबरोबरच धमाल लेखणीची जादू दाखवणारे दिलीप प्रभावळकर (जन्म : चार ऑगस्ट १९४९)
लहान मुलांची मानसिकता ओळखून त्यांच्या सृजनाला आपल्या लिखाणातून चालना देणारे राजीव तांबे
कोकणी कादंबरीकार महाबळेश्वर सैल (जन्म : चार ऑगस्ट १९४३)
आपल्या कवितांनी अख्ख्या जगाला भुरळ पाडणारा पर्सी शेली (जन्म : चार ऑगस्ट १७९२, मृत्यू : आठ जुलै १८२२) 
(या सर्वांविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search