Next
मोठा पल्ला गाठण्यासाठी शिवछत्रपती पुरस्काराने प्रेरणा
रत्नागिरीच्या खेळाडू मैत्रेयी गोगटे आणि ऐश्वर्या सावंत यांची भावना
कोमल कुळकर्णी-कळंबटे
Sunday, February 17, 2019 | 05:00 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी : ‘शिवछत्रपती पुरस्कारामुळे पुढील वाटचालीसाठी मोठी प्रेरणा मिळाली आहे; मात्र अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, याची आम्हाला जाणीव आहे. केवळ पुरस्कार मिळवणे एवढेच ध्येय नसून, सातत्याने सराव करून खेळत राहणे, नवीन खेळाडूंना प्रोत्साहित करणे आणि खेळाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणे हेच आमचे उद्दिष्ट आहे,’ अशी भावना मैत्रैयी गोगटे आणि ऐश्वर्या सावंत या रत्नागिरीच्या खेळाडूंनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या शिवछत्रपती या क्रीडा क्षेत्रातील मानाच्या पुरस्कारासाठी त्यांची यंदा निवड झाली असून, मुंबईत आज (१७ फेब्रुवारी) झालेल्या सोहळ्यात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी पुरस्कार स्वीकारला.

पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या पूर्वसंध्येला ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने कॅरमपटू मैत्रेयी राजन गोगटे आणि खो-खोपटू ऐश्वर्या यशवंत सावंत यांच्याशी संवाद साधला. त्यातून त्यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडला. मैत्रेयी आणि ऐश्वर्या यांचे शालेय शिक्षण रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेत, तर महाविद्यालयीन शिक्षण अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात झाले आहे. त्यानंतर चार्टर्ड अकाउंटंटचा (सीए) होण्यासाठी करण्यासाठी मैत्रेयीने थेट मुंबई विद्यापीठातून बी. कॉम. पूर्ण केले, तर ऐश्वर्या सध्या रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कला शाखेच्या तृतीय वर्षात शिकत आहे.

सहावीपासूनच कॅरमची ‘क्वीन’ - मैत्रेयी
मैत्रेयीने सहावीत असताना शालेय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पहिल्यांदा स्ट्राइकर हातात पकडला. ती स्पर्धा मैत्रेयी जिंकली आणि तेव्हापासूनच ती कॅरम बोर्डवर ‘क्वीन’प्रमाणे अधिराज्य गाजवत गेली. या स्पर्धेला कॅरमचे प्रशिक्षक अजित सावंत उपस्थित होते. मैत्रेयीचा खेळ पाहिल्यानंतर तिने राज्य असोसिएशनच्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला हवे, असे सावंत यांनी तिचे वडील राजन गोगटे यांना सुचविले. त्यानंतर शाळेतील शिक्षक विनोद मयेकर आणि अजित सावंत यांनी तिच्यावर विशेष लक्ष केंद्रित केले. तिथपासून आजपर्यंत मैत्रेयीने गेली बारा वर्षे सातत्याने या खेळात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आतापर्यंत ती जवळपास ८० विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाली आहे. सुरुवातीला ती सब ज्युनियर गटातून खेळत होती; मात्र आता खुल्या गटातून खेळते. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. नागपूरला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकावला असून, रायपूर, छत्तीसगड या ठिकाणी झालेल्या ५७व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये वैयक्तिक व सांघिक गटात तिने सुवर्णपदकही मिळवले आहे.

आपल्या प्रवासाबद्दल मैत्रेयी म्हणाली, ‘माझी उंची चांगली असल्यामुळे मी मैदानी खेळ खेळावेत, असे मला शाळेतील क्रीडा शिक्षकांनी सुचविले होते; मात्र त्यापेक्षा मी ‘इनडोअर गेम्स’ना प्राधान्य द्यावे, असा सल्ला माझ्या वडिलांनी मला दिला. दरम्यानच्या काळात मी शाळेतून कॅरमच्या स्पर्धांमध्ये सहभागी होत होते. म्हणून याच खेळात पुढे जायचे ठरवले. रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनने पहिले प्रशिक्षण शिबिर भरविले होते. त्यात महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सध्याचे सचिव अरुण केदार यांना बोलावण्यात आले होते. या शिबिरानंतर अजित सावंत, विनय गांगण, आमच्या शेजारी राहणारे श्री. दळी, श्री. हवाल हे कायम माझ्याबरोबर प्रॅक्टिससाठी येत असत. पुढे विक्रम खेर यांच्या मदतीने मुंबईतील श्री. प्रभुघाटे यांच्याशी ओळख झाली आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली. अजूनही त्यांच्याकडेच प्रशिक्षण सुरू आहे.’

‘कुठलीही गोष्ट करताना थोड्याफार प्रमाणात अडचणी येतात; पण आई-वडील आणि बहीण शर्वरी यांच्या पाठिंब्यामुळे सगळ्या प्रसंगांवर मात केली,’ असे मैत्रेयीने सांगितले. ती म्हणाली, ‘शिर्के प्रशालेतील प्रत्येक शिक्षकाने म्हणजे अगदी आमचे विषयशिक्षक नसले, तरीही त्यांनीसुद्धा त्यांच्या परीने मला मदत केली आहे. शाळेच्या असाइनमेंट्स, प्रोजेक्ट किंवा काही वेळा परीक्षा या सगळ्या गोष्टी स्पर्धांच्या तारखांमध्ये असल्या, तरी सर्वच शिक्षकांच्या विशेष सहकार्याने शाळा आणि स्पर्धा या दोन्हींमध्ये समतोल साधता आला. त्याचप्रमाणे रत्नागिरीतील उज्ज्वला क्लासेसमध्ये ‘चार्टर्ड अकाउंटंट इंटरमीडिएट्स’चे वर्ग सुरू असताना तेथील प्राध्यापकांनी माझी स्पर्धाकाळात चुकलेली लेक्चर्स वैयक्तिक माझ्यासाठी परत घेऊन मोलाचे सहकार्य केले आहे.’

‘रत्नागिरीतील कॅरममधील आंतरराष्ट्रीय खेळाडू रियाज अकबर हे माझे आदर्श असून, त्यांच्याकडून संयम आणि खेळातील वर्तन या दोन गोष्टी आत्मसात करण्यासारख्या आहेत. अनेक प्रसंगांमध्ये ‘खेळ की शिक्षण’ असे निवडण्याची वेळ आली. परंतु कायमच खेळाकडे जास्त कल झुकला आणि म्हणून शिक्षणाबरोबर खेळही चालू ठेवला. कॅरमवर अधिक प्रभुत्व मिळवून कायम चांगले खेळत राहण्याचे ध्येय आहे,’ असे मैत्रेयीने नमूद केले.

हलाखीच्या परिस्थितीवर ‘ऐश्वर्य’पूर्ण खेळाने मात
वडिलांसमवेत ऐश्वर्याखो-खो खेळातील जानकी हा सर्वोच्च पुरस्कार मिळविलेली खेळाडू ऐश्वर्या हिने आपल्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून स्वतःला आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध केले आहे. लहान वयात आईचे छत्र हरपलेली ही मुलगी घरातील कामे आवरून शाळा, अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधून इथवर पोहोचली आहे. तिने आतापर्यंत ११ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या खो-खो संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. राज्य महिला संघाला अनेकदा सुवर्णपदक मिळवून देण्यात तिचा सिंहाचा वाटा आहे. गेल्याच वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन तिने देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

मुळातच खेळात चपळ असलेल्या ऐश्वर्याला योग्य वेळी प्रशिक्षक पंकज चवंडे, विनोद मयेकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे सचिव संदीप तावडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि कोकणाच्या लाल मातीतील हे रत्न आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले.

ऐश्वर्या म्हणाली, ‘आमच्या शाळेत विविध खेळांमधील उत्कृष्ट खेळाडूंना मानाचे स्थान मिळत होते. त्यांच्याबद्दल माझ्याही मनात आदराचे स्थान होते. त्यामुळे मी खेळाकडे आकर्षित झाले. क्रीडाशिक्षक विनोद मयेकर आणि शिर्के प्रशाला यांचा माझ्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा आहे. आई गेल्यानंतर घरच्या कामाची जबाबदारी माझ्यावर आली. मी रोज घरातील सर्व कामे आवरून शाळेत जात असे. शाळेत असताना शिक्षक माझ्याकडून नियमितपणे खो-खोचा सराव करून घेत. त्यानंतर सायंकाळी घरातील कामे आणि रात्री अभ्यास असा एकूण दिनक्रम असायचा; मात्र तरीही अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधण्याचे कष्ट मी घेतले आणि त्याचे फळ मला आता मिळत आहे,’

‘जिल्हा पातळीवरील स्पर्धेत आमचा संघ जिंकला, तेव्हा मी ठरविले, की आता मागे फिरून पाहायचे नाही. त्यानंतर विभागीय पातळी, राष्ट्रीय पातळी आणि आता आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंतचा माझा प्रवास मेहनतीचा होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर आल्यावर सरावाला जास्त वेळ द्यावा लागला. मला असे वाटते, की प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर प्रो खो-खो लीग स्थापन झाल्यास खेळाडूंचा आर्थिक स्तर उंचावेल आणि भविष्यामध्ये खो-खोला चांगले दिवस येतील. मी ‘खो-खो’मध्ये करिअर करण्यास उत्सुक आहे; पण तशी व्यावहारिक स्थिती उंचावणेही आवश्यक आहे आणि यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करीन,’ असा विश्वास तिने व्यक्त केला.  
‘खेळाडूंनी जिद्द व चिकाटी न सोडता खेळातील बारकावे समजून घेतले पाहिजेत. तंत्रशुद्ध खेळाला प्राधान्य देऊन नियमित सराव महत्त्वाचा आहे. खेळाडू घडण्यासाठी पालकांचेही प्रोत्साहन गरजेचे असून, त्यामुळेच भविष्यात खो-खोला चांगले दिवस येतील,’ असे ऐश्वर्याला वाटते.

साहित्य, संस्कृती, शिक्षण, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अग्रेसर असणाऱ्या दोन रत्नकन्यांनी एकाच वेळी शिवछत्रपती पुरस्कार मिळवल्यामुळे रत्नागिरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेल्याची प्रतिक्रिया रत्नागिरीकरांकडून व्यक्त होत आहे.

(राज्याच्या क्रीडा पुरस्कारांच्या यंदाच्या सर्व मानकऱ्यांची यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(सोबत व्हिडिओ देत आहोत)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Mandar About 91 Days ago
Mast
0
0

Select Language
Share Link
 
Search