Next
‘वाघिणी’ सांगताहेत वाघोबाच्या साम्राज्याची गोष्ट!
राज्यातील व्याघ्र प्रकल्पातील स्थानिक युवतींनी स्वीकारले ‘हटके’ काम
BOI
Friday, May 31, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


मुंबई : आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करणाऱ्या महिला दिसतात; तरीही पर्यटक मार्गदर्शक (गाइड) क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी आहे. राज्यातील व्याघ्र प्रकल्पातील स्थानिक युवतींनी हे चित्र बदलण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी व्याघ्र प्रकल्पात ‘गाइड’ म्हणून काम स्वीकारले आहे. ४७ महिला गाइड राज्यातील व्याघ्र प्रकल्पांत कार्यरत आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.  

पर्यटक वन पर्यटनाला जातात, गड-किल्ल्यांना भेटी देतात, सागराच्या लाटांवर स्वार होतात. या सगळ्या स्थळांची माहिती जाणून घेणे, त्यांचा इतिहास समजून घेणेही त्यांना आवडते. अशा वेळी त्यांच्या मदतीला येतात ते पर्यटक मार्गदर्शक म्हणजेच गाइड! पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात महिलांनी कधीच शिरकाव केला असला, तरी घनदाट जंगलात पर्यटकांना घेऊन जाणे, त्यांची सुरक्षितता जपताना त्यांना त्या वनाची, तिथल्या जैव विविधतेची संपूर्ण आणि अचूक माहिती देणे हे ‘हटके’ काम व्याघ्र प्रकल्पातील युवतींनी स्वीकारले आहे. या वेगळ्या वाटेवरून जाताना त्यांनी स्वावलंबनाचा मार्ग तर चोखाळला आहेच; परंतु निसर्गरक्षणाच्या कामात योगदानही दिले आहे.

राज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा, सह्याद्री आणि ताडोबा-अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. यापैकी ताडोबा-अंधारी, मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसोबत जंगल भ्रमंती करताना या महिला गाइड तिथे अधिवास करणाऱ्या वाघोबाच्या साम्राज्याची गोष्ट सांगत आहेत. तसेच पर्यटकांना तिथल्या जैवविविधतेचे दर्शन घडवत आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ३०, पेंच व्याघ्र प्रकल्पात १२ आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पाच महिला गाइड कार्यरत आहेत.

 
महिला सक्षमीकरणास हातभार
व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात, तसेच वनालगतच्या गावांमध्ये स्थानिक महिलांना विविध व्यवसाय व उद्योगाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण केले जात आहे. त्याचाच हा एक भाग आहे. अचूक आणि परिपूर्ण माहितीने समृद्ध असलेला गाइड येणाऱ्या पर्यटकांना जंगलभ्रमंतीचा उत्तम आनंद देऊ शकतो, हे विचारात घेऊन या वन पर्यटक मार्गदर्शकांना प्रशिक्षण दिले गेले आहे.

पर्यटनाला आलेल्या पर्यटकांशी सौजन्याने बोलणे, त्यांना जंगलभ्रमंतीचे नियम समजावून सांगणे, जंगलात गेल्यानंतर कसे वागायचे हे शिकवणे, व्याघ्र प्रकल्पाची माहिती देताना वाघांबरोबरच इतर वन्यजीव आणि वृक्षसंपदेने संपन्न असलेल्या वनाची ओळख करून देणे, वन्यजीवांची माहिती देणे, त्या जंगलातील पशु-पक्षी आणि प्राण्यांचा असलेला वावर सांगणे यांसारख्या अनेक गोष्टींमधून पर्यटकाला पर्यटनाचा पुरेपूर आणि भरपूर आनंद मिळेल या दृष्टीने या महिला पर्यटन मार्गदर्शकांना तयार करण्यात आले आहे. दिल्या जाणाऱ्या माहितीमध्ये एकवाक्यता आणि एकसूत्रता राहील याचीही काळजी घेतली गेली आहे.

प्रशिक्षण, रोजगारसंधी आणि उत्पन्नवृद्धी
प्रशिक्षण, रोजगार आणि उत्पन्न ही स्थानिकांच्या विकासाची त्रिसूत्री असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीत सांगितले. पक्ष्यांचे संगीत आणि वाघाच्या डरकाळ्यांनी व्याघ्र प्रकल्पातील डोंगररांगा जिवंत होतात, असे म्हटले जाते. याच डोंगररांगांमध्ये वसलेल्या, व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात, वनालगतच्या गावांत राहणाऱ्या स्थानिक लोकांनी ही वने जिवंत ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. या लोकांना रोजगाराच्या पर्यायी संधी उपलब्ध करून देणे, त्या दृष्टीने आवश्यक असलेले प्रशिक्षण देणे, गावांमध्ये अत्यावश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांचे वनांवरचे अवलंबित्व कमी करणे यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले.

सुधीर मुनगंटीवार‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतून या कामाला गती देण्यात आली आहे. पर्यटक मार्गदर्शक, महिलांसाठी शिलाई मशिन युनिट, दुभत्या पशुधनाचे वाटप,  होम स्टे, वाहनचालक, ऑटोमोबाइल प्रशिक्षण अशा विविध माध्यमांमधून स्थानिकांचे सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी ‘आयटीसी’सारख्या अनेक संस्थांची मदत घेतली असून, महिला वन पर्यटक मार्गदर्शक हा त्यातीलच एक नावीन्यपूर्ण उपक्रम आहे,’ अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

एक सेल्फी तर हवाच..!
या महिला पर्यटक मार्गदर्शकांना हे काम आवडत असून, त्यांनी याबद्दलच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात घेऊन जाताना सुरुवातीला आम्ही एकमेकांसाठी नवे असलो, तरी एका प्रवासात आमची त्या कुटुंबासोबत मैत्री होत जाते. आम्ही त्यांच्यातलेच एक होऊन जातो. वाघ पाहिल्यानंतर पर्यटकांना होणारा आनंद विलक्षण असतो, याची अनुभूती होते. अन्य वन्यजीवांना पाहूनही पर्यटक हरखून जातात. पर्यटकांचा रानवाटांवरचा हा प्रवास अधिकाधिक सुखद आणि सुरक्षित होईल याची आम्ही काळजी घेतो. हे पर्यटक जेव्हा परतीच्या प्रवासाला निघतात, तेव्हा ज्या गाइडमुळे त्यांची व्याघ्र प्रकल्पातील सहल अविस्मरणीय झाली, त्यांच्याबरोबर एक सेल्फी तर हवाच, ही त्यांची मागणी आम्हालाही आनंद देऊन जाते,’ अशी भावना पी. ए. बोरजे या महिला पर्यटक मार्गदर्शकाने व्यक्त केली.
.......
पर्यटनाविषयी अधिक माहितीसाठी खालील शीर्षकांवर जरूर क्लिक करा...

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Amit About 109 Days ago
Women empowerment ...Nice initiative. Thanks for the news
0
0

Select Language
Share Link
 
Search