Next
स्थलांतरित शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम
‘टिळक’ विद्यापीठातील समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम
दत्तात्रय पाटील
Tuesday, February 05, 2019 | 03:58 PM
15 0 0
Share this story



ठाणे : ग्रामीण भागात रोजगाराच्या कारणास्तव स्थलांतरीत होणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थी शाळाबाह्य होण्याचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण कमी होऊन अशा विद्यार्थ्यांना हक्काचे शिक्षण मिळण्यासाठी आणि या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या खारघर येथील समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिसरातील वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांनी भिवंडी तालुक्यातील (जि. ठाणे) करंजोटी व मोहंडुळ गावालगत असलेल्या वीटभट्टी कामगारांच्या मुलांच्या शिक्षण हक्कासंदर्भात नुकताच एक कार्यक्रम आयोजित केला होता.

विद्यापीठाच्या प्रा. स्मिता वरघडे यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ विद्यार्थ्यांनी जानेवारी महिन्यात परिसरातील विटभट्ट्यांचे सर्वेक्षण करून शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती मिळवली. त्यानंतर तालुक्याचा शिक्षण विभाग, एकात्मिक बालविकास विभाग व तहसील विभागास सादर करून संबंधित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासंदर्भात चर्चा केली.



दहा दिवसांच्या उपक्रमात वीटभट्टीवरील मुलांसाठी शिक्षणाप्रती विविध उपक्रम राबविण्यात आले; तसेच याचबरोबर पालकांचे व बालकांचे समुपदेशन करण्यात आले. समाजकार्य विद्यार्थ्यांद्वारे संबंधित वीटभट्टीमधील एकूण १५ मुलांचा करंजोटी व दिनकर पाडा जिल्हा परिषद शाळेत प्रत्यक्ष प्रवेश मिळवून देण्यात आला. उपक्रमाच्या शेवटच्या दिवशी वीटभट्टी परिसरातील बालक व पालकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. निसर्गाच्या सानिध्यात आयोजित या कार्यक्रमाला मान्यवर म्हणून विधायक सांसद संस्थेचे प्रतिनिधी ॲड. किसन चौरे, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते केशव पारधी, वडवली शिक्षण विभागाच्या केंद्रप्रमुख रूपाली पाटील यांसह परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका व वीटभट्टी मालक आदी उपस्थित होते.

प्रारंभी विद्यार्थी समाज कार्यकर्ते अविनाश विशे या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. विद्यार्थी समाज कार्यकर्ती सीमा ठाकरे यांनी उपस्थित पालकांना बालकांचे हक्क व शिक्षणाविषयी माहिती दिली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी समाज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.  वीटभट्टीवरील मुलांच्या शिक्षणासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन जबाबदारी घेण्याचे आवाहन अॅड. चौरे यांनी केले.

शेवटी सर्व बालकांना शिक्षण व आरोग्यासंदर्भातील विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी समाज कार्यकर्ते सागर खरात, अस्मिता साळुंके, रश्मी बाबर, शीतल कोरेगावे, यशोधरा पगारे, अमित रणखांबे, हितेश पाटील, सीमा ठाकरे, अविनाश विशे व वीटभट्टी मालक, शाळांचे शिक्षक व गावातील प्रतिनिधी यांनी विशेष योगदान दिले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link