Next
‘गोगटे-जोगळेकर’च्या निसर्ग मंडळातर्फे व्याख्यानाचे आयोजन
BOI
Tuesday, February 26, 2019 | 06:06 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या निसर्ग मंडळातर्फे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली २० फेब्रुवारी २०१९ रोजी गावखडी येथील सरस्वती विद्यामंदिरमध्ये ‘समुद्री कासवांची जीवनशैली व त्यांचे संवर्धन’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. विक्रांत बेर्डे उपस्थित होते. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. दाते यांनी विद्यार्थ्यांना त्यांचा परिचय करून दिला.

या प्रसंगी बोलताना बेर्डे म्हणाले, ‘हजारो वर्ष उत्क्रांत होत गेलेले कासव हे मानवी आवडीचा व कुतूहलाचा विषय आहे. भारतीय संस्कृतीत कासवाला अध्यात्मिकदृष्ट्या विशेष स्थान आहे. कासवाचा आकार व त्याची शरीर वैशिष्ट्ये यांचा कुशल उपयोग आपण पुराणकथांमध्ये पाहू शकतो. कासवाचा प्रतिकात्मक उपयोग आपल्याला साहित्य चित्रकला जातककथा यामध्ये कुशलतेने केलेला दिसतो. भारतात मंदिरांमध्ये देवतेपुढे असलेले कासव हे ही असेच महत्त्वाचे मानले जाते. कासवांचे जमिनीवरील कासव, गोड्या पाण्यातील कासव, समुद्री कासव असे प्रमुख प्रकार आहेत. कासवांच्या सात प्रमुख प्रजाती आजवर आढळल्या आहेत. यातील पाच प्रकारची कासवे भारतीय उपखंडात आढळून येतात. यापैकी चार जाती भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळून येतात. उदाहरणार्थ ऑलिव्ह रिडले कासव, हिरवे कासव, चोच कासव, चामडी पाठीचे कासव. प्रत्येक कासवाची विशिष्ट शारीरिक वैशिष्ट्ये असतात. त्याद्वारे आपण त्यांच्या प्रजातीची ओळख पटवून घेऊ शकतो.’

‘मधल्या काळात कासवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे व ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत उदाहरणार्थ तेल गळती सारखे अपघात, मासेमारी, मानवाकडून किनारी भागांचा होणारा विध्वंस, कासवांच्या पाठीचा दागिन्यांसाठी केला जाणारा वापर यांसारख्या मानवी कृती त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. सध्या जगाच्या विविध भागांमध्ये कासवांच्या अधिवासांचे संरक्षण व त्यासाठीचे प्रशिक्षण देण्याचे विविध कार्यक्रम राबविले जात आहेत,’ अशी माहिती बेर्डे यांनी दिली.

आपण कासव, तसेच त्यांच्या अधिवासाचे संवर्धन कसे करू शकतो व त्यामध्ये विद्यार्थी कसे सहभागी होऊ शकतात हे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. निसर्गाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात जागरूकता निर्माण व्हावी यासाठी आपल्या व्याख्यानादरम्यान त्यांनी विविध चित्रफितींचे सादरीकरण केले; तसेच विद्यार्थ्यांना निसर्गाची स्वच्छता राखणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि निसर्गाचे संवर्धन आणि संगोपन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

सहाय्यक शिक्षक गिरीश पाध्ये यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य विवेक भिडे व प्रा. अतिका राजवाडकर, प्रा. हर्षदा मयेकर, प्रा. मयुरेश देव, प्रशालेतील शिक्षक तसेच या निसर्ग मंडळाचे स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात २४ सप्टेंबर १९८३ रोजी निसर्ग मंडळाची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांचा अभ्यासेतर उपक्रमांमध्ये सहभाग वाढवणे व क्षेत्र अभ्यासातून त्यांना सक्षम बनविणे, विद्यार्थ्यांना वनस्पती व प्राण्यांच्या विविध प्रजातींची म्हणजेच जैवविविधतेची ओळख करून देणे, त्यांचे महत्त्व पटवून देणे व त्यांच्या संरक्षण व संवर्धन करण्याची गरज पटवून देणे असा या मंडळाचा उद्देश आहे. ‘कोकण किनाऱ्याला लाभलेल्या नैसर्गिक वारशाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात जागरूकता निर्माण करणे’ असे या मंडळाचे बोधवाक्य आहे. या मंडळाद्वारे महाविद्यालयात दर वर्षी प्रभात फेऱ्या, निसर्ग सहली, व्याख्याने, क्षेत्रभेटी, निसर्ग छायाचित्रणासाठीच्या कार्यशाळा, त्यासाठीचे प्रशिक्षण, विविध प्रकल्प, वृक्षारोपण तसेच स्वच्छता मोहीम आदी उपक्रम राबविले जातात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link