Next
‘जलयुक्त’मधील नाशिक विभागातील ९० टक्के कामे पूर्ण
BOI
Saturday, October 27, 2018 | 03:53 PM
15 0 0
Share this article:

नाशिक : महाराष्ट्रातील प्रत्येक गावात जलसमृद्धी नांदण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाशिक विभागात ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. प्रत्येक गावात पाणी अडविणे व जिरविणे याचे महत्त्व पटले असून, लोक स्वत:हून पुढाकार घेत आहेत. पाचवीला पुजलेल्या दुष्काळामुळे जनता होरपळत असताना दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी या योजनेतील लोकसहभाग म्हणजे समृद्ध महाराष्ट्राची नांदी ठरू पाहत आहे.

राज्याला वरदान ठरत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाशिक विभागातील नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर या पाचही जिल्ह्यांत ९० टक्क्यांहून जास्त कामे पूर्ण झाली आहेत. सन २०१७-१८ या चालू वर्षातील आराखड्यानुसार या योजनेअंतर्गत १९ हजार ६३२ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी १७ हजार ७७९ कामे पूर्ण झाली. उर्वरित एक हजार ६९३ कामे प्रगतिपथावर आहेत. ४९४.७९ कोटी रुपयांच्या आराखड्याच्या या कामांत आतापर्यंत १६२ कोटी ५५ लाख एवढा खर्च झाला आहे.

नाशिक विभागाचा विचार करता चालू वर्षात या योजनेअंतर्गत पाच जिल्ह्यांत शासकीय लोकसहभागातून ८४५ गावांची निवड करण्यात आली. १४ सप्टेंबर २०१८पर्यंत त्यातील ६६३ गावे जलयुक्त झाली असून, १८२ गावांत ८० टक्क्यांपेक्षा जास्त कामे झालेली आहेत. या अभियानातील जलसंधारणामुळे शेतकर्‍यांना दोन्ही हंगामात पीक घेणे शक्य होणार असून, यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे, असा दावा केला जात आहे. 

या योजनेसाठी चालू वर्षात शासनाच्या विशेष निधीतून नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण १४०.३६ कोटी निधी उपलब्ध झाला. त्यातून चार हजार १८७ कामे सुरू आहेत. पैकी तीन हजार ५१५ कामे पूर्ण झाली असून, या कामांवर ४७.७५ कोटी एवढा खर्च करण्यात आला. या योजनेअंतर्गत सन २०१७-१८ वर्षात नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत ९८ हजार ६२९ टीसीएम एवढी पाणीसाठ्याची क्षमता निर्माण झाली, तर एक लाख ७६ हजार ८७८ हेक्टर इतके संरक्षित सिंचन क्षेत्र उपलब्ध झाले आहे.

या योजनेनुसार जलसंधारणांतर्गत सर्व समावेशक उपाययोजनांद्वारे एकात्मिक पद्धतीने शाश्‍वत शेती व पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. बारमाही पिकांसाठी पाण्याची मुबलकता व त्या अनुषंगाने शेतकर्‍यांची समृद्धता हे संपन्न महाराष्ट्राचे भविष्यकालीन चित्र असून, सन २०१९पर्यंत राज्य दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने ‘जलयुक्त शिवार अभियान’ ही महत्त्वाकांक्षी योजना वरदान ठरत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search