Next
‘सिंहगड रस्त्यावरील विकासकामे मार्गी लागल्याचे समाधान’
आमदार माधुरी मिसाळ यांचे प्रतिपादन
BOI
Tuesday, July 23, 2019 | 04:56 PM
15 0 0
Share this article:

सिंहगड रस्ता परिसरातील विविध विकासकामांविषयी माहिती देताना आमदार माधुरी मिसाळ. शेजारी डावीकडून मंजुषा नागपुरे, बाबा मिसाळ, श्रीकांत जगताप आणि अनिता कदम.

पुणे : ‘सिंहगड रस्त्यावरील पायाभूत सुविधा, कलासंस्कृतीचा विकास आणि नागरिकांची सुरक्षितता या सर्वच बाबतींत गेली अनेक वर्षे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची फळे आता दिसू लागली असून, ही विकासकामे मार्गी लागल्याचे पाहताना समाधान वाटत आहे,’ अशी भावना आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केली. 

सिंहगड रस्ता परिसर भागातील मार्गी लागलेल्या विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी आज (२३ जुलै) पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस बाबा मिसाळ, सिंहगड रस्ता परिसरातील नगरसेवक श्रीकांत जगताप आणि नगरसेविका अनिता कदम व मंजुषा नागपुरे आदी उपस्थित होत्या. 

सिंहगड रस्त्यावरील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी विठ्ठलवाडी ते माणिकबाग दरम्यान येऊ घातलेला उड्डाणपूल असो, विश्रांतीनगर ते पु. ल. देशपांडे उद्यानापर्यंतचा पर्यायी रस्ता असो, देशी कारागीरांना हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ साकारणारे कलाग्राम असो अथवा वेगाने विस्तारणाऱ्या सिंहगड रस्ता परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी हिंगणे खुर्द येथे उभारले जाणारे पोलीस ठाणे व पौलीस चौकी असो. सिंहगड रस्त्यावर सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित असलेल्या विविध विकासकामांना बळ देण्यात आणि कामे लवकर हाती घेतली जावीत यासाठी पाठपुरावा करण्यात मिसाळ यांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे.

या भागातील पायाभूत सुविधांबद्दल बोलताना आमदार मिसाळ म्हणाल्या, ‘सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी कमान ते माणिकबाग या दरम्यान उड्डाणपूल होणार असून, त्यासाठी महापालिकेतर्फे जिओ टेक्निकल सर्वेक्षण करून अहवाल दाखल करण्यात आला आहे. लवकरच प्रत्यक्ष कामालादेखील सुरूवात होईल. या उड्डाणपुलासाठी मी गेली १० वर्षे पाठपुरावा करत आहे. महापालिका आयुक्त व स्थायी समितीच्या माध्यमातून २०१९-२०च्या अंदाजपत्रकात या कामासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध झाली आहे. उर्वरित तरतूदीची पूर्तता करण्याबद्दल सांगण्यात आले आहे. उड्डाणपुलाचे काम २०२२पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असून, कमीत-कमी वेळात पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी करण्यासाठी या उड्डाणपुलाचा उपयोग होईल.’

आमदार माधुरी मिसाळगेली १० वर्षे आपण सिंहगड रस्त्यावरील फनटाइम मल्टिप्लेक्सपासून पु. ल. देशपांडे उद्यान अर्थात जनता वसाहतीपर्यंत पर्यांयी रस्ता तयार करण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचेही मिसाळ यांनी या वेळी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘फनटाइम ते विश्रांती नगरपर्यंतचा सिंहगड रस्त्याला पर्यायी असलेला रस्ता पूर्ण झाला आहे, तर विश्रांती नगर ते पु. ल. देशपांडे उद्यानादरम्यान रस्ता तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तो देखील लवकरच पूर्ण होईल आणि त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास नक्कीच मदत होणार असून, त्यासाठी सध्या मी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करीत आहे.’

उड्डाणपूल व पर्यायी रस्त्याबरोबरच पु. ल. देशपांडे उद्यानापासून नवश्या मारूतीपर्यंत भूमिगत पादचारी मार्ग (अंडर पास) तयार करणेही प्रस्तावित आहे. हा मार्ग झाल्यावर स्थानिकांना या रस्ता ओलांडणे आणखी सुरक्षित होणार असून, या कामाकडे विशेष लक्ष पुरवणार आहे. पर्यायी रस्त्याचे उर्वरित काम व पादचारी मार्ग ही दोन्ही विकासकामे सप्टेंबर २०१९ मध्ये सुरू होत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याच प्रमाणे विठ्ठल वाडी स्मशान भूमी ते हिंगणे चौक दरम्यान नदीपात्रात रस्तादेखील प्रस्तावित आहे. ज्यामध्ये सुमारे २५० मीटर रस्ता हा पूर रेषेत येत असल्याने तेवढा रस्ता हा उन्नत मार्ग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

‘हिंगणे खुर्द येथील २० गुंठे आरक्षित जागेवर सिंहगड रस्ता पोलीस ठाणे, तर पाच गुंठे जागेवर पोलीस चौकी उभारली जात आहे. ही दोन्ही कामे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होतील. हे पोलीस ठाणे तसेच पोलीस चौकी सिंहगड रस्त्याच्या मध्यभागीच येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना त्याचा फायदा होईल, तसेच नागरीकरण वाढलेल्या या परिसरात गुन्हेगारीला आळा बसेल. यापूर्वी हिंगणे परिसरातील नागरिकांना तक्रार देण्यासाठी अभिरुची पौलीस चौकीत जावे लागत होते. त्यांचा वेळ वाचेल. या चौकीचा विषय मी गेली १० वर्षे लावून धरला होता; तसेच स्वतंत्र पोलीस ठाणे असावे हा मुद्दा वारंवार मांडला होता. जागेच्या मालकाकडून पोलीस ठाण्यासाठी जागा हस्तांतरित करण्यासाठीही यशस्वी प्रयत्न केले,’ असे त्यांनी नमूद केले.

पुणेकरांबरोबरच पुण्यात येणाऱ्या पर्याटकांच्याही आकर्षणाचे केंद्र ठरेल असे अनोखे ‘कलाग्राम’ सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ साकारत आहे. हा कायमस्वरूपी प्रकल्प स्मार्ट सिटी अंतर्गत साकारण्यात येणार असून, त्यासाठी १०.५ ते ११ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून त्याचे लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याचे त्या म्हणाल्या. 

कलाग्राम प्रकल्पाच्या माध्यमातून पुणे आणि ग्रामीण भागातील स्थानिक कलाकारांबरोबरच देशविदेशातील कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी आणि विपणनासाठीही हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार असून त्यासाठी मिसाळ या गेली सहा-सात वर्षे सातत्याने प्रयत्नशील होत्या. या प्रकल्पासाठी दोन कोटी रुपये माधुरी मिसाळ यांच्या विशेष आमदार निधीतून, ७५ लाख रुपये खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून, तर एक कोटी रुपये नावीन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून अशी सुमारे पावणेचार ते चार कोटी रुपयांची सुरुवातीची तरतूद करण्यात आतापर्यंत करण्यात आली आहे.

कलाग्राम प्रकल्पाप्रमाणेच पु. ल. देशपांडे उद्यानाच्या मागील जागेत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पही साकारत आहे. कचरा प्रकल्पासाठीची जागा उद्यान विभागाकडून घनकचरा विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, त्यानंतर लगेचच या प्रकल्पावर पुढच्या टप्प्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search