Next
‘योगाच्या माध्यमातून जीवन आरोग्यदायी बनवू या’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
प्रेस रिलीज
Friday, June 21, 2019 | 06:20 PM
15 0 0
Share this article:


नांदेड : ‘प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगाचे अत्यंत महत्त्व असले पाहिजे. म्हणून योगाच्या माध्यमातून आपले जीवन कायमस्वरूपी निरोगी व आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न करू या,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

राज्य शासन आणि विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे आयोजित राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी योगगुरू रामदेवबाबा, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार डॉ. तुषार राठोड आदींसह हजारो योग साधक उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘संयुक्त राष्ट्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला व हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांत सर्वांत कमी कालावधीत मंजूर झाला. आज जगातील १५०पेक्षा अधिक देशात सुदृढ आरोग्यासाठी योगासने केली जात आहेत. जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाला रामदेवबाबांनी महाराष्ट्रात येण्याची विनंती तातडीने मान्य केली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो.’

‘भारताची प्राचीन योग विद्या योगगुरू रामदेवबाबांनी संपूर्ण देशाबरोबरच जागतिक स्तरावरही पोहोचविली, याचा अभिमान असून, आज नांदेडच्या पावनभूमीत प्रत्यक्ष रामदेवबाबा हे आपल्याला योग विद्याचे प्रशिक्षण देण्यासाठी आलेले आहेत. या संधीचा लाभ घेऊन नांदेड जिल्हावासियांनी निरोगी व आरोग्यदायी जीवनासाठी नियमीत योगासने करण्याचा संकल्प करावा,’ असे आवाहन फडणवीस यांनी या वेळी केले.

रामदेवबाबा म्हणाले, ‘भारत देश हा प्राचीन योग विद्येच्या माध्यमातून अध्यात्म महाशक्तीकडे वाटचाल करत आहे; तसेच या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, राजकीयदृष्ट्या अधिक सुरक्षित होत आहे. २०४० ते ५०दरम्यान भारत विश्वातील सर्वांत मोठे सामर्थ्यशाली राष्ट्र होणार आहे. नियमित योगासने केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. तसेच शरीर व मन निरोगी राहिल्याने जीवनमानातही वाढ होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात नियमित योगासने करून आपले जीवन आरोग्यदायी व सुखकर बनवा.’

आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून येथे जमलेल्या प्रत्येक नागरिकाने योगधर्म, मानवधर्म, राष्ट्रधर्म व सेवाधर्माचा प्रामाणिकपणे अंगीकार करण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

एकाचवेळी एकाच ठिकाणी ९१ हजार ३२३ लोकांनी योगासने करण्याचा पूर्वीचा जागतिक विक्रम नांदेड येथील आजच्या राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय योगदिनादिवशी मोडला गेला. आज एक लाख १० हजारांपेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी एकाच ठिकाणी रामदेवबाबा यांनी योगविद्येचे प्रशिक्षण दिले व नवीन जागतिक विक्रमाला नांदेडकरांनी गवसणी घातली.


या वेळी गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी मनीष विष्णूई यांनी ड्रोनद्वारे प्राथमिक गणनेनुसार नांदेड येथील योग कार्यक्रमास एक लाख १० हजारांपेक्षा अधिक लोक असल्याची माहिती दिली. जागतिक विक्रम नांदेडकरांनी प्रस्थापित केल्याचे गोल्डन बुक प्रमाणपत्र विष्णूई यांनी फडणवीस व रामदेवबाबा यांना या वेळी दिले. आयुष विभागाने तयार केलेल्या ‘पवनी’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री व रामदेवबाबा यांच्या हस्ते करण्यात आले. ‘पतंजली’तर्फे स्वदेशी समृद्धी कार्डअंतर्गत पतंजली कार्यकर्त्यांना मदत देण्यात येत असते. नांदेड येथील पतंजली कार्यकर्त्यांचा अपघात होऊन जायबंदी झालेल्या कार्यकर्त्यांला पाच लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.

रामदेवबाबा यांच्या जीवनावर आधारित ‘मेरा जीवन, मेरा मिशन’ या आत्मचरित्राच्या मुखपृष्ठाचे विमोचन फडणवीस यांच्या हस्ते झाले. या आत्मचरित्राच्या पुस्तकांची प्रकाशनापूर्वीची विक्रीची नोंदणी आजपासून सुरू झाली. या वेळी फडणवीस यांनी या आत्मचरित्राच्या १०० पुस्तकांची आगाऊ मागणी नोंदविली असल्याची घोषणा या वेळी करण्यात आली.

प्रारंभी मुख्यमंत्री व रामदेवबाबा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी रामदेवबाबा यांनी व्यासपीठासह सर्व योग साधकांना शरीराला ऊर्जा प्राप्त करुन देणाऱ्या योगिंग-जॉगिंग आसनाने सुरुवात केली. फडणवीस यांनीही योगासनांचे विविध प्रकार केले. या वेळी पहाटे पाच ते आठ वाजेपर्यंत रामदेवबाबा यांनी सूर्यनमस्कार, ताडासन, त्रिकोण आसन, वृक्षासन, गरुडासन आदी अनेकविध आसनांचे शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक, नागरिक, महिला, शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. जयदीप आर्या यांनी केले. या कार्यक्रमास सुमारे दीड ते दोन लाख नागरिकांची उपस्थित होती.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search